बॉलीवूड अभिनेत्री पूजा बेदी 'गोंयकार' कधी झाली?; नेटिझन्सचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:06 PM2020-05-20T14:06:33+5:302020-05-20T14:07:13+5:30
मुंबईहून गोव्यात येऊन गोव्यातील क्वारंटाईन सेवेला नावे ठेवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री पूजा बेदी हिच्या ट्विटवरून पुन्हा एकदा समाजमाध्यमावर चर्चा रंगली आहे.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव: दिल्लीतील रेल्वे सुरू झाल्यानंतर गोव्यात एकदम कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर हे रुग्ण बहुतेक गोमंतकीयच असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर कोण 'खरे गोंयकार' आणि कोण नव्हे या चर्चेला समाज माध्यमातून ऊत आलेला असतानाच भर लॉकडाऊन चालू असताना मुंबईहून गोव्यात येऊन गोव्यातील क्वारंटाईन सेवेला नावे ठेवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री पूजा बेदी हिच्या ट्विटवरून पुन्हा एकदा समाजमाध्यमावर चर्चा रंगली आहे. पूजा बेदी 'गोंयकार' कधी झाली, यापासून तिला जर सुविधा पाहिजे होत्या तर त्या सरकारी खर्चाने क्वारंटाईन का झाल्या, पेड क्वारंटाईन का झाल्या नाहीत. इथपर्यंत सवाल नेटिझन्सनी केले आहेत.
दोन दिवसांपूर्वी पूजाने हे ट्विट केले होते. त्यात ती म्हणते, माझा प्रियकर माणेक कॉन्ट्रॅक्टर ( जो गोवेकर असल्याचा ती दावा करते) याच्याबरोबर मी गाडीने मुंबईहून गोव्याला आले. गोव्यात आमची कोविड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आम्हाला क्वारंटाईन करण्यात आले. त्याठिकाणची अवस्था निकृष्ट दर्जाची होती. तो एक अत्यंत वाईट अनुभव होता.
या ट्विटनंतर पूजावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. त्यात पूजा कोरोनाचा रेड झोन असलेल्या मुंबईहून गोव्यात आलीच कशी आणि तिला अशी काय इमर्जन्सी होती म्हणून तिला ही परवानगी देण्यात आली, असा सवाल गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक नंदन कुडचडकर यांनी केला असून सरकारी पैशांनी सेवा घेऊन आता गोव्यालाच नावे ठेवणाऱ्या पूजाने स्वतःला पैसे फेडून पंचतारांकित हॉटेलात का क्वारंटाईन करून घेतले नाही, असा सवाल केला.
पूजा आपला प्रियकर माणेक हा गोमंतकीय असा दावा करते, कारण त्याचा व्यवसाय आणि घर गोव्यात आहे. पूजाबरोबरच शिकणारा माणेक हा काही वर्षांपूर्वी बागा येथे आपल्या पूर्वीच्या पत्नीबरोबर 'फियेस्ता' हे रेस्टॉरंट चालवायचा. मात्र नंतर त्याचे पत्नीशी संबंध ताणल्याने ते एकमेकांपासून विलग झाले. त्यांचे रेस्टॉरंटही दुसऱ्या एका आस्थापनाने विकत घेतले. सध्या तो अंजुणा येथे घर घेऊन राहत असून मागची तीन वर्षें पूजा त्याच्याबरोबर तिथे राहत आहे.
गोव्यात येण्यापूर्वी पूजाने आपली मुलगी अलाया आणि पुत्र ओमर यांच्याबरोबर आपला 50 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यात व्हिडीओ कॉलवरून तिचे वडील कबीर बेदीही सामील झाले होते. पूजाच्या या ट्विटचा समाचार घेताना हरीश पेशवे यांनी केवळ व्यवसाय गोव्यात असला म्हणून पूजा गोवेकर होते का असा सवाल केला आहे, तर समीर अंबर यांनी हे अमीर लोक केवळ आपल्या मौज मजेसाठी कोविड चाचणीला सामोरे जातात ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. गोव्यातील एक मॉडेल पूनम कारेकर गोवेकर हिनेही पूजा बेदी हिच्यावर टीका करताना कोरोना प्रादुर्भाव असलेल्या मुंबईतून पूजा गोव्यात आलीच का असा सवाल केला आहे. माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांनीही हे सर्व श्रीमंत गोव्यात केवळ मौजमजा करण्यासाठीच येतात आणि आमचे मुख्यमंत्री त्यांना गोवेकर असल्याचे प्रमाणपत्र देतात ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.