फोमेन्तोने प्रकल्प बंद केल्यास मडगावच्या कचऱ्याचे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 04:36 PM2019-07-27T16:36:23+5:302019-07-27T16:39:11+5:30
गोव्याची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मडगाव शहराला सध्या कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - गोव्याची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मडगाव शहराला सध्या कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या फोमेन्तो ग्रीन कंपनीने आपला प्रकल्प 9 ऑगस्टनंतर बंद करण्याची नोटीस मडगाव पालिकेला दिल्याने जवळपास लाखभराची लोकसंख्या असलेल्या मडगावसमोर दररोज निर्माण होणाऱ्या शंभर टन कचऱ्याचे काय करावे हा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.
कचरा शहराच्या बाहेर सोनसडो नावाच्या जागेत यापूर्वी टाकला जात असे. त्यावेळी हा भाग अगदी सुनसान होता. कालांतराने या भागातही लोकवस्ती वाढली. त्याचबरोबर या कचरा यार्डातील टाकलेल्या कचऱ्याचे डोंगरही वाढू लागल्याने शेवटी या समस्येवर मात करण्यासाठी मडगाव पालिकेने फोमेन्तो ग्रीन कंपनीला कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले. हा प्रकल्प सुरू होऊन जवळपास सहा वर्षे उलटली तरी या कचऱ्याच्या राशी कमी होण्याऐवजी त्या उत्तरोत्तर वाढतच गेल्या.
आता या फोमेन्तो कंपनीने मडगाव पालिकेकडून आपल्याला योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचा दावा करीत दोन महिन्यापूर्वी हा प्रकल्प बंद करण्याची नोटीस दिली होती. त्यावेळी पालिकेला पर्यायी व्यवस्थेसाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही साठ दिवसांची मुदत येत्या 9 ऑगस्टला संपत असून त्यानंतर फोमेन्तोने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे खरेच बंद केले तर पालिका काय करणार हे अजुनही अस्पष्ट आहे.
यासंदर्भात मडगावच्या नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई यांना विचारले असता, पुढे काय करावे हे ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्याचे आम्ही ठरविले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांना तशा सुचना दिल्या आहेत असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोनसडय़ावरील कचरा प्रकल्प बंद करण्याची नोटीसीची मुदत अवघ्या 13 दिवसांवर पोचलेली असताना मडगाव पालिकेकडून पर्यायी प्रकल्पासाठी अद्याप कोणत्याही हालचाली चालू झालेल्या नाहीत याच पार्श्वभूमीवर मडगाव पालिकेने फोमेन्तो कंपनीकडे या चालू प्रकल्पासंदर्भात जी तांत्रिक माहिती मागितली होती तीही मडगाव पालिकेला मिळालेली नाही. त्यामुळे शुक्रवारी मडगाव पालिकेने पुन्हा फोमेन्तोला स्मरणपत्र पाठवून ही माहिती लवकरात लवकर द्यावी अशी मागणी केली आहे.
मडगावचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक़ यांनी शुक्रवारी हे स्मरणपत्र पाठविल्याची माहिती दिली. हा प्रकल्प चालू करताना फोमेन्तोने आवश्यक ते परवाने घेतले होते का?, हा प्रकल्प चालू झाल्यापासून आतार्पयत फोमेन्तोने नेमक्या किती कचऱ्यावर प्रक्रिया केली आणि त्यातून किती खत तयार झाले याचीही माहिती मडगाव पालिकेने मागितली होती. हा प्रकल्प चालू करताना फोमेन्तोने कुठलेही परवाने घेतले नव्हते अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली होती.
मडगाव पालिकेकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याचा दावा करुन फोमेन्तोने 10 जून 2019 रोजी मडगाव पालिकेला अंतिम टर्मिनेशन नोटीस पाठविली होती. त्यात 60 दिवसांनंतर कंपनी हा प्रकल्प बंद करणार असे म्हटले होते. ही मुदत आता 9 ऑगस्टला संपत आहे. मडगाव पालिका आपल्याला 12.81 कोटी रुपये देय असल्याचेही फोमेन्तोने या नोटीसीत म्हटले होते. जोपर्यंत ही रक्कम फेडली जात नाही तोपर्यंत प्रकल्पाच्या जागेचा ताबा कंपनी सोडणार नाही असेही स्पष्ट केले होते.
यापूर्वी फातोडर्य़ाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या पुढाकारातून मडगावातील मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 2 कोटी रुपये खर्चून दहा टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा छोटा प्रकल्प उभारण्याचे ठरविण्यात आले होते यासाठी चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी नाईक यांना मुंबईत जाण्याच्या सुचनाही केल्या होत्या. मात्र नंतर सरकारात उलथापालथ झाल्याने हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. अशा परिस्थितीत फोमेन्तोने 9 ऑगस्टपासून कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंद केले तर काय करावे हा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे.