शिक्षिकाच होत्या...! विद्यार्थ्यांना पाहून राष्ट्रपती आपला ताफा थांबवतात तेव्हा..
By आप्पा बुवा | Published: August 24, 2023 01:36 PM2023-08-24T13:36:23+5:302023-08-24T13:46:07+5:30
गुरुवारी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ह्या कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी निघाल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
फोंडा : देशाचे राष्ट्रपती ज्या मार्गावरून जात असतात तिथे सुरक्षा संबंधी खडक उपाय योजना आखलेल्या असतात. चिटपाखरू सुद्धा ती यंत्रणा तोडून पुढे जाऊ शकत नाही. असे असतानाही जी वी एम महाविद्यालयाची मुले मात्र नशिबवान ठरली. साक्षात महामहीम राष्ट्रपती त्यांना पाहून थांबल्या व त्यांच्याशी हितगुज करून गेल्या.
गुरुवारी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ह्या कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी निघाल्या होत्या. बरोबर अकरा वाजता त्यांचा ताफा जी वी एम महाविद्यालयाच्या सर्कलकडे पोहोचताच अचानक त्यांचा ताफा थांबला. त्यांची गाडी थांबलेली पाहताच सुरक्षा यंत्रणेची अक्षरशः भांबेरी उडाली. मुळात त्या का थांबल्या हे कुणाच्याच लक्षात आले नाही. अचानक त्यांची गाडी थांबलेली पाहून विद्यार्थी सुद्धा अचंबित झाले. त्यांना सुद्धा कळेना की राष्ट्रपतींची गाडी का थांबली. खरे तर राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना लांबूनच पाहिले होते. विद्यार्थी त्यांच्यासाठी हात उंचावत होते ते त्यांनी लांबूनच व्यवस्थित हेरले व विद्यार्थ्यांच्या जवळ येतात आपली गाडी थांबवली.
गाडीतून उतरून त्या चक्क जिकडे विद्यार्थी व शिक्षक उभे होते तिथपर्यंत चालत गेल्या. त्यांच्याबरोबरच राज्यपाल श्रीधन पिल्ले व मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये येऊन मिसळले . त्यांनी काही क्षण विद्यार्थ्यांशी हितगुज केले व काही विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप सुद्धा केले. साक्षात राष्ट्रपतींना आपल्यासमोर व आपल्या सोबत पाहून विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही . काही विद्यार्थ्यांनी सदरचे क्षण आपल्या मोबाईल मध्ये बंदिस्त सुद्धा केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या जवळ बोलावून घेतले.
थोडक्यात त्या आल्या.. त्यानी पाहिले.. व त्या जिंकल्या असा काही माहोल त्यांनी त्या दहा मिनिटात तयार केला.