कोणत्या विवशतेतून घडला विश्वजित राणेंच्या ऑडिओ क्लीपचा प्रकार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 11:52 PM2019-01-06T23:52:41+5:302019-01-06T23:53:36+5:30

विश्वजित राणे तसे नक्कीच बोलले आहेत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ती बित्तंबातमी पोहोचविण्याची कल्पनाही त्यांचीच. परंतु, कोणत्या विवशतेतून हा प्रकार घडला?

Which compulsion was the type of audio clip of Vishwajeet Rane? | कोणत्या विवशतेतून घडला विश्वजित राणेंच्या ऑडिओ क्लीपचा प्रकार ?

कोणत्या विवशतेतून घडला विश्वजित राणेंच्या ऑडिओ क्लीपचा प्रकार ?

Next

राजू नायक

गर्दीत गारद्यांच्या गाफील राजकारणी 

गेल्या गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे गोव्यातील नव्हे तर येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणा-या एकूणच भाजपा नेत्यांचा चांगलाच मुखभंग झालाय.

भाजपाचा एक ज्येष्ठ नेताच बोलत असल्यामुळे पंतप्रधानांपासून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वाची फजिती झाली. अनेकांचा, खुद्द गोव्यातही विश्वजित राणेंच्या वक्तव्यावर विश्वास बसला. पर्रीकर असे बोलूू शकतात, असे काही राष्ट्रीय वाहिन्यांनीही म्हटले. एक तर पर्रीकरांची अघळपघळ बोलण्याची सवय व दुसरे सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. प्राप्त परिस्थितीनुसार पर्रीकर तसे बोलले असू शकतात, असा अंदाज. नाही तर एवढे गंभीर आजारी असतानाही त्यांना त्या पदावर ठेवण्याचे प्रयोजन काय?

या प्रकरणाला केवळ विश्वजित राणे हेच जबाबदार आहेत काय?

माझ्या मते नाहीत. विश्वजित राणेंच्या फटकळ व अतिमहत्त्वाकांक्षी स्वभावाने त्यांनी हा वाद ओढवून घेतला, यात तथ्य आहे.

विश्वजित राणेंना मुख्यमंत्री बनायचे होते. त्यासाठी त्यांनी गोव्यात व दिल्लीतही चांगलेच लॉबिंग केले होते. गोव्यात आणि दिल्लीतही ते अनेक नेत्यांच्या घरी जाऊन पाया पडून आले होते. परंतु, भाजपा म्हणजे काही काँग्रेस नाही याचाही त्यांना पडताळा आला. ते अमित शहा यांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. अमित शहा त्यांना दरवाजार्पयत पोहोचवायला आले अन् म्हणाले, ‘तुम्ही पक्षात नवे आहात, पक्षाची विचारधारा अजून तुमच्या पचनी पडलेली नाही. आणखी काही काळ तुम्ही पक्षासाठी काम करा. त्यानंतरच तुमचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार होईल.’ त्या तुलनेने काँग्रेसच्या अनेक मुख्यमंत्र्यांकडे पाहा. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामधून  (आणि भाजपातूनही) अनेक नेते काँग्रेस पक्षात आले आणि मुख्यमंत्रिपद बळकावून बसले. आज तर या पक्षातील मुख्यमंत्रिपदाचे बाशिंग बांधून बसलेल्या नेत्यांकडे पाहा, त्यातील किती जणांना काँग्रेस पक्ष समजलेला आहे? 

वास्तविक विश्वजित राणे गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे, त्यांनी मनातून भाजपापासून काडीमोड घेतलाय.

जे लोक विश्वजित राणेंना ओळखतात, त्यांना माहीत आहे, विश्वजित खूपच ‘हायपर’ आहेत. त्यांना उच्छृंखल म्हटले जाऊ शकते. संयम हा शब्द त्यांच्या पोतडीत नाही. या बाबतीत ते स्वभावत: प्रतापसिंग राणे यांच्या विरोधी आहेत. राणोंनी इतकी वर्षे राजकारणात काढली, अनेक वर्षे ते मुख्यमंत्रिपदी होते; इतकी वर्षे सलग जिंकून येण्याचा विक्रम त्यांनी केला; परंतु तरी त्यांनी शांत, संयत स्वभाव जपला, जोपासला. त्या तुलनेत विश्वजित यांना राग लवकर येतो, त्यांचा धीर चेपतो आणि कदाचित मागचा पुढचा विचार न करता ते बोलतात, बेछूट बोलतात इतके की काही वेळा त्यांनाच खजील व्हायला होते!

यापूर्वी पर्रीकरांच्या आजारपणाबद्दल ते जे काही बोलून गेले त्यामुळेही त्यांना क्षमा मागावी लागली असेल. पर्रीकरांना स्वादुपिंडाचा आजार झाला आहे, आजार गंभीर आहे हे लोकांना माहीत होते; परंतु सरकार, डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीयही काही सांगत नव्हते, तोपर्यंत प्रसारमाध्यमे बोलू शकत नव्हती. अचानक विश्वजित यांनी 

आजार जाहीर केला. पर्रीकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा प्रकार आवडलेला नसेल; परतु त्या सर्वानी वेळ मारून नेली. कोणी त्या प्रकाराचा बाऊ केला नाही.

परंतु, परवाचा प्रकार त्यातला नाही.

राफेलसंदर्भात त्यांचे उद्गार निश्चित भाजपाला इजा पोहोचविण्याच्या दृष्टीने काढलेले आहेत. वास्तविक हा प्रकार- हा सगळा अट्टहास केंद्रीय मंत्र्यांना आणि मनोहर पर्रीकर यांना अडचणीत आणण्याच्याच दृष्टीने केलेला आहे, हे लपून राहात नाही.

 

कसे ते पाहा :

1 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपदावरून उतरविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांची राष्ट्रीय पातळीवर बदनामी करणे. राफेल सौद्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. आपण ती कधीही जाहीर करू शकतो, याची केंद्राला भीती असल्यानेच आपण मुख्यमंत्रिपदी तहहयात राहू असे अहंकारी वक्तव्य पर्रीकरांनी केले- म्हटले की पक्षश्रेष्ठींचाही त्यावर विश्वास बसेल. कारण, काही वेळा पर्रीकर उत्स्फूर्तपणे काहीबाही बोलून जातात व वाद ओढवून घेतात, असा इतिहास आहे.

 

2विश्वजित राणे गेले काही महिने अस्वस्थ आहेत. भाजपात त्यांचे मन विटले आहे आणि शक्य झाले तर या ‘अपमानाचा’- आपल्याला मुख्यमंत्रिपद न देण्याच्या प्रवृत्तीचा वचपा काढायचा- असे त्यांच्या मनाने घेतले आहे.

 

3काँग्रेस पक्षाशी संधान बांधून राणेंना हा डाव साधायचा होता. त्यासाठी त्यांनी लोकसभा अधिवेशनाचा मुहूर्त साधून गोव्यातील एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादकाला फोन केला. त्याच्या दिल्लीतील कनेक्शनद्वारे ही स्फोटक माहिती दिल्लीत पोहोचेल आणि दिल्लीत काँग्रेस नेत्यांना गहजब निर्माण करता येईल. पर्रीकरच अशी दर्पोक्ती व्यक्त करतात म्हटल्यावर पर्रीकरांवर गंडांतर येईलच; परंतु केंद्रातील नेतेही खजील होतील, अशी त्यांची अटकळ होती.

4अशी माहिती काँग्रेस नेत्यांना योग्य सूत्रांमार्फत पोहोचविली की विश्वजित यांच्याबद्दलचा विश्वास वाढीस लागेल व त्यांचा पुन्हा काँग्रेस पक्षात येण्याचा मार्ग निर्धोक बनेल. लक्षात घेतले पाहिजे की विश्वजित राणे यांनी किमान दोन वेळा काँग्रेस पक्षाचा जबर विश्वासघात केलेला आहे. दोन वेळा तर उमेदवारी मिळवूनही त्यांनी काँग्रेसला संपूर्ण फसविले. तरीही काँग्रेसने हे अपमान पचविले. आताही ती पचवेल (जिंकून येऊन अवघ्या पाच दिवसांत फितुरी!) असा ‘विश्वास’ त्यांना होता आणि त्यांना वाटत होते: राज्य काँग्रेसमध्ये मला विरोध करणारा एक तरी ‘हरीचा लाल’ आहेय काय?

ही सगळी कारणे विश्वजित राणे यांचीच ती ध्वनिफित आहे आणि ते जाणूनबुजून या इंग्रजी संपादकाशी बोलले याचा दुजोरा देण्यास पुरेशी नाहीत का?

मग विश्वजित राणे यांचे गणित कुठे चुकले?

पहिली गोष्ट म्हणजे, या इंग्रजी दैनिकाच्या संपादकाचे दिल्लीतील ‘वजन’ चालले नाही. तो इतके दिवस मी काँग्रेस पक्षात काहीही करू शकतो अशी शेखी मिरवायचा. दिल्लीने कधीच अशा पत्रकारांची ‘किंमत’ करून ठेवली आहे.

जे संपादक काँग्रेस नेत्यांचा वशिला लावून आपली वर्णी लावतात, त्यांची किंमत हे नेते काय लावत असतील, सांगायला हवे? वाचकांनीही अशा संपादकांची किंमत ठरविणे आवश्यक आहे. हे असले ‘एजंट’ राजकीय पक्षांचे काम करायला येथे बसले आहेत. ते या मातीतलेही नाहीत. त्यामुळे वाचकांना, पेपरांना शेंडी लावून ते कधीही राज्यातून जाऊ शकतात. त्याने जर आधी हा गौप्यस्फोट आपल्या ‘लोकप्रिय’ दैनिकात प्रसिद्ध केला असता आणि त्यानंतर ती ध्वनिफित त्याला ‘पाहिजे तेथे’ पाठविली असती तर कोणी हरकत घेण्याचे कारण नव्हते.

वास्तविक उभयतांमधला हा संवाद २० डिसेंबर रोजी घडला होता. दिल्लीत त्यावर काँग्रेस नेत्यांचे चर्वितचर्वण चालू होते. त्यानंतर राहुल गांधींनी ते ऐकायला आठवडा उलटवला. सर्वप्रथम त्या संबंधीचा उच्चार काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ दैनिकाने केला.

परंतु, ही ‘माहिती’ हातात आल्यावर काँग्रेस पक्ष भाजपा नेते व पर्रीकरांवर आगपाखड सुरू करतील हा विश्वजित राणे यांचा अंदाज चुकला.

काँग्रेस नेत्यांनी टीकेचा वर्षाव केलाच; परंतु त्यात विश्वजितनाही गोवून आपल्या बाणांवर विषही पेरून ‘फितूर’ विरोधकही जबरी घायाळ होतील अशी तजवीज केली. राहुल गांधींनी ती ध्वनिफित ऐकताच केवळ पर्रीकर, भाजपा सरकारच का, तर ज्यांनी ही माहिती दिलीय त्या विश्वजितनाही उघडे पाडा, अशी भूमिका घेतली. त्यानुसार सुरजेवाला छोटा रेकॉर्डर घेऊनच पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यांनी ती टेप वाजविली. राहुल गांधींनाही लोकसभेत ती टेप वाजवून दाखवू का, असे विचारताना लोकांनी ऐकले.

म्हणजे राहुल गांधींनी एका दगडात दोन पक्षी मारले. त्यांचे राजकीय विरोधक मोदींवर तर तीर मारलाच, पर्रीकरांनाही अडचणीत आणले आणि विश्वजित यांच्याच नथीतून तीर मारल्याने तेही प्रत्यक्षात गारद झाले. विश्वजित राणे यांनी ज्या सहजतेने गेल्या दोन-तीन प्रसंगी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचा वचपा काढण्याची संधी राहुलना मिळाली आणि त्यांनी ती व्यवस्थित घेतली. त्यानंतर दुस-याच दिवशी विश्वजित यांनी आपण त्या गावचेच नाही, हे दाखविण्यासाठी राहुल गांधींवर शरसंधान केल्यामुळे विश्वजित यांचे काँग्रेस पक्षाबरोबरचेही संबंध बिघडले. भाजपात त्यांच्याबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार झालेच आहे; परंतु विश्वजित यांच्यासाठी एकच दिलासाजनक गोष्ट म्हणजे ते लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी आपले मंत्रिपद शाबूत राखू शकणार आहेत. कारण, त्यांना आज दुखावून चालणार नाही, याचे शहाणपण भाजपात आहे.

वास्तविक, विश्वजित यांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. भाजपात अशा गुन्ह्यांसाठी क्षमा नाही. दुर्दैवाने भाजपाची आजची परिस्थिती हलाखीची आहे- ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’- अशी आहे!

एक म्हणजे, पर्रीकरांना ज्या अवस्थेत सत्तेवर ठेवलेय त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ व भाजपा आमदारही अस्वस्थ आहेत. त्यामुळे पक्षाचे राजकीयदृष्टय़ाही खूप नुकसान झालेय. पुढच्या निवडणुकीत हा पक्ष सपाटून मार खाणार आहे. एखादा शेंबडा पोरही सांगेल की पक्षाने केलेली ही हाराकिरी आहे. त्यामुळे विश्वजित यांनी हे डेअरिंग केले ते योग्यच केले, असे म्हणणारे भाजपाचेच काही आमदार आहेत.

ही अस्वस्थता एवढय़ा थराला गेलीय की आज जर पक्षाध्यक्ष अमित शहांनी मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांना फोन करून हालहवाल विचारला तर त्यातील अर्धेअधिक जण पर्रीकरांनी तसेच म्हटले होते, असे तिखटमीठ लावून सांगतील.

वास्तविक पर्रीकर तसे बोललेच नव्हते. पर्रीकरांनी आपल्या काही मंत्री सदस्यांना श्रद्धासबुरीचा सल्ला दिला होता. सार्वजनिक ठिकाणी बोलताना तारतम्य बाळगा, काहीबाही बरळू नका असे त्यांनी म्हणताना राफेल वादाचा संदर्भ दिला होता. राफेल खरेदी प्रकरणात मलाही बरेच माहीत आहे; परंतु पंतप्रधान बोलत असताना मी बोलू नये असे संकेत आहेत. ते मी पाळतो, त्याचप्रमाणे मी एखादा विषय हाताळत असेन तर इतर सदस्यांनी त्यावर शक्य तो मते देण्याचे टाळावे असे त्यांनी सुचविले होते. विशेषत: हे मत त्यांनी विश्वजित राणे यांच्यासह काही घटक पक्षांच्या सदस्यांना उद्देशून व्यक्त केले होते. काही सदस्य कोणत्याही विषयावर तोंड उघडतात, त्यामुळे लोकांच्या मनात संशय, शंका, संभ्रम निर्माण होतात व त्यावर खुलासे केले जात नाहीत, मी आजारी असताना प्रत्येक वेळी हस्तक्षेप करू शकत नाही, असा त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ होता.

दुर्दैवाने त्याच काळात समाजमाध्यमांमध्ये पर्रीकरांकडे राफेलसंदर्भात सांगण्यासारखी बरीच माहिती आहे, अशी मते व्यक्त होत होती. संरक्षणमंत्री म्हणून काम केल्यामुळे ते स्वाभाविकही होते. शिवाय काँग्रेस पक्षानेही काही दिवसांपूर्वी तसा जाहीर आरोप केला होता. त्यांच्या हातात पुरावे असल्यामुळेच पर्रीकरांना मुख्यमंत्रिपदावरून बदलण्याची मोदी-शहा यांची छाती होत नाही. काँग्रेस पक्षाने फक्त ‘बेडरूमचा’ उल्लेख केला नव्हता. विश्वजित यांनी तो उल्लेख केला त्यामुळे आरोपाला चांगलाच ‘पंच’ आला. शिवाय, विश्वजित राणे यांच्याच तोंडून त्या आरोपांचा पुनरुच्चार झाल्यामुळे विरोधकांच्या इंधनात ताकद आली.

या आरोपाने उडविलेला धुरळा अजून खाली बसलेला नाही. भाजपा नेते खजील अवस्थेत फिरताहेत आणि विश्वजित राणेंविरोधात कारवाई करण्याचे त्राण त्यांच्यात नाही. कारण, निकट आलेली लोकसभा निवडणूक. विश्वजित राणे यांनी ठरविले तर ते त्यांचा लोकसभा उमेदवार सहज पराभूत करू शकतात. ते तसे छुप्या रीतीने करण्याचा प्रयत्न करतीलही; परंतु मंत्रिपदावरून काढून टाकले तर जाहीरपणे या कारवाया करण्यास ते प्रवृत्त होतील. त्यामुळे मूग गिळून गप्प बसण्याशिवाय भाजपा नेत्यांना पर्याय नाही.

या लेखाचा सारांश दोन ओळीत सांगता येईल. मनोहर पर्रीकर ज्या स्थितीत मुख्यमंत्रिपदाला चिकटून बसले आहेत, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता, संशय, हतबलता आणि विवशता यातून असे प्रसंग घडतात. या परिस्थितीला पक्षश्रेष्ठीही जबाबदार आहेत. त्यामुळेही सगळेच नेते शरमेने माना झुकवून गप्प आहेत.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

Web Title: Which compulsion was the type of audio clip of Vishwajeet Rane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.