गोव्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस वाढण्याचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 07:56 PM2019-07-12T19:56:44+5:302019-07-12T19:58:59+5:30

या प्रकाराने सर्वात जास्त धक्का प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसला आहे.

What is the reason for the mood of ruling BJP in Goa? goa politics | गोव्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस वाढण्याचे कारण काय?

गोव्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस वाढण्याचे कारण काय?

Next
ठळक मुद्देया प्रकाराने सर्वात जास्त धक्का प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसला आहे. चालू विधानसभा कार्यकाळात बिगर भाजप पक्षांच्या सदस्यांनी चार वेळा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राजू नायक

कॉँग्रेस पक्षातून १० आमदार आयात करण्याच्या भाजप नेत्यांच्या निर्णयामुळे या सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते कमालीचे उद्विग्न बनले आहेत. असे पहिल्यांदाच होते आहे की ते आपला राग, संताप जाहीरपणो व्यक्त करीत आहेत. भाजपचे संस्थापक सदस्य राजेंद्र आर्लेकर यांनी भाजपचे कॉँग्रेसीकरण झाल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या वैचारिक पाठीराख्या शेफाली वैद्य यांनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना पक्षात घेण्याचा प्रकार नैतिक अध:पतन असल्याचे म्हटले आहे, तर सुमंत जोगळेकर या नव्या तरुण कार्यकर्त्याने आता सर्व निर्लज्ज भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये आल्याने पावन होणार का, असा सवाल केला आहे. 

या प्रकाराने सर्वात जास्त धक्का प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसला आहे. भाजपने आजपर्यंत आपले केडर महत्त्वाचे मानले होते. हे कार्यकर्ते मोफत घाम गाळून, वाईटपणा घेऊन कार्य करीत. सुरुवातीला कॉँग्रेसमधून उमेदवार आयात करण्याची प्रवृत्ती भाजपमध्ये सुरू झाली, त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये केवळ चुळबूळ होती. परंतु आज मोठय़ा संख्येने आमदारच आयात होत असल्याने पक्षात प्रचंड असंतोष आहे. फेसबूकवर आज चर्चा चालू होती की सध्या भाजपने जी सदस्यता मोहीम चालविली आहे, त्यात लोक वेगवेगळे प्रश्न करीत असल्याने अडचणी येत आहेत.  भाजपमध्ये आधीच १७ सदस्यांमध्ये सहा ख्रिस्ती आमदार होते. ते नेहमीच अस्वस्थ होते व त्यांच्या वक्तव्याने पक्ष नेहमीच अडचणीत येत असे. आता २७ सदस्यांत १४ ख्रिस्ती आमदार या पक्षाचे सदस्य बनले आहेत. त्यामुळे पक्षाची ध्येयधोरणो सौम्य होताहेत व भाजपचे कॉँग्रेसीकरण होत असल्याची टीका कार्यकर्ते करू लागले आहेत. 
प्रामाणिक कार्यकर्त्याची तर घालमेल होते आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ताळगावचे दत्तप्रसाद नाईक. नाईक यांनी ताळगावमध्ये सतत संघर्ष केला व या मतदारसंघात सतत निवडून येत असलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्याशी वैर घेतले. परंतु पक्षाने संधी मिळते तेव्हा मोन्सेरात यांच्याशी नेहमीच तडजोड केली. २०१७ मध्ये पणजीत मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणूक लढविली त्यावेळी भाजपने मोन्सेरात यांचा पाठिंबा घेतला व त्यांना लाभाचे पद मिळवून दिले होते. त्यामुळे नाईक उद्विग्न बनून दुस-या मतदारसंघात कार्य करण्यासाठी निघून गेले होते. आता या घाऊक पक्षांतरामध्ये जेनिफर मोन्सेरात (ताळगाव) व बाबूश मोन्सेरात (पणजी) हे दाम्पत्य भाजपमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे नाईक यांच्या श्रमांवर, मेहनतीवर, पक्षनिष्ठेवरही पाणी पडले आहे. 

चालू विधानसभा कार्यकाळात बिगर भाजप पक्षांच्या सदस्यांनी चार वेळा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीला विश्वजित राणे यांनी कॉँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनाही योग्य बक्षिसी मिळाली. त्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन पैकी दोघांनी भाजपचा टिळा लावला. त्यांना मंत्रिपदे देण्यात आली आणि आता १० सदस्य भाजपमध्ये पावन झाले आहेत. या मतदारसंघातील भाजप कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते व उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेले प्रमाणिक नेते उद्विग्न बनले तर नवल ते काय? दुर्दैवाने एकेकाळी कार्यकत्र्याच्या रक्तावर व घामावर पोसलेला हा पक्ष सत्तेला चटावलेला आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

Web Title: What is the reason for the mood of ruling BJP in Goa? goa politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.