त्या पार्टीत ड्रग्स आले कुठून...?

By admin | Published: April 22, 2015 01:48 AM2015-04-22T01:48:10+5:302015-04-22T01:48:23+5:30

मडगाव : मायणा-कुडतरी येथील एलिस्टन डिमेलो याच्या वाढदिवसाच्या पार्टीत बळी पडलेल्या रॉडसन मोन्तेरो व पराज रायकर यांच्यासह

Where did drugs come from that party ...? | त्या पार्टीत ड्रग्स आले कुठून...?

त्या पार्टीत ड्रग्स आले कुठून...?

Next

मडगाव : मायणा-कुडतरी येथील एलिस्टन डिमेलो याच्या वाढदिवसाच्या पार्टीत बळी पडलेल्या रॉडसन मोन्तेरो व पराज रायकर यांच्यासह पार्टीत सहभागी झालेल्यांना पार्टीत अमली पदार्थांचा पुरवठा कुठून झाला, बर्थ डे पार्टीत ड्रग्सचा साठा कुणी पुरवला याबाबत मायणा-कुडतरी पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणात मॅथ्यू नावाच्या इसमाचे नाव पुढे आले असून सध्या फरार असलेल्या या मॅथ्यूचा शोध पोलीस घेत आहेत. मॅथ्यू सापडल्यास या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचा दावा पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक यांनी केला आहे. डीजे एलिस्टन डिमेलोच्या पार्टीत युवकांचा गोतावळा जमा होऊन दुपारी एकपासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत नॉनस्टॉप पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाला असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
मायणा-कुडतरी पोलिसांना ही घटना एक आव्हान बनले असून दोन युवकांचा बळी गेल्यामुळे संपूर्ण दक्षिण गोव्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. डिमेलोच्या पार्टीत सहभागी झालेल्या युवकांच्या पालकांचे धाबे दणाणले असून मायणा-कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी पार्टीत सहभागी झालेल्या सोळा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पार्टीत शेवटपर्यंत मयत रॉडसन मोन्तेरो व पराज रायकरसह इतर आठ युवक होते. या आठही जणांवर पोलिसांचा संशय असून पार्टीत शेवटपर्यंत सहभागी झालेल्या त्या आठ युवकांकडून पोलीस माहिती गोळा करीत आहेत. पोलिसांना या चौकशीत काही धक्कादायक माहिती हाती लागली असून फरार असलेल्या मॅथू व बर्थ डे बॉय एलिस्टन डिमेलो यांच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. फरार असलेला मॅथ्यू या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असून मॅथ्यूच्या मागावर पोलीस आहेत. संपूर्ण गोव्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेमुळे दक्षिण गोव्यातील अमली पदार्थांचे काही अड्डे उजेडात आले आहेत. मडगावच्या स्टेशन रोड भागात, केपेच्या सनसेट इलाका, किनारी क्षेत्रातील भाग प्रकाशात आले आहेत. डीजेच्या नावावर धांगडधिंगा घालणाऱ्या कार्यक्रमात अमली पदार्थांचे मुक्तपणे सेवन होत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. या पार्टीत होली वॉटरच्या नावावर खास अमली पदार्थाचे सेवन केले जात होते. हे होली वॉटरचे प्रकरण काय आहे याबद्धल पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, मायणा-कुडतरी पोलिसांनी रॉडसन मोन्तेरा व पराज रायकर यांचा व्हिसेरा व रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. या संदर्भात अहवाल आल्यानंतरच दोघांच्याही मृत्यूचे कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवचिकित्सा अहवालात कोणत्याही जखमेच्या खुणा मयतांच्या अंगावर आढळल्या नसल्यामुळे अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Where did drugs come from that party ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.