हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2024 09:06 AM2024-10-20T09:06:01+5:302024-10-20T09:07:36+5:30
वेलिंगकर यांचे आंदोलन किंवा अटकेचा प्रयत्न झालेले एकूण प्रकरण पाहिले तर हिंदू समाज वेलिंगकर यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. त्याची कारणे काय असावीत, याचा शोध कधी तरी अभ्यासकांना घ्यावा लागेल.
सारीपाट, सद्गुरू पाटील, संपादक, गोवा
राज्यात गेल्या पंधरवड्यात झालेला सेंट झेवियरशी निगडित वाद हा गोव्याबाहेरदेखील चर्चेत आला. सेंट झेवियरच्या शवाची डीएनए चाचणी केली जावी अशी मागणी माजी संघचालक (गोवा) सुभाष वेलिंगकर यांनी केली. इथूनच वादाला आरंभ झाला. अर्थात वेलिंगकर यांनी त्या मागणीपूर्वीही सातत्याने फेसबुकवरून मोहीम चालवली होती. सेंट झेवियर शवदर्शन सोहळा येत्या महिन्यात होणार आहे. वातावरण संवेदनशील आहे. हा ख्रिस्ती समाज बांधवांच्या श्रद्धेचा विषय आहे. अशावेळीच वेलिंगकर यांनी चालविलेली मोहीम ही टीकेला कारणीभूत ठरली. हिंदू समाजातील काहीजणांना वेलिंगकर यांचा विचार पटला, पण बऱ्याच जणांना तो पटला नाही.
सेंट झेवियर गोंयचो सायब आहे की नाही हे ठरविण्याचा आता काळ नाही. ख्रिस्ती बांधवांनी श्रद्धेने गोंयचो सायब म्हणून सेंट झेवियरला स्वीकारल्यानंतर आता वादाचे कारण राहात नाही. शवाची डीएनए चाचणी करून आता काय सिद्ध केले जाईल? आणि सिद्ध करून काय प्राप्त होईल? गोवा इन्क्विझीशनशी सेंट झेवियरचा संबंध नव्हता, असा दावा काही अभ्यासक करतात. अर्थात त्याने इन्क्विझीशनविषयी लिहिलेले पत्र हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्याने हिंदूच्या संदर्भात ते पत्र लिहिले नव्हते असा देखील दावा केला जातो. तरी देखील वेलिंगकर यांच्याकडून केला जाणारा दावाच खरा असे क्षणभर मान्य केले तरी, आता वाद घालण्यात लोकांना रस नाही. हिंदू बहुजनांनाही रस नाही. शेवटी हिंदू-ख्रिस्ती बांधव एकत्र नांदत आले आहेत व त्यांनी तसेच नांदावे असे बहुतांश गोमंतकीयांना वाटते, हे नाकारता येते काय? वेलिंगकर यांचे आंदोलन किंवा अटकेचे प्रयत्न झालेले एकूण प्रकरण पाहिले तर हिंदू समाज वेलिंगकर यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. त्याची कारणे काय असावीत याचा शोध कधी तरी अभ्यासकांना घ्यावा लागेल.
वेलिंगकर यांचे मुद्दे अमान्य करून आणि आता वाद घालणे निरर्थक आहे हे मान्य करूनदेखील गोव्याच्या एकूण हिंदू समाजाविषयी चर्चा घडवून आणावी लागेल, वेलिंगकर यांना आदराच्या स्थानी पाहणारे लोकदेखील सेंट झेवियर वादापासून दूर राहिले. वेलिंगकर यांना अटक झाली नाही पण पोलिसांकडून शोध सुरू होता; तेव्हा बहुतांश हिंदू लोक वेलिंगकर कुठे गेले असावेत या प्रश्नाचे उत्तर शोधत स्वतःचे मनोरंजन करून घेत होते. ही समाजाची शोकांतिका म्हणावी की लोकांना वादात मुळीच रस नसल्याने लोक केवळ स्वतःच्या मनोरंजनापुरतेच वादाचा विचार करत होते, या प्रश्नाचे उत्तरही कधी तरी शोधावे लागेल.
वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करून मडगाव येथे ख्रिस्ती बांधवांनी रस्ता रोखून धरला होता. जोरदार आंदोलन केले होते. प्रथम पोलिसांनी व एकूणच सरकारने सौम्य भूमिका घेतली, पण नंतर लोकांमधून तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या. मडगावला खिस्ती बांधवांची दादागिरी चाललीय असा सूर हिंदू समाजाने लावला तेव्हा पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली व आंदोलन बंद करण्यास संबंधितांना भाग पाडले. त्या आंदोलनात राजकारणी घुसले होते हे तर खरेच आहे.
वेलिंगकर यांच्या मुद्द्यावरून खिस्ती समाज बांधव आपलीच कोंडी करू पाहतात, अशी अनेक हिंदूंची भावना झाली होती. वेलिंगकर अटक चुकविण्यासाठी थोडे दूर राहिले होते. पोलिसांनी त्यांच्या घरी दारावर नोटिस वगैरे चिकटवली होती. मात्र या सगळ्या वादाच्या काळात गोव्यातील हिंदू बांधवांना नेतृत्व देण्यासाठी म्हणून कुणी पुढे आले नाही. वेलिंगकर यांनी आता अकारण वाद निर्माण करू नये हा मुद्दा खरा असला तरी, हिंदू समाजाला नेतृत्व देण्याची जबाबदारी आपली आहे, असे गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही वाटले नाही. विश्व हिंदू परिषदेलाही वाटले नाही आणि भाजपला तर तसे वाटण्याचा प्रश्नच आला नाही. कारण भाजपच्या सर्वच भूमिका या विरोधात असताना वेगळ्या असतात आणि सत्तेत असताना वेगळ्या असतात. तो मग धर्मवाद असो किंवा भाषावाद असो. विविध राज्यांमध्ये हाच अनुभव येतो.
गोव्यात भाजपने वेलिंगकर यांची पर्वा केली नाही, कारण २०१७ च्या निवडणुकीत पार्सेकर सरकारचा दारूण पराभव गोव्यात झाला, तो वेलिंगकर यांच्या शिक्षण माध्यम आंदोलनामुळे असे भाजपला वाटते. वेलिंगकर आता मूळ संघात नाहीत, त्यांनी आपली स्वतंत्र संघटना स्थापन केलीय याचाही भाजपला राग आहेच. मात्र गोव्याच्या एकूण हिंदू समाजमनाचा विचार कुणी करत नाही. वाजपेयी सरकारने एकेकाळी सेंट झेवियर शव दर्शन सोहळ्यासाठी ५० कोटींचा निधी जाहीर केला होता. त्यावेळी त्यास संघाने राष्ट्रीय स्तरावर विरोध केला होता. आताचा गोव्यातील संघ हा निस्तेज व काहीसा मिळमिळीत झालेला आहे. किंबहुना मातृभाषा मुद्दा किंवा धर्माचा मुद्दा असो, पण भाजपशी पंगा घ्यायला नकोच ही संघाची भूमिका असल्याने आता जास्त अपेक्षाही कुणी ठेवू शकत नाही. भाजपचा दक्षिणेतील एक आमदार दोन-तीन अंगरक्षक सोबत घेऊन संघाच्या दसरा संचलनात सहभागी झाला होता. हा बदलता गोवा व बदलता टप्पा संघ स्वयंसेवकांनाही निमूटपणे पाहावा लागतो.
वेलिंगकर यांच्या वादास पाठिंबा देण्याचा इथे मुळीच हेतू नाही. येथे एक लक्षात घ्यावे लागेल की कोंकणी-मराठी वादावेळी ८७ साली दक्षिण गोव्यात चर्चिल आलेमाव व त्यांच्या काही गुंडांनी धुमाकूळ घातला होता. उत्तरेत म्हापशात येऊन हिंदू व्यापाऱ्यांना दुकाने वगैरे बंद करण्याची सक्ती केली जात होती. त्यावेळी उत्तर गोव्यातून रिटालिएशन सुरू झाले होते. रवी नाईक असोत किंवा उत्तरेतील मगो पक्षाचे विविध आमदार तेव्हा हिंदूंच्या बाजूने उभे राहिले होते व त्यांनी गुंडगिरी रोखली होती. कदाचित तीच वेळ ताज्या वेलिंगकर वादातून नव्याने निर्माण झाली असती. मडगावला ख्रिस्ती बांधवांचे आंदोलन जर जास्त दिवस चालले असते तर कदाचित उत्तर गोव्यातून रिटालिएशन सुरू झाले असते.
भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांनी मला अनौपचारिकपणे चर्चा करताना तसे सांगितले. वेलिंगकर यांच्या विधानांमुळे खिस्ती बांधवांची भावना दुखावली होती हे मात्र मान्य करावे लागेल. वेलिंगकर यांना चार दिवसांपूर्वी मी वॉट्सअपवर एकूण नऊ प्रश्न पाठवले होते. त्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मिळवावी व त्यांची एक मुलाखत लोकमतमध्ये छापावी असा हेतू होता. त्यांनी प्रश्नांना आजच्या टप्प्यावर जाहीरपणे उत्तरे देता येणार नाहीत असे वॉट्सअप संदेशातूनच कळवले. वेलिंगकर त्या संदेशात म्हणतात की- आमच्या टीमचे एक दूरगामी नियोजन आहे. त्याच्या सफलतेसाठी आज या प्रश्नांची उत्तरे देणे किंवा जाहीर करणे गैरसोयीचे होईल. (आपला) यातील प्रत्येक प्रश्न गोव्यातील हिंदू समाजाच्या आगामी वाटचालीशी निगडीत आहे हे नक्की. अर्थात वेलिंगकर यांनी हा संदेश आमच्या काही प्रश्नांच्या अनुषंगाने पाठवला. वेलिंगकर म्हणतात त्यावरून असे कळते की त्यांची चळवळ दृश्य किंवा अदृश्य स्वरुपात सुरूच राहील. कदाचित इतिहासाला नव्याने उजाळा देऊन ते सेंट झेवियरप्रश्नी हिंदू समाजात आणखी जागृती करू पाहत असावेत असे वाटते. तूर्त स्पष्टपणे काही कळत नाही.
वेलिंगकर यांचा तपोभूमीवर परवा गौरव झाला. ती बातमी गोव्यात लक्षवेधी ठरली. त्यावरून हिंदू व ख्रिस्ती बांधवांत चर्चाही झाली. मात्र वेलिंगकर यांचा पोलिस शोध घेत होते किंवा वेलिंगकर संकटातच होते तेव्हा कोणत्याच हिंदू संघटनेने किंवा तपोभूमीनेदेखील वेलिंगकर यांना पाठिंबा जाहीर करणारे पत्रक जारी केले नव्हते.
न्यायालयातून दिलासा मिळाला व अटक टळली, हा वेगळा मुद्दा, पण समजा अटक झाली असती तर? तरी विविध घटक शांतच राहिले असते काय, असा प्रश्न उपस्थित होतोच. अर्थात हे सगळे प्रश्न केवळ चर्चेसाठी व उत्तरांचा शोध घेण्यासाठी आहेत.