प्रकल्पविरोधकांवर जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री संतापतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:15 AM2017-10-05T10:15:21+5:302017-10-05T10:15:45+5:30
पणजीपासून जवळच असलेल्या बायंगिणी गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यासाठी काही लोक तसेच पुरातन वारसाप्रेमी विरोध करत असल्याने आणि मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासही काही एनजीओ आक्षेप घेत असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सथ्या प्रचंड संतापले आहेत.
पणजी : पणजीपासून जवळच असलेल्या बायंगिणी गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यासाठी काही लोक तसेच पुरातन वारसाप्रेमी विरोध करत असल्याने आणि मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासही काही एनजीओ आक्षेप घेत असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सथ्या प्रचंड संतापले आहेत.
काहीजण ऊगाच प्रकल्पांना विरोध करतात. बायंगिणी परिसरात हेरिटेज साईट आहे याची आम्हाला कल्पना आहे आणि हेरिटेज साईट म्हणजे काय तेही आम्हाला ठाऊक आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करणारे हेरिटेज साईटच्याच जागेत राहतात आणि त्यांच्याकडून देखील रोज कचर्याची निर्मिती केली जाते. हेरिटेजविषयी एवढे प्रेम असेल तर या लोकांनी तिथे निवास करणे बंद करावे अशा शब्दांत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली.
हेरिटेज साईटच्या क्षेत्रात पाचशे मिटरच्या परिघात राहणाऱ्यांनी जागा रिकामी करून दाखवावी. आपण तयार करणारा कचरा दुसर्यांच्या क्षेत्रात नेऊन त्यावर प्रक्रिया केली तर चालते पण आपल्या क्षेत्रात कचरा प्रक्रिया प्रकल्प नको ही काहीजणांची भूमिका चुकीची आहे असे मुख्यमंत्री नाराजीने पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
दाबोळी विमानतळाला मर्यादा आहेत हे आपण स्वत: सात वर्षांपूर्वी जाणले होते. त्यामुळेच नव्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाचा आग्रह सरकारने धरला तर काही घटक (व एनजीओ) मोपा विमानतळाला विरोध करू लागले. नौदलाच्या सरावामुळे दाबोळी विमानतळावर नागरी वाहतूक पूर्णपणे सुरू ठेवण्यावर मर्यादा येते. आता तिच समस्या निर्माण झाली आहे. मला सात वर्षांपूर्वी या समस्येची कल्पना आली होती. मी संरक्षण मंत्री असताना काही प्रमाणात तोडगाही काढला. जे लोक नवा विमानतळ बांधायला विरोध करतात त्यांना पर्यटन आणि नागरी उड्डाण याविषयी काही ठाऊक नाही असे मुख्यमंत्री काहीशा उद्वेगाने बोलले. आता दाबोळी विमानतळावर जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याविषयी तुम्ही पत्रकारांनी मला विचारण्यापूर्वी त्या मोपा विरोधकांना विचारावे असा सल्ला मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आवाजाची पट्टी थोडी वाढवत दिला.