...तेव्हा ‘भाभासुमं’ कुठे होता?
By admin | Published: August 9, 2015 01:05 AM2015-08-09T01:05:59+5:302015-08-09T01:06:09+5:30
...तेव्हा ‘भाभासुमं’ कुठे होता?
पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंच नव्याने माध्यमप्रश्नी जे आंदोलन करत आहे, त्याला माझा पाठिंबा आहे; पण मी माध्यमप्रश्नी मातृभाषेच्या बाजूने भूमिका घेऊन आवाज उठवतो, या कारणास्तव कला अकादमी व मनोरंजन संस्थेवरून मला दोन वर्षांपूर्वी सरकारने काढले होते. त्या वेळी भाषा सुरक्षा मंच कुठे होता, असा प्रश्न भाजपचे आमदार विष्णू वाघ यांनी आता उपस्थित केला आहे.
वाघ येथे शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आता लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री बनल्याने भाषा सुरक्षा मंच नव्याने आंदोलन करत असावा. त्या अर्थाने भाषा सुरक्षा मंचला उशिरा जाग आली आहे. मी माध्यमप्रश्नी बोलल्यामुळे मला सरकारने दोन पदांवरून हटविले होते, तेव्हा एकही ‘मायचा पुत’ पुढे आला नाही. आता पार्सेकर मुख्यमंत्री बनल्यानंतर मंचला तोंड फुटले.
वाघ म्हणाले की, भाषा सुरक्षा मंचने यापूर्वी तडजोड करून माघार घेतली होती. मात्र, आता पुन्हा माघार न घेता निर्णायक भूमिका घ्यावी. माध्यम प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावूनच या मंचने शांत बसावे. तत्पूर्वी तडजोड करू नये. माझा पाठिंबा मंचला आहेच.
डायोसेझनच्या सध्याच्या ज्या इंग्रजी शाळांना अनुदान मिळते, ते २०१६ सालच्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभापर्यंत सुरू राहावे. त्यानंतर मात्र सुरू राहू नये, अशी भाषा सुरक्षा मंचची भूमिका आहे. याबाबत जेव्हा विधानसभेत विधेयक येईल, तेव्हा मी माझी भूमिका मांडीन.
आम्ही विधेयक विधानसभेत सादर होईल, असे म्हटले आहे; पण इंग्रजी समर्थकांना जसे विधेयक हवे, तसेच ते असेल किंवा आम्ही विधेयक त्यांना हवे तशा तरतुदी घालून संमत करू, असे मुळीच म्हटलेले नाही.
(खास प्रतिनिधी)