अमित शाह यांनी सुदिन, कामत यांना दिले मोठे महत्त्व, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:55 AM2023-04-18T08:55:30+5:302023-04-18T08:56:39+5:30
त्यामागे दोन वेगवेगळी कारणे असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल भाजप कोअर टीमच्या बैठकीनंतर मंत्री सुदिन ढवळीकर व आमदार दिगंबर कामत यांना भेटले. मंत्री ढवळीकर व कामत यांना शाह यांनी भेटीसाठी वेळ दिली होती. दोन्ही नेत्यांना शाह यांनी मोठे महत्त्व दिले. त्यामागे दोन वेगवेगळी कारणे असल्याचे समोर आले आहे.
मगो पक्षाचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासोबत शाह हे स्वतंत्रपणे बोलले. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ढवळीकर यांची दिल्लीत शाह यांच्याशी भेट व्हायची. त्यामुळे ढवळीकर यांचे नाव व राजकीय महत्त्व शाह यांना ठाऊक आहे. मंत्री विश्वजित राणे जेव्हा जेव्हा शाह यांना भेटतात तेव्हा शाह हे ढवळीकर यांच्याविषयी विचारतात. काल फर्मागुडी येथे शाह यांची सुदिनने भेट घेतली तेव्हा लोकसभेची जागा व राज्यसभेची जागा या दोन्ही विषयांबाबत चर्चा झाली.
दक्षिण गोव्यात कुणाला तिकीट देणे योग्य ठरेल याविषयी सुदिनचे मत शाह यांनी जाणून घेतल्याचे कळते. राज्यसभेवर जाण्यास ढवळीकर हे देखील इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र ढवळीकर व शाह यांच्यात त्याविषयी काय चर्चा झाली ते कळत नाही. नागेशी येथील मंदिरास भेट देण्यासाठीही शाह यांनी ढवळीकर यांना सोबत बोलावले.
कामत यांनाही तिकीट शक्य
दरम्यान, दिगंबर कामत यांनी शाह यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानुसार कामत यांच्याशीही काल गुप्त चर्चा झाली. नरेंद्र सावईकर, दिगंबर कामत, बाबू कवळेकर ही नावे भाजपच्या आतील गोटात संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेतच. काँग्रेसमधून जे नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत, ते कामत यांच्याशी जास्त कम्फर्टेबल आहेत. कामत यांना देखील दक्षिण गोव्यात भाजप तिकीट देऊ शकतो. अशी चर्चा भाजपच्या आतील गोटात आज पसरली. कामत हे दुसऱ्या रांगेत बसले होते. तथापि, सभेच्या शेवटी सर्वांचे हात पकडून वर हात उगारून फोटो काढतेवेळी शाह यांनी कामत यांना पुढे बोलाविले. यावरूनही कामत यांना शाह यांनी दिलेले महत्त्व अनेकांच्या लक्षात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"