कोविड उद्रेकाचा दोष सरकारलाच का देतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 08:06 PM2020-07-24T20:06:49+5:302020-07-24T20:07:01+5:30
गोव्याने पर्यटन व उद्योगांसाठी दरवाजे सताड उघडे केले. वास्को शहरातील श्रमजीवी लोकांचा भाग मानलेल्या मांगोर येथे कोविडग्रस्तांची संख्या वाढू लागताच, संपूर्ण शहरात टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
- राजू नायक
गोव्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वात आधी कंबर कसलेल्या गोव्याची आज हार मानलेल्या योद्धय़ासारखी परिस्थिती ओढवण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारला जातो तेव्हा राज्य सरकारकडेच बोट दाखवण्याखेरीज पर्याय नसेल.
गोव्याने पर्यटन व उद्योगांसाठी दरवाजे सताड उघडे केले. वास्को शहरातील श्रमजीवी लोकांचा भाग मानलेल्या मांगोर येथे कोविडग्रस्तांची संख्या वाढू लागताच, संपूर्ण शहरात टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. वास्को शहरातील जागृत नागरिकांची ही मागणी अव्हेरण्यात आली.
त्याचा परिणाम : हा संसर्ग संपूर्ण गोव्यात पोहोचला. आज एकूण बाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचण्याच्या बेतात असून मृत्यू २९ नोंदविण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवडय़ात तीन दिवसांची टाळेबंदी पुकारूनही काही फायदा झालेला नाही. केवळ पाच दिवसांत एक हजार नवे बाधित व ९ जणांचा मृत्यू ओढवला.
त्यामुळे विरोधकांना सरकारवर तुटून पडायला नवे हत्यार सापडले. त्यांनी म्हटले, २९ जे बळी पडले ते सरकारी अनास्था व निष्काळजीपणामुळे आहेत. त्यात तथ्यही आहे.
सरकारचे अपयश खालील मुद्दय़ांवरून सहज लक्षात येईल.
- तातडीने कोविड चाचण्या घेण्याची आवश्यकता असता सरकारने हयगय केली. मांगोरहिल भागात रूग्ण सापडू लागताच सर्व झोपडपट्टय़ांमध्ये तातडीने रुग्ण हुडकून काढण्याची मोहीम सुरू करणे आवश्यक होते. सुरुवातीला केवळ ५०० चाचण्या प्रतिदिनी होत. आता त्या अडीच हजार होतात. परंतु सुरुवातीला हा वेग कमी असल्याने कोविड पसरण्यास मदत झाली.
- मांगोरहिल हा हॉटस्पॉट ठरल्यानंतर संपूर्ण वास्को शहरात टाळेबंदी जाहीर करणे आवश्यक होते. परंतु सरकारने मंत्र्यांच्या व हितसंबंधितांच्या दबावाखाली तो निर्णय टाळला. त्यामुळे कोविडचा प्रचंड उद्रेक झाल्याचा ठपका सरकारवरच ठेवला जातोय.
- सरकारने सुरुवातीलाच घरोघरी सर्वेक्षण सुरू केले होते. त्यातून राज्यात पाच हजार तरी ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी त्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार होते. सध्या मृत्यू पावलेल्यांमध्ये ५० वर्षावरील व्यक्तींचाच अधिक समावेश आहे. याचा अर्थ सर्वेक्षणामध्ये आजारी सापडलेल्या लोकांची विशेष देखभाल सरकारने केली असती तर हा उद्रेक टळला असता.
- कोविड इस्पितळ व गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळही कोविडच्या फैलावापासून सुटले नाही. कोविड इस्पितळाचे प्रमुख डॉ. एडविन गोम्सही कोविडच्या कचाटय़ात सापडले. यावरून सरकारची उपाययोजना कुचकामी ठरल्याचे सिद्ध झाले. सरकार वैद्यकीय कर्मचा-यांनाही वेळीच सुरक्षा कवच पुरवू शकले नाही.
गोवा राज्य छोटे असतानाही सरकारला त्याचे संरक्षण करता आले नाही. वास्को शहरात या रोगाचा उद्रेक होण्यास तेथील मंत्री कारणीभूत ठरले. त्यांना कोळसा व खनिज यांचा पुरवठा मुरगाव बंदरात करायचा होता. त्यामुळे वाहतूक बंद झालेली नको होती. सरकारातील अनेकांचे खाण व्यवसायात हिसतंबंध गुंतले आहेत. त्यांच्या दबावाखाली सरकारची कोविडवरील पकड ढिली पडली. त्यामुळे गोव्यातील कोविड उद्रेक हा ‘सरकारनिर्मित’ आहे असा आरोप करतात, त्यात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल?