नगराध्यक्ष पदी कोण बसणार? फोंडा शहरात उत्सुकता शिगेला
By आप्पा बुवा | Published: May 8, 2023 11:29 PM2023-05-08T23:29:30+5:302023-05-08T23:31:04+5:30
नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली.
अजय बुवा, फोंडा: नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली. सहाजिकच त्यांचे 13 पैकी आठ नगरसेवक निवडून आले. दोन नगरसेवक अगोदरच बिनविरोध निवडून आल्याने त्यांची संख्या 10 झाली आहे. भरगच्च असे संख्याबळ असल्याने पुढची पाच वर्षे त्यांना चांगल्या तऱ्हेने प्रशासन चालवता येऊ शकते. परंतु एका गोष्टीमुळे राजकीय अस्थिरता सुद्धा निर्माण होऊ शकते व ती शक्यता म्हणजे नगराध्यक्ष कोण? हा प्रश्न काही पहिला नगराध्यक्ष निवडताना निर्माण होईल असे नाही तर अधेमधे ज्या ज्या वेळी काही लोकांची महत्त्वकांक्षा जागृत होईल त्या त्या वेळी नगराध्यक्ष कोण हा प्रश्न नगरपालिकेला पडेल.
यावेळी जी काही प्रमुख नावे येऊ शकतात त्यापैकी रितेश नाईक हे नाव सर्वात वर आहे. सरत्या कार्यकाळात ते नगराध्यक्ष होते. कृषीमंत्री रवी नाईक यांची पहिली पसंती सुद्धा त्यांनाच असू शकते . मागच्या कार्यकाळात नगराध्यक्षपदी बसल्यानंतर त्यांनी चांगले काम करून दाखवले होते. नगराध्यक्षपदी दुसरे नाव येऊ शकते ते म्हणजे भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांचे. त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. तर यावेळी ते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांनी सुद्धा यापूर्वी नगराध्यक्ष पद भोगलेले आहे. त्यांना नगराध्यक्ष पदाचा अनुभव सुद्धा आहे. मूळ भाजपचे असल्याने, भाजपच्या स्तरावर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. परंतु कृषिमंत्री रवी नाईक यांची मेहेरनजर जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत विश्वनाथ दळवी हे दुसऱ्या रांगेत राहतील.
माजी नगराध्यक्ष व माजी मंडळ अध्यक्ष शांताराम कोलवेकर हे जरी निवडून आले नसले तरी त्यांची पत्नी निवडून आली आहे व अप्रत्यक्षपणे कोलवेकर यांनी सुद्धा हॅट्रिक केली आहे. यावेळी अटीतटीची अशी लढत त्यांच्या प्रभागात झाली होती. परंतु एका मताने त्यांनी रायझिंग फोंडावर मात करून आपली ताकद पक्षाला दाखवली आहे. कोलवेकर हे सुद्धा भाजपच्या मुशीतून तयार झालेले आहेत.
रॉय रवी नाईक हे सुध्दा यावेळेस शर्यतीत आहेत.यांची कामाची पद्धत सुद्धा रवी नाईक यांच्याशी मिळणारी आहे. राजकीय वाटचालीत जी एक आक्रमकता सुद्धा हवी असते ती त्यांच्यात आहे. त्यामुळे रॉय सुद्धा नगराध्यक्ष पदावर आपला दावा ठोकू शकतात.
अजून राजीव गांधी कला मंदिर चा अध्यक्ष निवडण्यात आलेला नाही. कदाचित ज्यांना कुणाला नगराध्यक्षपदी बसवता येऊ शकत नाही त्यांना कला मंदिर चे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद देण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. शांताराम कोलवेकर हे अजूनही उपाध्यक्ष आहेतच. कदाचित त्यांना यावेळी अध्यक्षपदी बडती मिळू शकते. उपनगराध्यक्ष पदासाठी सुद्धा यावेळी चांगलीच चढाओढ असेल. दोन वेळा व चांगल्या विक्रमी मताधिक्यानी निवडून आलेले आनंद नाईक हे नाव सर्वात वर आहे.विश्वनाथ दळवी यांचे उजवे हात समजले जाणारे व शांतीनगर सारख्या प्रभागात दोन वेळा निवडून आलेले वीरेंद्र ढवळीकर हे नाव सुध्दा आहे.ही दोन्ही नावे सध्या आघाडीवर आहेत. मागच्या कार्यकाळात वीरेंद्र ढवळीकर यांनी उपनगराध्यक्ष पद भूषवले आहे. त्याचबरोबर सध्या ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुध्दा आहेत. आनंद नाही यांना अगोदरच दक्षिण गोवा प्रधिकरणाचे संचालक पद देण्यात आले असल्याने कदाचित उपनगराध्यक्षपदी ढवळीकर यांचे नाव पुढे येऊ शकते. एखादेवेळेस महिलेस उपनगराध्यक्ष देण्याचे ठरल्यास दिपा शांताराम कोलवेकर व ज्योती अरूण नाईक यांच्या नावाचाच विचार होईल.