सुभाष वेलिंगकर गेले कुठे? शोध सुरू; शेकडो आंदोलनकर्त्यांचा सासष्टीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2024 01:40 PM2024-10-06T13:40:42+5:302024-10-06T13:41:41+5:30

ख्रिस्ती बांधव आक्रमक; अखेर मडगाव येथे लाठीमार, वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

where did subhash velingkar go start the search hundreds of protestors were arrested | सुभाष वेलिंगकर गेले कुठे? शोध सुरू; शेकडो आंदोलनकर्त्यांचा सासष्टीत ठिय्या

सुभाष वेलिंगकर गेले कुठे? शोध सुरू; शेकडो आंदोलनकर्त्यांचा सासष्टीत ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविरोधात हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्यभर त्याचे पडसाद उमटले व आंदोलने होत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी राज्यभरातून होत आहे. पोलिस स्थानकात तक्रारी दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वेलिंगकर यांनी आपली अटक चुकवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. वेलिंगकर यांनी पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. पोलिसही त्यांचा शोध घेत आहेत.

वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली, तरीही न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिलेला नाही. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवार दि.७ रोजी सुनावणी ठेवली आहे. न्यायालयाने डिचोली पोलिसांना नोटीस बजावली आहे. वेलिंगकर यांनी केलेल्या या विधानप्रश्नी आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सेंट फ्रान्सिस झेव्हियर हे गोंयचे साहेब नाहीत, त्यांची डीएनए चाचणी करावी, असे विधान वेलिंगकर यांनी केले आहे. त्यांच्या विधानानंतर मोठा वाद उसळला असून राज्यातील विविध पोलिस स्थानकांवर ख्रिश्चन बांधवांनी धडक मोर्चा नेला आहे. वेलिंगकर यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी ते करीत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

'ते' घरी नाहीत, मोबाइलही बंद...

दरम्यान, वेलिंगकर हे भूमिगत झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या पणजी येथील घरी जाऊन शोध घेतला. मात्र ते घरी नव्हते. ते कुठे आहेत, याची माहिती कुणालाही नाही. तसेच आता त्यांचा मोबाइलही बंद आहे. त्यामुळे वेलिंगकर कुठे आहेत? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. मात्र, त्यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वाद वाढू लागला आहे.

तसेच सरकारवरसुद्धा त्यांना अटक करण्यासाठी दबाव पडू लागला आहे. आपल्याला अटक होणार या भीतीनेच वेलिंगकर यांनी पणजी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

वेलिंगकर समर्थकांची पर्वरीत बैठक 

वेलिंगकर समर्थकांची बैठक रविवारी सकाळी पर्वरी येथे होणार असून, पुढील कृती तिथे ठरवली जाईल, असे सांगण्यात आले. हिंदू जनजागृतीचे सत्यविजय नाईक, गोविंद चोडणकर, आत्माराम गांवकर, गोविंद साखळकर, भगवान हरमलकर, मुकुंद कवठणकर, मंदार गावडे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी नितीन फळदेसाई, सत्यविजय नाईक यांनी वेलिंगकर यांच्या विधानाचे समर्थन केले आणि हिंदूरक्षा महाआघाडी, इतर हिंदुत्ववादी संघटना वेलिंगकर यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

मडगावात पाचशे आंदोलनकर्त्यांचे रास्तारोको आंदोलन

हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. त्यामुळे आम्हा सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्या, असा दावा करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी दुसऱ्या दिवशीही करण्यात आली. त्यांच्या विरोधात दक्षिण गोव्यातील शेकडो संतप्त आंदोलनकर्त्यांनी शनिवारी दुपारी जुने सर्कल आणि कदंब बसस्थानकाजवळचा रस्ता रोखला व वाहतूक ठप्प केली.

दुपारी १२ वाजल्यापासून सुमारे ४०० ते ५०० आंदोलनकर्ते जुने सर्कलजवळ ठाण मांडून बसले होते. तसेच हे आंदोलनकर्ते पोलिसांना न जुमानता येणाऱ्या वाहनांना अडवून परतवत होते. त्यामुळे शाळकरी मुले, कामावरून घरी परतणारे कामगार, व्यावसायिक, पायलट, प्रवासी तसेच पर्यटकांना चालत १ ते २ किलोमीटर पायपीट करावी लागली. कडक उन्हात पर्यटक व प्रवाशांना आणखी त्रास झाला.

ख्रिस्ती आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव

धार्मिक भावना दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटक करावी, या मागणीसाठी ख्रिस्ती आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर दबाब आणण्यास सुरुवात केली आहे. वेलिंगकर यांच्या वक्तव्याने खिस्ती धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून, लोक खवळले आहेत. त्यामुळे ताबडतोब कारवाई करण्यात यावी, असे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

नुवेचे आमदार तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले की, या विषयावर मी मुख्यमंत्र्यांकडे बोललो आहे. वेलिंगकर यांना शंभर टक्के अटक होईल. ते ज्या ठिकाणी आहेत, तेथे शोधून काढून त्यांना अटक करण्यात येईल. मुख्यमंत्री स्वतः सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मी सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. कारवाईपासून कोणीही सुटणार नाही, त्यामुळे लोकांनी संयम बाळगावा.'

सर्वधर्मियांच्या रक्तात सेंट झेव्हियरचा डीएनए : सिक्वेरा

वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या शवाची डीएनए चाचणी व्हावी, यासंबंधी केलेल्या मागणीवर बोलताना सिक्वेरा म्हणाले की, गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये सेंट झेव्हियरचा डीएनए आहे. याचा पुरावा म्हणजे जुने गोवे चर्चला भेट देणाऱ्या सर्वधर्मियांची वाढती संख्या होय. लोकांचा विश्वास नसता, तर दररोज एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्या दर्शनासाठी कोणी आलेच नसते.'

 

Web Title: where did subhash velingkar go start the search hundreds of protestors were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.