‘माचो मॅन’ सनी देओल अश्रू ढाळतात तेव्हा....
By समीर नाईक | Published: November 21, 2023 10:12 PM2023-11-21T22:12:19+5:302023-11-21T22:12:19+5:30
गदर-२ चित्रपटाला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले.
पणजी : गदर-२ चित्रपटाला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले. हाच चित्रपट घेऊन अभिनेता सनी देओल, दिग्दर्शक अनिल शर्मा व त्यांची संपूर्ण टीम राज्यात सुरु असलेल्या इफ्फी मध्ये पोहचली आहे. त्या निमित्ताने सनी देओल आणि अनिल शर्मा यांचा खास इन कन्व्हर्सेशन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या दरम्यान ‘माचो मॅन’ सनी देओल आपल्या जीवनातील चढ उतारांची आठवण झाली, अन त्यांना अश्रू अनावरण झाले.
घायल, दामिनी, बेताब, योद्धा, घातक या सारख्या अनेक चित्रपटात खलनायकांना अक्षरशः सळो की पळो करून सोडणाऱ्या सनी देओल खऱ्या आयुष्यात किती हळवे आहेत, याची प्रचिती या दरम्यान उपस्थितांना आली. यावेळी त्यांनी आपल्या संघर्ष काळातील व्यथा सांगितल्या.
जेव्हा चित्रपटसृष्टीत आलो, तेव्हा एकदम वेगळ्या स्तरावरील चित्रपट चालायचे. माझे बाबा, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, मिथुन दा, यांनी सर्वांवर राज केले होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणे हेच मोठे आव्हान होते. पण मी खूप भाग्यशाली आहे, की मला माझ्या सुरुवातीच्या काळात बेताब, त्रिदेव, घायल, दामिनी यासारखे चित्रपट मिळाले. तर सर्वात मोठी हिट झाली ती गदर-एक प्रेम कथा, असे सनी देओल यांनी यावेळी सांगितले.
खरंतर या क्षेत्रात मोठा स्टार बनण्यासाठी नाही, तर फक्त आपली नाट्यकला दाखविण्यासाठी आलो होतो. पण लोकांनी माझ्यावर खुप प्रेम केले, त्यामुळे येथे पोहचलो आहे. गदर हिट झाल्यानंतर माझी प्रतिमा वेगळी झाली व नंतर माझ्याकडे चित्रपटासाठी कुणी आलेच नाही. बहुतेक जी प्रतिमा माझी होती, त्याला साजेशी गोष्ट नसल्याने मला टाळले गेले असावे. नंतर खुप वर्षांनी घायलचा रिमेक घेऊन आलो, तेव्हा मात्र तो फ्लॉप ठरला. त्यानंतर मला कुठल्याही चित्रपटाचा रिमेक करण्याची भीती वाटायची. पण जेव्हा मला शर्माने गदर-२ ची कथा सांगितली, तेव्हा हा चित्रपट करायचे ठरविले. आता चित्रपट ऐतिहासिक ठरला आहे. आता यापुढे ‘लाहोर १९४७’ आम्ही घेऊन येत आहोत. तसेच गदर-३ चित्रपटाची तयारी सुरु केली आहे, असे देओल यांनी सांगितले.