गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील मद्यसेवनाला विरोध का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 08:11 PM2019-01-30T20:11:45+5:302019-01-30T20:12:22+5:30
गोव्याच्या समुद्रकिना-यांवर मद्यसेवन करण्यास बंदी लागू करणा-या नियमाला पर्यटकांकडून विरोध झाला असला तरी स्थानिक समाज व पर्यटन क्षेत्राने त्या बंदीचे स्वागतच केले आहे.
- राजू नायक
गोव्याच्या समुद्रकिना-यांवर मद्यसेवन करण्यास बंदी लागू करणा-या नियमाला पर्यटकांकडून विरोध झाला असला तरी स्थानिक समाज व पर्यटन क्षेत्राने त्या बंदीचे स्वागतच केले आहे.
गेल्या आठवड्यात गोवा मंत्रिमंडळाने सुधारित पर्यटन व्यवसाय कायद्याला हिरवा कंदील दाखविला. या विधेयकाला गुरुवारी विधानसभेत मंजुरी मिळेल. त्यानुसार किना-यावर मद्यप्राशन करणे किंंवा स्वयंपाक करणे आता गुन्हा बनला असून त्यासाठी दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिने तुरुंगवास अशी शिक्षा आहे. गटांनी असे गुन्हे केल्यास त्यांचा दंड १० हजार रुपये असेल. गोव्यात सार्वजनिक ठिकाणी व किनाºयांवरही धूम्रपान करण्यास बंदी आहे.
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी तसेच किनारपट्टीवर उपहारगृहे चालविणाºया व्यावसायिक गटाचे प्रमुख क्रूझ कार्दोज यांनी या बंदीचे जोरदारपणे स्वागत केले. गेल्याच आठवड्यात गोव्यात पर्यटक कमी येत असल्याबद्दल आजगावकर यांच्यावर पर्यटन व्यावसायिकांनी टीका केली होती.
राज्याची खरी अडचण ही कमी आर्थिक गटातील पर्यटकांची गोव्यावर पडणारी टोळधाड. हे लोक रस्त्यावरच स्वयंपाक करतात. किनाºयांवर गटागटांनी मद्यप्राशन करतात. एवढेच नव्हे तर किना-यांवर उकिरडा करून इतर पर्यटकांची सतावणूकही करतात. विदेशी पर्यटकांची छेड काढण्याचे प्रकार तर गोव्यात सर्रास घडत असतात. त्याहून मोठी विकृती म्हणजे हे पर्यटक केवळ दारू पिऊन थांबत नाहीत तर किनाºयावर बाटल्या फोडतात त्या इतरांच्या पायाला लागण्याचा संभव असतो.
किना-यांवर सकाळी व्यायाम करायला येणाºया गोवेकरांचे म्हणणे असते की वाळूत उघड्या पायांनी चालणे चांगले मानले जाते. परंतु, आम्हाला सारखी भीती असते, तळव्यांना काचा लागतील. कारण, तेथेच बाटल्या फोडलेल्या आम्हाला सर्रास दिसतात.
पर्यटकांनी किना-यांवर उच्छाद मांडला असल्याबद्दल एकूणच गोवेकरांचे एकमत आहे. पूर्वी गोवेकर किना-यांवर मोकळ्या हवेसाठी, ताजेतवाने होण्यासाठी जात असत. संध्याकाळी किना-यावर भटकणे हा एक निवांतपणाचा, विरंगुळ्याचा भाग होता. परंतु, हल्ली गोवेकरांनी ते सोडून दिले आहे. कारण, किनाºयांवर पर्यटकांची अलोट गर्दी असते आणि एकच कोलाहल निर्माण झालेला असतो. शिवाय काही किनाºयांवर प्लास्टिक कचरा व इतर टाकाऊ वस्तू फेकल्या असल्यामुळे ते उकिरडे बनले आहेत.
मद्यप्राशनास बंदीच्या निर्णयामुळे पर्यटक मात्र खट्टू झालेले आहेत. त्यांच्या मते, गोव्यात तरुण येतात ते मौजमजेसाठीच. तशीच गोव्याची प्रतिमा आहे. येथे स्वस्त दारू मिळते. पाश्चात्य देशांमध्ये रस्त्यावरही दारू पिण्यास मुभा असते. परंतु, किनाºयांवर बाटल्या मात्र टाकू नयेत. अशा बंदीमुळे पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील असा इशारा ते देतात. परंतु, असा दृष्टिकोन बाळगणारे पर्यटक विसरतात की गोव्याच्या बहुसंख्य किना-यांवर खानपानगृहे -ज्यांना शॅक्स म्हटले जाते- मोठ्या संख्येने आहेत आणि तेथे मद्य पुरविले जाते.
नाक्यानाक्यावर हॉटेलांची रेलचेल आहे. तेथे जाऊन पिण्याची मुभा असताना पर्यटकांनी किना-यांवरच जाऊन जाहीरपणे पिण्याचा अट्टहास का बाळगावा? गोव्यात ‘बार’ची संख्या ७२०० असून दरवर्षी नवे १०० परवाने देतात, त्या विरोधात महिला संघटनांनी यापूर्वीच आवाज उठविला आहे.