कुठे गेले 500 कोटी रुपये, मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 08:20 PM2017-12-28T20:20:57+5:302017-12-28T20:23:20+5:30

सर्व मतदारसंघांतील रस्ते वगैरे बांधण्यासाठी सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याला पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात आमच्या मतदारसंघांमध्ये गेले आठ महिने एक रस्ता देखील होत नाही.

Where has gone up to 500 crores, Minister Kadadale in the cabinet meeting | कुठे गेले 500 कोटी रुपये, मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री कडाडले

कुठे गेले 500 कोटी रुपये, मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री कडाडले

Next

पणजी : सर्व मतदारसंघांतील रस्ते वगैरे बांधण्यासाठी सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याला पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात आमच्या मतदारसंघांमध्ये गेले आठ महिने एक रस्ता देखील होत नाही. कुठे गेले ते पाचशे कोटी रुपये असा संतप्त प्रश्न क्रिडा मंत्री तथा पेडण्याचे आमदार बाबू आजगावकर यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला व या विषयावर चर्चा करण्यास मंत्रिमंडळाला भाग पाडले.
जीएसटीचे कारण सांगून बांधकाम खात्याचे अभियंते फाईल्स पुन्हा पुन्हा परत पाठवतात. आपल्या मतदारसंघात रस्ते व्हायला हवे म्हणून प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी, खर्चविषयक मंजुरी वगैरे मिळाली तरी देखील संबंधित अभियंत्यांकडून निविदा जारी केली जात नाही तर कधी निविदा काढली तरी, कामाचा आदेशच दिला जात नाही. निधी उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळते. मग पाचशे कोटी रुपये गेले तरी, कुठे असा प्रश्न करत आजगावकर अक्षरश: कडाडले. आजगावकर बोलत राहिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काही भाष्य केले नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्री आजगावकर यांचे शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला. बांधकाम खात्याकडे कामांसाठी निधी आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. गावडे नामक जो कुणी अभियंता तुमची दिशाभुल करतो, त्याच्याविरुद्ध आपण कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीवेळी स्पष्ट केल्याचे काही मंत्र्यांनी बैठकीनंतर लोकमतला सांगितले. आम्ही निवडून येऊन आता नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला पण रस्ता देखील होत नाही असे मंत्री आजगावकर यांनी बैठकीत नमूद करताच पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनीही काहीसा तसाच सूर लावला. जर फेब्रुवारीमध्ये रस्त्यांच्या निविदा निघाल्या तर, पुढील पावसाळा येईर्पयत म्हणजे जून महिन्यार्पयत रस्त्यांची कामेच होणार नाहीत म्हणून प्रक्रियेला वेग देण्याची गरज आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी नमूद केल्याचे सुत्रांनी सांगितले.

पत्राबाबत माविनचे निरीक्षण 
म्हादई पाणी तंटाप्रश्नी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकमधील भाजप नेते येडीयुरप्पा यांना जे पत्र दिले आहे, त्यामागिल हेतू चांगला असेल. त्यातून काही गैर घडणारही नसेल, ते पत्र कायद्याच्यादृष्टीकोनातून योग्य असेल पण लोकांमध्ये मात्र त्या पत्रमुळे गैरसमज निर्माण झाला आहे, असे निरीक्षण गुदिन्हो यांनी बैठकीत नोंदविले. त्या पत्रामुळे सार्वजनिक दृष्टीकोन कलुषित झाला आहे, त्याविषयी सरकारने पाऊले उचलावीत असे गुदिन्हो म्हणाले. आमचे सरकार ज्यावेळपासून अधिकारावर आले आहे, त्यावेळपासून लोकांचा समज कलुषित झाला आहे. कारण आम्ही अल्पसंख्येत असताना सरकार स्थापन केले, असे मंत्री विजय सरदेसाई यांनी गुदिन्हो यांना सांगितले व त्या पत्रामुळे सध्या गैरसमज निर्माण झालेला असला तरी, सध्या काही गोव्यात विधानसभा निवडणुका नाहीत असे सरदेसाई यांनी गुदिन्हो यांच्यासमोर स्पष्ट केले. निवडणुका येईपर्यंत आम्ही चांगले काम करून दाखवले तर लोकांची मने प्रदूषित राहणार नाहीत, ती स्वच्छ होतील, असे मंत्री सरदेसाई म्हणाले.

Web Title: Where has gone up to 500 crores, Minister Kadadale in the cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा