आरोग्यमंत्री जेव्हा अवयव दानाची घोषणा करतात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 08:03 PM2019-12-19T20:03:08+5:302019-12-19T20:28:15+5:30
काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते
पणजी - आपल्या मृत्यूनंतर आपले सगळे अवयव दान करावेत अशी भूमिका आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी स्वीकारली आहे. राणे यांनी अवयव दानाविषयीचा नोटो हा अर्ज भरला व अधिकृतरीत्या आपला इरादा स्पष्ट केला.
मृत्यूनंतर अवयव दान केले जावे, ज्यामुळे अन्य गरजवंत व्यक्तींना त्या अवयवांचा लाभ होतो. दुसऱ्या कुणाचे तरी प्राण त्यामुळे वाचते. गोमंतकीय समाजात याबाबत जागृती होण्याची गरज आहे व ती जागृती आम्ही करू, असे मंत्री राणे यांनी सांगितले. मृत्यूनंतर अवयव दान करण्यात येईल, असे जाहीर करण्यासाठी अगोदर अर्ज भरावा लागतो. मंत्री राणे यांनी तसा अर्ज भरला.
स्टेट ऑगर्न अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनची गोवा सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेचे मंत्री राणे यांनी उद्घाटन केले. आरोग्य सचिव श्रीमती नीला मोहनन तसेच बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते. गोव्यात जीवनशैलीविषयक आजार वाढत आहेत. काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते.
लोकांमध्ये त्याविषयी अजून जागृती झालेली नाही. त्यामुळे लोक अवयव दानासाठी पुढे येत नाहीत. मृत्यूनंतर माणसांचे अवयव जाळणे किंवा पुरणे यास अर्थ नाही. अवयव दान हा योग्य मार्ग आहे, असे मंत्री राणे म्हणाले. आपण त्याच हेतूने अवयव दानाचा अर्ज भरला आहे. प्रत्येकाने त्याविषयी विचार करून अवयव दानासाठी पुढे यावे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.