‘एसआयटी’च्या मनात काय आहे?
By admin | Published: May 29, 2017 03:36 AM2017-05-29T03:36:03+5:302017-05-29T03:36:03+5:30
खाण घोटाळ्यात समन्स बजावल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : खाण घोटाळ्यात समन्स बजावल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्यानंतर खाण कंपन्यांचे पदाधिकारी काय करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले असून त्यावर एसआयटीचीही नीती ठरणार आहे. एसआयटीच्या मनात काय आहे, याचा अंदाज येत नसल्यामुळे खाण कंपन्यांच्या संचालकांनाही धास्ती निर्माण झाली आहे.
कोट्यवधी रुपयांच्या खनिज घोटाळ्याच्या चौकशीत विशेष तपास पथकाने आठ खाण कंपन्यांना समन्स बजावल्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. अडकलेल्या सर्वांच्याच कोठडीतील चौकशीचा आग्रह आतापर्यंत एसआयटीने धरला आहे. कामत आणि लोलयेकर यांचीही कोठडी हवी असल्याचे प्रतिज्ञापत्र एसआयटीने न्यायालयात सादर केले आहे. नोटिसा बजावताना एसआयटीकडून काही कंपन्यांचे संचालक आणि काही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीला बोलावले आहे. त्यामुळे हे अधिकारी थेट चौकशीला हजर राहतील, की त्यापूर्वी खबरदारी म्हणून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील, याबद्दल उत्सुकता आहे. लुईस बर्जर प्रकरणात चौकशीला बोलावलेले माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनीच अटक केली होती, तर कामत यांची अटक त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे टळली होती.