मोले चेक नाक्यावरून सहीसलामत दारू सुटण्याचा प्रकार थांबणार कधी?
By आप्पा बुवा | Published: June 23, 2023 05:30 PM2023-06-23T17:30:17+5:302023-06-23T17:30:44+5:30
गोव्यातून हैदराबाद येथे जाणारा टी.एस ०५- युई - ८८४५ क्रमांकाचा ट्रक शुक्रवारी पहाटे रामनगर पोलिसांनी पकडला.
गोव्यातील दारू बिनबोभाट सीमारेषा पार करून कर्नाटकात जाण्याचे प्रमाण चालूच असून, पुन्हा एकदा तेथील पोलिसांच्या सतर्कता मुळे पन्नास लाखाची दारू पकडण्यात आली आहे. रामनगर येथील पोलिसांनी शुक्रवारी पहाटे बिस्कीटवाहू ट्रकमधून बेकायदेशीरपणे सुमारे २५०० लिटर दारूची वाहतूक करणारा ट्रक जप्त केला.
या प्रकरणी ट्रक चालक कटाबल्ली नागाचारी ( तेलंगणा) याला अटक करण्यात आली असून, ट्रकमधील एकूण ५२,५०,००० रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.सदरची मोठी कारवाई करताना मागच्या तीन महिन्यात मोले येथून निसटलेली किमान दोन कोटीची दारू पकडण्यात कर्नाटक पोलिसांना यश आले आहे , तर ह्या प्रकरणांमुळे गोवा अबकारी चेक नाक्याची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे दारू वाहतूक होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोव्यातून हैदराबाद येथे जाणारा टी.एस ०५- युई - ८८४५ क्रमांकाचा ट्रक शुक्रवारी पहाटे रामनगर पोलिसांनी पकडला. सुरुवातीला ट्रक मधून एका नामांकित कंपनीची बिस्कीट वाहतूक करीत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. नेहमीप्रमाणेच पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्याना संशय आला.त्यानी सखोलपणे ट्रकची तपासणी केली असता त्याना त्यात १४० दारूचे बॉक्स आढळून आले. जोयडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक नित्यानंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बसवराज माबनुर व अन्य पोलिसांनी सदर कारवाई केली.
गोवामधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनातून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री पासून पोलीस वाहतूक होणाऱ्या ट्रकवर नजर ठेवून होते. प्रत्येक वाहनाची त्यानी कसून चौकशी सुरू ठेवली होती.शुक्रवारी पहाटे एक ट्रक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गोव्यातून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणारी वाहने काही महिन्यांपूर्वी अनमोड येथे जप्त करण्यात आली होती. परंतु शुक्रवारी पहाटे मोठ्या ट्रकमधील दारू जप्त केल्याने रामनगर परिसरातील लोक एवढ्या किमतीची दारू गोवा चेक नाक्यावरून सुटलीच कशी म्हणून आश्चर्य व्यक्त करीत आहेत.