जिथं सत्ता, तिथं मी, भाजपसोबत राहणार असल्याचे बाबू आजगावकरांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 10:46 PM2018-09-17T22:46:34+5:302018-09-17T22:47:12+5:30
सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळात ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा द्यावा, असा प्रस्ताव मगोपने भाजपला दिला.
पणजी : राज्यात जिथे सत्ता आहे, तिथे मी असेन. मगो पक्षातही मी सत्तेसाठीच आलो, असे पर्यटन मंत्री असलेले मगोपचे नेते बाबू आजगावकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले. मी पक्षातून फुटून जाणार नाही. आम्ही सगळे भाजपप्रणीत आघाडी सरकारसोबतच आहोत. मनोहर पर्रीकर हेच आमचे मुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम बऱ्यापैकी सुरू आहे, ते इस्पितळात असले तरी, त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलेले नाही व त्यामुळे आम्ही दुसरा मुख्यमंत्री कोण असावा याबाबत बोलू शकत नाही, असेही मंत्री आजगावकर म्हणाले.
सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळात ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा द्यावा, असा प्रस्ताव मगोपने भाजपला दिला. त्याला गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांनी आक्षेप घेतला. तथापि, भाजपचे निरीक्षक त्याविषयी काय तो निर्णय घेतील. सरदेसाई वगैरे एकूण सहा आमदार एकत्रितपणो निरीक्षकांना भेटायला गेले होते. त्यांनी जर आम्हाला बोलावले असते तर आम्हीही त्यांच्यासोबत गेलो होतो. पण, सहा स्वतंत्रपणे का गेले ते आम्हाला ठाऊक नाही. तरीही ते आणि आम्हीदेखील भाजप सरकारसोबतच आहोत, असे मंत्री आजगावकर म्हणाले. आम्ही प्रसंगी विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याहीवेळी तयार आहोत. विद्यमान सरकार स्थिर व भक्कम आहे. र्पीकर आजारातून बरे होऊन येतील, असेही आजगावकर म्हणाले.
आमचा प्रस्ताव कायम
दरम्यान, मगो पक्षाचे तिन्ही आमदार संघटीत आहेत. आमचे राजकीय विरोधक मगो फुटत असल्याची अफवा पसरवत आहेत. मगोचे आमदार संघटीतच राहतील, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी सांगितले. गोव्यातील खनिज खाणी लवकर सुरू व्हायला हव्यात अशी भूमिका आम्ही घेतली आहे. मुख्यमंत्री म्हणून र्पीकर हेच कायम आहेत व ते आम्हाला मान्य आहे. तथापि, मुख्यमंत्रीपदाचा ताबा जर द्यायचा झाला तर तो मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपविला जावा हा आमचा प्रस्ताव आम्ही भाजपला दिला आहे. आमची ती भूमिका कायम आहे. तथापि, भाजपचे श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे ढवळीकर म्हणाले.
विलीनीकरण नाहीच
मगोपचे आमदार फुटतील या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये, असे आमदार दिपक पाऊसकर म्हणाले. आपण पणजीतील एका हॉटेलमध्ये रात्री थांबलो होतो. आपण भाजपच्या निरीक्षकांना स्वतंत्रपणो भेटलो नाही, असे पाऊसकर म्हणाले. मगो पक्षाचे विलीनीकरण कधीच केले जाणार नाही. कोणत्याच स्थितीत विलीनीकरण नाही ही आमची भूमिका आहे, असे अध्यक्ष ढवळीकर म्हणाले. सध्याच्या राजकीय स्थितीत आम्ही कोणत्याही परिणामांना तयार असून विधानसभा निवडणुकीस देखील सामोरे जाण्यास समर्थ आहोत, असे ते म्हणाले.