गोव्यात जेव्हा कवितासंग्रह ठरतो पोलीस तपासाचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 04:00 PM2017-10-18T16:00:53+5:302017-10-18T16:02:07+5:30
ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या कोकणी कवितासंग्रहाबाबत गुन्हा नोंद झाला आहे आणि ही साहित्यकृती पोलिस चौकशीचा भाग बनली आहे.
पणजी - गोव्याला मराठी साहित्याची फार मोठी परंपरा लाभली आहे. त्याचसोबत कोकणी साहित्य निर्मिती हळूहळू विकसित होत गेली. मात्र गेला अनेक दशकांत गोव्यात कोणतेच पुस्तक हे पोलीस तपासाचा विषय ठरले नव्हते. मात्र आता प्रथमच ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या कोकणी कवितासंग्रहाबाबत गुन्हा नोंद झाला आहे आणि ही साहित्यकृती पोलिस चौकशीचा भाग बनली आहे.
समाजात अश्लिलता पसरविण्याचा प्रयत्न लेखक वाघ आणि अपूरबाय नावाच्या प्रकाशन संस्थेने केला अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या आवडा व्हिएगस यांनी पोलिसांत केली आहे. फोंडा शहर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 292 व 293 या कलमांखाली गुन्हा तथा एफआयआर नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास करण्याचे ठरवले आहे. गोव्यातील मराठी व कोकणी लेखक आणि साहित्यप्रेमींमध्ये हा आता अधिक चर्चेचा विषय बनला आहे.
लेखक तथा माजी उपसभापती वाघ हे आजारी आहेत. ते बोलू शकत नाहीत. वाघ यांच्या सुदिरसुक्त ह्या कोकणी कवितासंग्रहातील काही कवितांमध्ये शिव्या आहेत. काही कवितांमध्ये अश्लीलता आढळून येते तर काही कविता समाजातील उच्चवर्णीयाना शिव्या देतात अशा तक्रारी आल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या पुस्तकाचा प्रस्तावित पुरस्कार काही दिवसांपूर्वी रद्द केला. त्यानंतर आता ही साहित्यकृती थेट पोलीस स्थानकात पोहचली आहे. या प्रकरणी पोलिस आता कोणती पुढील कृती करतील ते स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान सुदिरसुक्त पुस्तकावर दक्षिणायन संस्थेने नुकतीच जाहीर चर्चा घडवून आणली व त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप तसेच लेखक दत्ता नायक यांनी सुदिरसुक्त हे पुस्तक आक्षेपार्ह नाहीच व ते पुरस्कारासाठी पात्र आहे असे मत नोंदवले आहे. दुसऱ्याबाजूने सोशल मिडियावरून या पुस्तकावर कडवट टीकाही होत आहे.