कर्नाटक कालवा खणत होते तेव्हा भजी भाजत होते ?, कॉंग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 10:27 PM2018-01-30T22:27:02+5:302018-01-30T22:27:32+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बी. एस. येडिययुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रामुळे म्हादई प्रकरणात गोमंतकीय गंभीर नसल्याचा चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फायदा कर्नाटकने घेतल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बी. एस. येडिययुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रामुळे म्हादई प्रकरणात गोमंतकीय गंभीर नसल्याचा चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फायदा कर्नाटकने घेतल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
म्हादईचे पाणी कणकुंबी येथे कर्नाटक अडवित असताना गोवा सरकार आणि प्रशासकीय अधिकारी भजी भाजण्यात व्यस्त होती का, असा सवाल खलप यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की म्हादई प्रकरणात गोवा सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे वागले आहे. गोव्यातील जरस्रोतांची अजिबात परवा सरकारला नाही, याची प्रचिती त्यामुळे आली. कणकुंबी येथील १० मीटर खोल कालवा खणला जात असतानाही सरकारकडून दखल घेतली नाही. हा मुद्दा लवादापुढे मांडायला हवा होता.
न्यायालयाची स्थगिती असतानाही ही कामे चालविल्यामुळे अवमान याचिका दाखल करायला हवी होती. परंतु तसे काहीही न करता सरकार व प्रशासन स्वस्त राहिले. उलट भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांना वादग्रस्त पत्र लिहून गोव्याची बाजू आणखी कमकुवत केली, असा आरोप त्यांनी केला. या बेजबाबदारपणामुळे मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. कॉंग्रेस पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याचे ते म्हणाले.
म्हादई प्रकरणात राजेंद्र केरकर यांच्यासारके म्हादई बचाव समितीचे तज्ज्ञ झटत असताना त्यांच्या प्रयत्नांनाही सरकारने खो घातल्याचे खलप यांनी सांगितले. कॉंग्रेस सरकारची म्हादई मुद्यावरील भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. कॉंग्रेसने यू-टर्न घेतलेले नाही. या प्रकरणात बचाव समितीच्या धोरणाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. या मुद्यावर कॉंग्रेसच्या झेंड्याखाली लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. अमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टीका केली. सरकारचेच आमदार मायकल लोबो आणि प्रमोद सावंत या प्रकरणात वक्तव्ये करून सरकारचेच अपयश समोर आणत असल्याचे ते म्हणाले.