तुम्ही फिरत राहिलात आम्ही सरकार बनवले, पर्रिकरांचा दिग्विजय सिंहांना टोला
By admin | Published: March 31, 2017 06:46 PM2017-03-31T18:46:51+5:302017-03-31T18:46:51+5:30
गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नाही.
ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 31 - ‘गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नाही. तुम्ही गोव्यात फिरत राहिलात आणि इकडे आम्ही सरकार बनवले’ हे उद्गार आहेत गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे. राज्यसभेत दिग्विजय सिंगांचे नाव न घेता (मात्र त्यांच्याकडे पाहत) पर्रिकर बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शुक्रवारी शून्यप्रहरात अचानक पर्रिकर राज्यसभेत अवतरले आणि सभागृहात काही काळ घोषणाबाजी झाली.
गोव्यात 22 आमदारांच्या पाठिंब्यावर 14 मार्च रोजी पर्रिकरांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तथापि राज्यसभेचा त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. माजी संरक्षण मंत्र्यांचे सभागृहात आगमन होताच, सभापतींच्या आसनासमोर काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरू झाली. भाजपाने गैरमार्गाचा अवलंब करीत गोव्यात बहुमत मिळवले, असा आरोप काँग्रेस सदस्य करीत होते. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे सदस्यही मग आपापल्या जागेवर उठून म्हणाले, सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ तुमच्याकडे होते कुठे, तुम्ही तर पाठिंब्याचे केवळ आकडेच फुगवित बसला होता.
दरम्यान, काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी पर्रिकरांना प्रश्न विचारला तेव्हाही सभागृहात गोंधळ सुरूच होता. उपसभापती कुरियन त्यांचा बचाव करीत म्हणाले, किमान पक्षी महिला सदस्यांचा तर सन्मान ठेवा. यानंतर पाटील यांनी रासायनिक खतांबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्रिकर बोलायला उभे राहताच काँग्रेसचे राजीव गौडा, हुसेन दलवाई, रजनी पाटील यांनी व्हेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. पाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजयसिंग व बी. के. हरिप्रसादही पर्रिकरांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. तेव्हा संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी मिश्कीलपणे म्हणाले, पर्रिकरांनी दिग्विजय सिंगांना यापूर्वीच ‘खास धन्यवाद’ दिले आहेत.
गोव्यात काँग्रेसला 40 पैकी सर्वाधिक 17 तर भाजपाला 13 जागा मिळाल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्डच्या प्रत्येकी 3 अशा 6 आमदारांनी, राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमाव व अन्य २ आमदारांनी पर्रिकरांना पाठिंबा दिल्यामुळे २२ सदस्यांच्या बळावर गोव्यात भाजपने सरकार बनवले.