भाजपचे ९ भंडारी उमेदवार का पडले?

By Admin | Published: March 16, 2017 01:00 AM2017-03-16T01:00:59+5:302017-03-16T01:01:17+5:30

पणजी : भंडारी समाज हा गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने ठामपणे भाजपच्याच बाजूने राहिला. गेली वीस वर्षे प्रत्येक विधानसभा

Why BJP's 9 Bhandari candidates fall? | भाजपचे ९ भंडारी उमेदवार का पडले?

भाजपचे ९ भंडारी उमेदवार का पडले?

googlenewsNext

पणजी : भंडारी समाज हा गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने ठामपणे भाजपच्याच बाजूने राहिला. गेली वीस वर्षे प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळी तसाच अनुभव आला; पण या वेळी प्रथमच भंडारी समाजानेही भाजपची साथ सोडून अन्य पक्षांमधील भंडारी समाजातील उमेदवारांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. भाजपने उभे केलेले भंडारी समाजातील नऊ उमेदवार पराभूत झाले. यामागील कारणमीमांसा करण्यासाठी भाजपमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे.
सुमारे अडीच लाख लोकसंख्या असलेल्या भंडारी समाजाची व्होट बँक ही कोणत्याही हिंदुत्ववादी पक्षासाठी महत्त्वाची असते. पंचवीस वर्षांपूर्वी भंडारी समाज हा मगोपसोबत राहायचा. १९९४ सालापासून भंडारी समाजाने भाजपची साथ देणे सुरू केले. १९९४ साली जे चार आमदार भाजपचे निवडून आले होते, त्यात श्रीपाद नाईक व नरहरी हळदणकर हे दोघे भंडारी समाजातील होते. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीवेळी भाजपचे तिकीट वाटप करताना भंडारी समाजाला जास्त उमेदवारी दिली व काँग्रेसपेक्षाही जास्त भंडारी समाज आमदार हे भाजपमधून तयार होऊ लागले. या वेळी एकूण दहा भंडारी समाजातील उमेदवार भाजपने दिले. त्यापैकी नऊ जणांचा दणदणीत पराभव झाला. मिलिंद नाईक हे एकटेच कसेबसे टिकले. त्यांचा पराभव केवळ १४० मतांनी टळला. बहुजन समाजाने भाजपची साथ या निवडणुकीवेळी का सोडली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कूळ-मुंडकार कायद्यातील दुरुस्ती हे एक त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. शिवाय या समाजातील काही मंत्र्यांनी लोकांना तसेच आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूकही त्यास कारणीभूत ठरली.
शिरोड्यात महादेव नाईक, थिवीत किरण कांदोळकर, साळगावमध्ये दिलीप परुळेकर, शिवोलीत दयानंद मांद्रेकर हे पराभूत झाले. त्याशिवाय फातोर्डामध्ये दामू नाईक, वाळपईत सत्यविजय नाईक, सांताक्रुझमध्ये हेमंत गोलतकर, ताळगावमध्ये दत्तप्रसाद नाईक, सांतआंद्रेत रामराव नाईक वाघ हे भंडारी समाजातील उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसने भंडारी समाजातील पाच जणांना तिकीट दिले होते. त्यात रवी नाईक, सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, अमरनाथ पणजीकर व उर्मिला नाईक यांचा समावेश होता. यापैकी तिघांचा विजय झाला. शिवाय गोवा फॉरवर्डतर्फे जयेश साळगावकर व विनोद पालयेकर हे भंडारी समाजातील उमेदवार निवडून आले.
ज्या मतदारसंघांमध्ये भंडारी समाज विरुद्ध भंडारी समाजातील उमेदवार, अशी लढत झाली, तिथे मतदारांनी बिगरभाजप उमेदवारास साथ दिली.

Web Title: Why BJP's 9 Bhandari candidates fall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.