मंत्र्यांना आश्चर्याचा धक्का; प्रेमेंद्र शेट यांची डिचोलीत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 07:22 AM2024-10-25T07:22:45+5:302024-10-25T07:23:43+5:30
रवी, माविन, काब्राल, जीत व अन्य आमदारांच्याही व्हॉट्सअॅपवरून पैसे मागणारे 'एसएमएस'
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्री, आमदारांच्या बनावट व्हॉट्स अॅपवरून लोकांना 'एसएमएस' पाठवून पैसे मागण्याचा खळबळजनक प्रकार अज्ञातांकडून सुरू असल्याचे उघड झाले आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कृषिमंत्री रवी नाईक यांनी यासंदर्भात पोलिस तक्रारही केली आहे. तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार नीलेश काब्राल, जीत आरोलकर व इतर मंत्र्यांनाही अशाच प्रकारे कटू अनुभव आला आहे.
मंत्र्यांच्या नावाचे बोगस व्हॉट्सअॅप खाते तयार करून तसेच त्यांचा फोटो वापरून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत. कृषिमंत्री रवी नाईक यांच्या अशाच प्रकारे तयार केलेल्या बोगस व्हॉट्सअॅप खात्यातून अनेकांना मेसेज पाठवण्यात आले. रवींना ओळखत असलेल्या त्यांच्या मित्रांपैकी काही जणांनी रवींच्या नजरेस ही बाब आणून दिली. त्यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांत तक्रार केली.
मुख्यमंत्र्यांशी बोलणार : काब्राल
आमदार नीलेश काब्राल यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्या व्हॉट्स अॅपवरून कोणीतरी अज्ञाताने लोकांना मेसेज पाठवून पैसे मागितल्याची माहिती मला मिळाल्यावर मी त्वरित स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. काही मंत्र्यांच्या व्हॉट्सअॅपवरूनही अज्ञातांनी असेच लोकांना मेसेज पाठवल्याचे मला कळले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे बोलणार असून कारवाईची मागणी करणार. कोणीतरी वैफल्यग्रस्ततेतून हा प्रकार करीत असावेत किंवा विरोधकांचा हात असावा, असा आरोप केला.
मेसेजला बळी पडू नका : माविन गुदिन्हो
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. त्यांनी त्वरित वास्को पोलिसांत तक्रार करून अशा मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन सोशल मीडियावरून लोकांना केले. 'अॅमेझोन पे ई गिफ्ट कार्ड' मार्फत आपल्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार अज्ञातांकडून सुरू असल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे माविन यांचे म्हणणे आहे. या प्रकाराचा त्यांनी निषेध केला आहे.
प्रेमेंद्र शेट यांची डिचोलीत तक्रार
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या बनावट व्हॉट्स अॅपवरून अशाच प्रकारचे 'एसएमएस' काही जणांना गेले असून, त्यांनीही याप्रकरणी डिचोली पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. ते म्हणाले की, साधारणपणे सकाळी ११:३० नंतर लोकांना माझ्या नावाने मेसेज गेल्याचे मला समजले. अर्ध्या तासाच्या कालावधीत अनेकांना मेसेज गेले. त्यानंतर मी डिचोली पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.