गोव्यात गणेशोत्सवात प्रदूषणाच्या नियंत्रणाची जबाबदारी कोणाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 09:30 PM2017-08-23T21:30:55+5:302017-08-23T21:33:18+5:30
देशाच्या पश्चिम किना-यावर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यात गोव्याचाही समावेश असून, येथे या उत्सवात पर्यावरणाला अपायकारक वस्तूंचा होणा-या अपरिमित वापरामुळे प्रदूषणाची समस्या कायम आहे.
विलास ओहाळ
पणजी, दि. 23 - देशाच्या पश्चिम किना-यावर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यात गोव्याचाही समावेश असून, येथे या उत्सवात पर्यावरणाला अपायकारक वस्तूंचा होणा-या अपरिमित वापरामुळे प्रदूषणाची समस्या कायम आहे. जल, वायू, ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कायदे असले तरी या काळात त्याची अंमलबजावणी नक्की कोणी करायची हा प्रश्न अनुत्तरीच राहतो.
दिवसेंदिवस गणेशोत्सवातील प्रदूषणावर जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारपासून अनेक सामाजिक संस्था जागृती करतात. तरीही पाणी प्रदूषण करणा-या प्लास्टर आॅफ परिसच्या गणेशमूर्ती खरेदी केल्याच जातात. राज्यात २००८ मध्ये कायद्याने प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती विक्रीवर बंदी घातली, तरीही त्यांना मागणी असल्याने लोक या मूर्ती आणून विकतातच. चिकणमाती आणि मातीच्या मूर्ती खरेदी करा, म्हणून सरकार सांगते, प्रर्यावरणप्रेमी सांगतात. त्यासाठी गोवा हस्तकला महामंडळ लोकांना स्वस्तात मूर्ती मिळावी, म्हणून त्या स्थानिक कुंभारांकडून विकत घेऊन लोकांसाठी महामंडळ मूर्ती उपलब्ध करून देते. त्याशिवाय मिरवणुकीत विसर्जनावेळी फटाक्यांची अमाप आतषबाजी करणे, कर्णकर्कश आवाजाचे ध्वनीक्षेपक लावून ध्वनी प्रदूषण करणे, पर्यावरणास मारक असलेल्या थर्मोकोलचा वापर करणे, अशा गोष्टी सातत्याने होत आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिका-याने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत चिकणमातीच्या मूर्तीमध्ये किंचीतसे प्रमाण अपायकारक असतात. मात्र, २०१४-१५ च्या अहवालात जलप्रदूषण झालेच नसल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या सीमाभागातील लोक मात्र, पीओपीच्या मूर्ती या कोल्हापूर आणि कर्नाटकातून येत असल्याचे सांगतात.
देशात सर्वत्रच १९८६ च्या कायद्याचे पालन होताना अजिबात दिसत नाही. गोव्यात होणाºया जलप्रदूषण विरोधात या कायद्याची सरकारने डोळसपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात सरकारने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली असली, तर त्या गोव्यात येतात कशा हा प्रश्न आहेच. पण लोकांचीही जबाबदारी असून, त्यांनीच त्या वापरावर बंदी घालावी. विसर्जनावेळी निर्माल्य विल्हेवाटीचे व्यवस्थापन केले जात नाही, त्यामुळे नदी, ओढे आणि तळ्यांचे प्रदूषण झालेले दिसून येते.
- राजेंद्र केरकर, पर्यावरण कार्यकर्ते
जल किंवा हवा प्रदूषण असो, येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणत्याबाबतीत कारवाई करते. अशा सणावेळी हे मंडळ कारवाई करणे टाळतेच. कायदे हे कागदावर आहेत. राज्यात ‘आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं’ अशी स्थिती आहे. राज्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणपती आत्ताच येत नाहीत, त्या कित्येक वर्षांपासून येतात. याविरुद्ध कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. जर कायदा पाळण्याची इच्छा मूळत: लोकांमध्येच असेल, तरच प्रदूषण थांबेल आणि पीओपी मूर्ती वापरावर बंदी येईल.
- रमेश गावस, सामाजिक कार्यकर्ते.
सध्या दिखाऊपणा करण्यात मोठी चढाओढ दिसून येते. त्यासाठी निसर्गाला बाधक वस्तूंचा वापर अधिक होतो. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती कमी किंमतीत उपलब्ध होतात, म्हणून खरेदी केल्या जातात. पण मातीची मूर्ती लहान असेल तर बिघडते कुठे हा प्रश्न लोक स्वत:च्या मनाला का करीत नाहीत. कायद्याने किती गोष्टी साध्य होतात, त्यासाठी लोकांनी प्रदूषणाबाबत सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे. कर्तव्य म्हणून लोकांनी जल, वायू प्रदूषण करणार नाही, असे बंधन स्वत:वर घालून घेतले तरच ते शक्य आहे.
-प्रवीण सबणीस, सामाजिक कार्यकर्ते.