गोव्यात होणार असलेल्या लोकसभा निवडणूकीत ‘नोटा’ चा आकडा किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 08:23 PM2019-04-12T20:23:43+5:302019-04-12T20:24:01+5:30
२०१४ सालात गोव्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीत उत्तर व दक्षीण गोव्यातील १०१०३ मतदारांनी ‘नोटा’ (यापैंकी कोणी नाही) वर मतदान केले असून ११ दिवसानंतर गोव्यात होणार असलेल्या लोकसभा निवडणूकीत मागच्या वर्षापेक्षा यंदा ‘नोटा’ संख्येत वाढ होणार की नाही याबाबत चर्चा चालू आहे.
वास्को - २०१४ सालात गोव्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीत उत्तर व दक्षीण गोव्यातील १०१०३ मतदारांनी ‘नोटा’ (यापैंकी कोणी नाही) वर मतदान केले असून ११ दिवसानंतर गोव्यात होणार असलेल्या लोकसभा निवडणूकीत मागच्या वर्षापेक्षा यंदा ‘नोटा’ संख्येत वाढ होणार की नाही याबाबत चर्चा चालू आहे. गोव्यातील शेकडो मतदार विविध मुद्यावरून काही पक्षावर तसेच काही उमेदवारांवर सुद्धा नाराज असल्याने २०१९ सालातील लोकसभा निवडणूकीत शेकडो मतदार ‘नोटा’ ला प्राधान्य देणार अशी चर्चा असून मागच्या लोकसभा निवडणूकीपेक्षा यंदा यात वाढ होणार की कपात होणार याबाबत विविध प्रकारचे तर्कवितर्क काढण्यात येत आहे.
२३ एप्रिल रोजी गोव्यात होणार असलेल्या लोकसभा निवडणूकीचे वेध सध्या संपूर्ण गोव्यात लागलेले असल्याचे दिसून येत असून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आपल्या मतदारांना प्रचाराच्या माध्यमाने खुश करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. निवडणूकीत मतदारांना देण्यात येत असलेल्या ‘नोटा’ च्या पर्यायावर यंदा गोव्यात २०१४ सालापैक्षा जास्त मतदान होणार की ही संख्या घटणार यावर सुद्धा अनेक जण सध्या चर्चा करताना दिसून येत आहे. २०१४ सालात झालेल्या लोकसभा निवडणूकीत उत्तर तसेच दक्षीण गोव्यात मिळून एकूण ८ लाख १७ हजार ४४० मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यात उत्तर गोव्यातून ४ लाख ६ हजार ९४५ तर दक्षीण गोव्यातून ४ लाख १० हजार ४९५ मतदारांनी मतदान केले होते. २०१४ मध्ये गोव्यात झालेल्या एकूण मतदानापैंकी १.२४ टक्के मतदारांनी (१०१०३) ‘नोटा’ वर मतदान करण्याचे पसंत केले असल्याचे दिसून आले होते. यात उत्तर गोव्यातून ४३३३ तर दक्षीण गोव्यातून ५७७० मतदारांनी ‘नोटा’ वर मत मारले होते. २३ एप्रिल ला होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत गोव्यात मागच्या लोकसभा निवडणूकीपेक्षा यंदा ह्या आकड्यात वाढ होणार की नाही याबाबत अनेकांशी चर्चा केली असता त्यांनी विविध प्रकारचे तर्कवितर्क व्यक्त केले.
यंदाच्या लोकसभा निवडणूकीत जास्त करून मागच्या पेक्षा यंदा ‘नोटा’ वर जास्त मतदान होणार नाही अशा प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या. केंद्रात चांगले व स्थिर सरकार व्हावे यासाठी गोव्यातील जास्तित जास्त मतदार आपल्या चाहत्या पक्षाला मतदान देणार अशी प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केला. ह्या लोकसभा निवडणूकीत मतदार पक्षावरूनच मतदान करणार अशी प्रतिक्रीया अनेकांनी देऊन मागच्या वर्षापेक्षा यंदा ‘नोटा’ मतदानात गोव्यात कपात होणार असे सांगितले. खाण व्यवसाय बंद पडल्याने तसेच इतर अनेक विविध विषयावरून लोक नाराज असल्याने त्याचबरोबरच दुसºया पक्षाने दिलेल्या उमेदवाराबाबत सुद्धा अनेक जण नाखुश असल्याने यंदा ‘नोटा’ मतदानाच्या संख्येत वाढ सुद्धा होऊ शकते अशी प्रतिक्रीया सुद्धा अनेकांनी व्यक्त केली. काही जणांनी लोकसभा निवडणूकीपेक्षा येणाºया काळात गोव्यात विधानसभा निवडणूका झाल्यास नागरीक कंटाळलेले असल्याने मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ वर मतदान करणार असल्याचे सांगून ह्या लोकसभा निवडणूकीत ‘नोटा’ चा जास्त प्रभाव होणार नाहीत असे म्हणाले.
वास्कोतील निवृत्त मुख्याध्यापक उल्हास जोशी यांच्याशी लोकसभा निवडणूकीबाबत प्रतिक्रीया घेतली असता गोव्यातील बहुतेक जनता येथील राजकीय नेत्यावर वेगवेगळ््या कारणावरून नाराज असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. गोव्यात विधानसभा निवडणूक झाल्यास ‘नोटा’ संख्येत वाढ होऊ शकते अशी प्रतिक्रीया त्यांनी देऊन जास्त करून लोकसभा निवडणूकीत गोव्यात यंदा ‘नोटा’ चा जास्त प्रभाव दिसणार नाही असे ते म्हणाले. गोव्यातील नागरीक केंद्रात स्थिर सरकार देण्यासाठी यंदा मतदान करणार असे वाटत असून मग तो कुठलाही पक्ष असूद्या मतदार आपल्या पक्षाबरोबर अथवा उमेदवाराबरोबर राहून मतदान करणार असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘नोटा’ ला मत देणे अर्थात ते वाया घालवणे असे माझे मत असल्याचे मुख्याध्यापक जोशी शेवटी म्हणाले. सडा येथील उच्चमाध्यमिक विद्यालयात अर्थशास्त्र शिकवणारे शिक्षक नंदकुमार सातार्डेकर यांची प्रतिक्रीया विचारली असता दक्षीण गोव्यात यंदाच्या निवडणूकीत पूर्वीपेक्षा ‘नोटा’ वर मतदान वाढू शकते असे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. लोकांकडून ऐकायला येत असल्यानुसार दक्षीण गोव्यातील अनेक मतदार काही कारणावरून पक्षाबरोबर नाराज आहेत तर काही जण उमेदवारावर नाराज असून ते ‘नोटा’ ला मत देण्यास पसंत करणार असे मला वाटत असल्याचे नंदकुमार सातार्डेकर म्हणाले. देशाला चांगले, स्थिर सरकार द्यायचे असल्यास ‘नोटा’ चा पर्याय न वापरता योग्य उमेदवाराला मतदान करणे गरजेचे आहे असे मला वाटत असून मग तो कुठल्याही पक्षाचा, अपक्ष उमेदवार असू असे नंदकुमार शेवटी बोलताना म्हणाले. २०१४ च्या तुलनेत ह्या वर्षी होणार असलेल्या लोकसभा निवडणूकीत ‘नोटा’ चे प्रमाण वाढणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क काढण्यात येत असले तरी निकालानंतरच काय ते उघढ होणार हे मात्र नक्की.
उत्तर व दक्षीण गोव्यातून २०१४ सालात लोकसभा निवडणूकीत झालेल्या नोटा मतदानाची विविध ठिकाण्यावरील आकडेवारी
२०१४ सालात झालेल्या लोकसभा निवडणूकीत उत्तर गोव्यातून ५७७० मतदारांनी ‘नोटा’ वर आपले मतदान केले होते. यात मांदे्र येथून ३६२, पेडणे ३८९, बिचोली २७५, थिवी २१७, म्हापसा २५५, शिवोली ३०९, सालीगाव २०२, कळंगुट २०१, पर्वरी २४०, हळदोणा २४४, पणजी २४९, ताळगाव ३०९, सांताक्रुज २५७, सांतआंद्रे २४२, कुर्भाजुवा २३४, मये ३१३, साखळी ३१२, पर्ये ४२६, वाळपई ३४७, प्रियोळ ३६३ व बेलट मतदानद्वारे २४ ‘नोटा’ मतांचा समावेश होता.
दक्षीण गोव्यातून २०१४ सालात लोकसभा निवडणूकीच्या वेळी ४३३३ मतदारांनी ‘नोटा’ वर मतदान केले होते. यात फोडा २४९, शिरोडा २९९, माशेल २५४, मुरगाव १४२, वास्को २६०, दाबोळी १७३, कुठ्ठाळी १८९, नुवे २१०, कुडतरी २३०, फार्तोडा २२२, मडगाव २१९, बाणावली १५६, नावेली १७५, कुकळी १७५, वेळ्ळी २१४, केपे २९९, कुडचडे १८३, सावर्डे २०२, सांगे २३९, काणकोण २३० व बेलट मतदानाद्वारे १३ ‘नोटा’ वर मते पडली होती.
२०१४ लोकसभा निवडणूकीनंतर २०१७ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत नोटा मतदानाची संख्या वाढली
२०१४ सालात गोव्यात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर २०१७ मध्ये गोव्याची विधानसभा निवडणूक घेण्यात आली असता दक्षीण तसेच उत्तर गोव्यात ‘नोटा’ मतदानाच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले होते. २०१४ लोकसभा निवडणूकीत दक्षीण गोव्यात ४३३३ जणांनी नोटावर मतदान केले असून २०१७ मधील विधानसभा निवडणूकीत दक्षीणेत असलेल्या २० मतदारसंघातून एकूण ५००१ जणांनी ‘नोटा’ वर मत मारण्यास पसंत केले होते. लोकसभा निवडणूकीपेक्षा विधानसभा निवडणूकीत गोव्यात ‘नोटा’ मतदानात ६६८ ची वाढ झाली होती. उत्तर गोव्यात लोकसभा निवडणूकीत ५७७० जणांना नोटावर मतदान केले असून विधानसभा निवडणूकीत यात वाढ होऊन ही संख्या ५९१८ वर पोचली होती. लोकसभा निवडणूकीपेक्षा विधानसभा निवडणूकीत उत्तर गोव्यातून ‘नोटा’ मतदानात फक्त १४८ मतांचीच वाढ झाली होती.