दोन हजार पत्रकार जमतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 10:32 PM2019-03-06T22:32:31+5:302019-03-06T22:32:59+5:30
कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अधिवेशनासाठी मी गेल्या आठवड्यात म्हैसूरला जाऊन आलो. तेथे हजारोंच्या संख्येने पत्रकार जमलेले पाहून मला आश्चर्यच वाटले.
- राजू नायक
कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अधिवेशनासाठी मी गेल्या आठवड्यात म्हैसूरला जाऊन आलो. तेथे हजारोंच्या संख्येने पत्रकार जमलेले पाहून मला आश्चर्यच वाटले.
कर्नाटक हे प्रगतीशील राज्य आहे. तेथील वृत्तपत्रसृष्टीही समृद्ध आहे. परंतु, एका अधिवेशनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार जमणे हा विक्रमच म्हणावा लागेल. देशात अनेक मोठी राज्ये आहेत. त्यांचीही एवढी मोठी अधिवेशने होत नाहीत. कर्नाटकातील अधिवेशनासाठी गोव्यातून मी व श्रीलंका व नेपाळचाही प्रत्येकी एक प्रतिनिधी आला होता.
मी माझ्या भाषणात पत्रकारांचा महासंघ बनविण्याची आवश्यकता मांडली. गोव्यासह पश्चिम व दक्षिण राज्यांचे परस्परांशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, त्यावर नेते खल करतातच; परंतु पत्रकारांनाही भूमिका मांडण्यासाठी परस्पर सौहार्दाने काम करता आले पाहिजे. म्हादईचा प्रश्न आहे. गोवा व कर्नाटकने या बाबतीत अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे. कर्नाटकात तर हिंसाचाराची भाषा केली जाते. गोव्यासारख्या चिमुकल्या राज्याने या प्रश्नावरील कायदेशीर बाबींवरच १० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. वास्तविक दोन्ही राज्यांमधील पत्रकार एकत्र येऊन परिस्थितीचे तटस्थ अवलोकन करू शकतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, केरळला ग्रासणारा प्रश्न आहे तो पश्चिम घाटांच्या संवर्धनाचा. केरळमध्ये गेल्या पावसाळ्यात प्रलय येऊन जो हाहा:कार निर्माण झाला त्याला केरळ राज्याने पश्चिम घाटांवर केलेली कुरघोडी कारण झाली. केरळने वारेमाप धरणे बांधली व पश्चिम घाटांना वेसण घालण्याचा जो प्रयत्न केला तो अश्लाघ्य होता, असे आता सांगितले जाते.
पत्रकार अभिनिवेशाने आपल्याच राज्याची भूमिका पुढे दामटतात. विस्तृत भूमिका मांडली जात नाही. पर्यावरणाच्या प्रश्नाबाबत तर असा अभिनिवेश योग्य नाही. दुर्दैवाने पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांना विषयाची जाणीव करून दिली तरी खूप काही होऊ शकेल.
म्हैसूर अधिवेशनात पत्रकारांसाठी आचारसंहिता, वेतनवाढ, पत्रकार भवन आदींची चर्चाही झाली. कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रचारी थाटाचे भाषण केले. पत्रकारांची नेतेमंडळी राजकारण्यांचा अनुनय करीत होती, ते खटकले; परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची उपस्थिती आणि त्यांचा चर्चेतील सहभाग वैशिष्ट्यपूर्ण आणि दिलासादायक होता. कर्नाटकातील प्रमुख वृत्तपत्रे चार-पाचच आहेत, त्यातही कानडी वृत्तपत्रे अग्रेसर आहेत; परंतु प्रत्येक जिल्ह्यात तीन-चार कानडी वृत्तपत्रे निघतात आणि ती दमदारपणे वाचकांवर गारुड घालून आहेत, हे चित्र निश्चित आम्हा पत्रकारांसाठी अभिमानास्पद होते.