उसगाव, गांजेतून कोणाला मिळेल आघाडी? भाजप-आरजीपी थेट लढत शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 10:29 AM2024-04-15T10:29:19+5:302024-04-15T10:30:39+5:30

लोकसभा निवडणुकासाठी हा भाग उत्तर गोव्याशी जोडलेला आहे.

who will get the lead from usgaon ganja for lok sabha election 2024 | उसगाव, गांजेतून कोणाला मिळेल आघाडी? भाजप-आरजीपी थेट लढत शक्य

उसगाव, गांजेतून कोणाला मिळेल आघाडी? भाजप-आरजीपी थेट लढत शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : उसगावचा मतदारसंघ वाळपई. आणखी विशेष म्हणजे, विधानसभा किंवा लोकसभा असू द्या, जो उमेदवार (मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो) उसगाव गांजे पंचायत क्षेत्रात आघाडी घेतो, तोच उमेदवार निवडून येतो. असा गेल्या प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणुकांचा अनुभव आहे.

लोकसभा निवडणुकासाठी हा भाग उत्तर गोव्याशी जोडलेला आहे. गेल्या सलग पाचवेळा लोकसभा निवडणुकीत या भागातून भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक जिंकलेले आहेत आणि प्रत्येकवेळी त्यांना वाळपई मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे आणि याचे श्रेय मंत्री विश्वजित राणे यांनाच जाते.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची मात्र प्रत्येक निवडणुकीत मते या मतदारसंघातून कमी होत जाताना दिसून येतात. काँग्रेस पक्षाचे मतदारसंघात म्हणावे तसे कार्यकर्तेही नाहीत. यंदा प्रथमच गोवा रिव्होल्युशनरी पक्षाचे उमेदवार म्हणून मनोज परब उत्तर गोवा लोकसभा निवडणूक रिंगणात उभे आहेत. मागील २०२२ची विधानसभा निवडणूक त्यांनी वाळपई मतदारसंघातून लढविलेली आहे. त्यावेळी त्यांना ६,३७७ मते मिळाली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत हा त्यांचा मतांचा आकडा वाळपई मतदारसंघातून ११ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. वाळपई मतदारसंघातील लोक मनोज परब यांना जवळून ओळखतात. वाळपई मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी ते सदैव कार्यरत असतात. मतदारसंघातील लोकांच्या संकटकाळी ते आपल्या सहकाऱ्यांसह मदतीसाठी झटकन धावून येतात. श्रीपाद नाईक यांच्या प्रचाराचे काम मंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. दिव्या राणे आणि त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यासाठी कार्यकर्ते झटत आहेत.

भाजप-आरजीपी थेट लढत शक्य

लोकसभा निवडणुकीत वाळपई मतदारसंघात व उसगावात भाजप व आरजीपी यांच्यात थेट लढत असेल, असे या भागातील मतदार ग्रामस्थ सांगतात. या भागातील जास्त ख्रिस्ती बांधव आरजीपी उमेदवाराला मतदान करणार आहेत. या भागातील काही ख्रिस्ती व मुस्लिम बांधव भाजपला मतदान करणार आहेत, अशी माहिती या भागातील लोकांनी दिली आहे. एकूण यंदाची लोकसभा निवडणूक वाळपई मतदारसंघ व उसगावात रंगतदार होणार आहे.

युवकांचा कौल निर्णायक ठरणार? 

मंत्री विश्वजित राणे यांनी सत्तरीतील जास्त व उसगावच्या काही युवा-युवतींना त्यांच्या जवळ असलेल्या सरकारी खात्यात रोजगार दिले. या भागातील क्रीडा संस्थांना स्पर्धा खेळविण्यासाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत मंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे. त्यामुळे वाळपई व उसगाव भागातील क्रीडा संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य मंत्री राणे यांचा मान राखला जाईल व मतदान केले जाईल, अशी माहिती अनेक क्रीडा संस्थांनी दिली आहे.

मताधिक्यात घट; चिंतेची बाब 

हल्लीच या भागाचे इंडिया आघाडीचे काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी वाळपई मतदारसंघाचा प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी वाळपई नगरपालिका व उसगाव पंचायत सभागृहात काही मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. मागील काही वर्षांचे लोकसभा निवडणूक निकालाचे तक्ते पाहिल्यास, प्रत्येक वेळी काँग्रेस उमेदवाराच्या मताधिक्यात या मतदारसंघात घट झाल्याचे दिसते.

म्हादईकडे दुर्लक्ष नको

म्हादई वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून श्रीपादभाऊंनी प्रयत्न न केल्याने, सध्या कणकुंबी सुर्ल मार्गे सत्तरीच्या विविध भागातील दऱ्याखोऱ्यांतून वाळपई येथून उसगाव भागात येणारे नदीचे पात्र कोरडे पडले आहे. आज या भागातील लोक पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात आहेत. जंगलातील वन्य प्राणी (हरीण, काळवीट, गवे, रानडुक्कर, बिबटे, वाघ, कोल्हे) पाण्याच्या शोधत गावात पोहोचत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

संकटावेळची मदत लाभदायी ठरेल का?

मागे वाळपई, गांजे व उसगाव भागात पावसाळ्यात पूर आला होता. त्यावेळी संकटकाळी मदतीसाठी श्रीपादभाऊ आलेच नाही, तसेच त्यांनी लोकांची साधी विचारपूसही केली नाही. मात्र, त्यावेळी आरजीपीचे मनोज परब व त्यांचे सहकारी लोकांना मदत करण्यासाठी त्वरित धावून आले. त्यांनी पूरग्रस्तांसाठी सर्व प्रकारची मदत केली. मनोज परब व त्यांचे सहकारी पूरग्रस्त भागात आठ दिवस तळ ठोकून होते. अशी माहिती भागातील त्यावेळच्या पूरग्रस्त लोकांनी बोलताना दिली.

 

Web Title: who will get the lead from usgaon ganja for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.