भाजपच्या महिला कुठे? केंद्रीय नेतृत्वाची सूचना अन् गोव्यातील नेत्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2024 09:20 AM2024-03-05T09:20:24+5:302024-03-05T09:22:00+5:30
गेल्या ३० वर्षांत एकदाही गोव्यात महिलांमधून कुणी भाजप प्रदेशाध्यक्ष होऊ शकले नाही.
भाजपने गोव्यात कधी महिलांना महत्त्वाची पदे देण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या ३० वर्षांत एकदाही गोव्यात महिलांमधून कुणी भाजप प्रदेशाध्यक्ष होऊ शकले नाही. पक्षाने कुणा महिलेला त्या पदासाठी पुढे आणलेच नाही, भाजपने कधीच महिलांना लोकसभेचे तिकीट दिले नाही. उमेदवारी देणे सोडा, नावदेखील कधी शॉर्ट लिस्ट केले नाही. महिला शक्तीचा वापर हा पणजीत कधी तरी बाबूश मोन्सेरात यांचा निषेध करण्यासाठी केला जात होता. तेच बाबूश महाशय भाजपच्या मंत्रिमंडळात पोहोचले. कुंदा चोडणकर, पूर्वी शीतल नाईक तसेच अन्य अनेक महिलांना भाजपमध्ये हवा तेवढा न्याय मिळाला नाही. आता रोहन खंवटे हे सावंत मंत्रिमंडळात असून, ते भाजपचे बार्देशचे महत्त्वाचे नेते झाले आहेत. डिचोलीच्या शिल्पा नाईक यांच्यावर तात्पुरता राजकीय संन्यासच घेण्याची वेळ आली.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिलेला उमेदवारी द्यायला हवी, अशी सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केली. यामुळे सध्या भाजपचे गोव्यातील नेते महिला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करत आहेत.
सुलक्षणा सावंत यांना भाजपमध्ये कायम वाव मिळाला, अर्थात त्या स्वतः सक्रिय असल्याने त्यांना नशिबाचीही साथ मिळत गेली, दिव्या राणे भाजपमध्ये स्वतःच्या बळावर आमदार झाल्या. त्यांना काही भाजपने घडवले नाही. सुवर्णा तेंडुलकर किंवा अन्य काही महिलांना भाजपमध्ये संधी मिळाली. पण भाजपमध्ये प्रोत्साहन मिळाले व त्यामुळे आपण आमदार झालो, असे सहसा कुणी महिला सांगू शकणार नाही. डिलायला लोबो किंवा जेनिफर मोन्सेरात ह्या आयात आमदार आहेत. त्यांनी उलट भाजपच्या पुरुष उमेदवारांचा एकेकाळी पराभव केला व विधानसभेत प्रवेश केला, विद्या गावडे, रंजिता पै वगैरेंना भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. काही महिला सरपंच झाल्या तर काही नगरसेविका झाल्या.
मात्र, भाजपच्या सध्याच्या मंत्रिमंडळातदेखील कुणीच महिला नाही. महिला आमदारांकडे क्षमता असूनही त्यांना मंत्रिपद नाही. याउलट कापतलो, दामतलो अशा धमक्या वगैरे देणारे सध्याच्या मंत्रिमंडळात आहेत, ज्या भाऊसाहेब बांदोडकर यांना वर्षातून दोनवेळा भाजपचे नेते श्रद्धांजली वाहतात, त्या बांदोडकर यांच्या म. गो. पक्षाने गोव्याला पहिली महिला मुख्यमंत्री दिली होती. आतापर्यंत तीच पहिली व शेवटची ठरली आहे. त्याच म. गो. पक्षाने संयोगिता राणे यांच्या रूपात गोव्याला पहिल्या महिला खासदार दिल्या होत्या, त्यानंतर गोव्यात कुणी महिला कोणत्याच पक्षाकडून खासदार होऊ शकली नाही, गोव्यातील भाजपला आता दक्षिणेत योग्य त्या महिलेला तिकीट देण्याची संधी आहे. ही संधी दिल्याबाबत खरे म्हणजे मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानायला हवेत.
दामू नाईक, नरेंद्र सावईकर आणि बाबू कवळेकर या तीन इच्छुक उमेदवारांची नावे भाजपने पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीकडे पोहोचवली होती, मात्र, गोव्यात चला आणि महिला उमेदवारांचा शोध घेऊन दक्षिणेतून तीन नावे पाठवा, अशी सूचना समितीकडून ऐकायला मिळाली. आता दक्षिणेत प्रभावशाली महिला कोण आहेत? याचा शोध भाजपचे नेते घेत आहेत. केंद्रीय नेतृत्वाने महिला उमेदवार शोधण्याची केलेली सूचना गोव्यातील नेत्यांनी गुप्त ठेवली होती. भाजपच्या कोअर टीम बैठकीत काल मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांना माहिती दिली.
महिला उमेदवार शोधावा लागेल, याची कल्पना आता सर्वांनाच आली आहे. दिगंबर कामत यांना लोकसभेचे तिकीट देण्यास भाजपचे नेतृत्व तयार होते. पण कामत यांना दिल्लीत जाण्याची इच्छा नाही. गोव्याचे काही मंत्रीही कामत यांना दिल्लीला पाठविण्यास आतुर होते, पण आपले मित्र हे धूर्त व चतुर राजकारणी आहेत, ते आपल्याला प्रेमापोटी नव्हे तर वेगळ्या हेतूने खासदारकीच्या खुर्चीवर बसवू पाहतात, हे कामत यांनी जाणले, भाजपने जर दक्षिणेत महिलेला निवडून आणले तर तो नवा इतिहास ठरेल. गोव्यात काँग्रेसने पूर्वी निर्मला सावंत, सुलोचना काटकर आदींना प्रदेशाध्यक्षपद दिले होते. भाजपला पुढील काळात प्रदेशाध्यक्षपद महिलेला देण्याचे धाडस व मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल, भाजपच्या कोअर टीममध्येही एकसुद्धा महिला नाही.