शिवरायांचा एवढा द्वेष? याचा शोध घ्यावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:12 AM2023-08-17T11:12:31+5:302023-08-17T11:13:07+5:30

लोकांचा रेटा असला की, पोलिस यंत्रणेला देखील काम करावे लागते.

why chhatrapati shivaji maharaj hate so much and goa incident and consequences | शिवरायांचा एवढा द्वेष? याचा शोध घ्यावा लागेल

शिवरायांचा एवढा द्वेष? याचा शोध घ्यावा लागेल

googlenewsNext

गोव्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण करण्याचे धाडस तिघा तरुणांनी केले. करासवाडा- म्हापसा येथे शिवरायांच्या पुतळ्यास मुद्दाम हानी पोहोचवून पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी अटक करून गजाआड केले. यासाठी पोलिसांचे अभिनंदन, लोकांचा रेटा असला की, पोलिस यंत्रणेला देखील काम करावे लागते. 

छत्रपती शिवरायांविषयी इतका द्वेष आला कुठून याचा शोध घ्यावा लागेल. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चेहरा विद्रूप करणारे तिघेही ख्रिस्ती शिवरायांचा आदर करतात. मात्र एक-दोन ख्रिस्ती धर्मगुरू छत्रपतींविषयी जाहीरपणे गरळ ओकतात आणि मग म्हापशासारखी घटना घडते. गोव्यात काही ठरावीक व्यक्ती छत्रपतींविषयीचा तिरस्कार एवढा वाढवत आहेत की, काही माथेफिरू मग हातात कायदा घेऊन पुतळ्याची मोडतोड करतात. हे थांबायला हवे असेल तर सरकारी यंत्रणेला समस्त जनतेत कडक संदेश पाठवावा लागेल. 

गोव्यात आतापर्यंत शिवभक्तांनी खूप संयम ठेवला आहे. अर्थात, संयम ठेवायलाच हवा. धार्मिक सलोखा बिघडू देता कामा नये हिंदू- खिस्ती व मुस्लीम समाजबांधव इथे गुण्यागोविंदाने नांदतात. सोहळ्यांमध्ये गोमंतकीय भाग घेतात. धर्माच्या नावाने भेदभाव केला जात नाही. काही ख्रिस्ती धर्मगुरू शिवरायांविषयी पूर्वीही बोलायचे, पण फादर बोलमॅक्स यांनी जास्त कडक भाषा वापरली. त्यातून वाद निर्माण झाला. छत्रपतींना देव मानू नका, असे हिंदूना सांगा... अशी भाषा बोलमॅक्स यांनी वापरल्यानंतर ठिणगी पडली होती. फादर बोमॅक्स यांना अटक करावी म्हणून शिवभक्तांनी पोलिस स्थानकावर मोर्चा नेला होता. मग पोलिसांनी गुन्हा नोंद केला व अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरूला न्यायालयात जावे लागले.

छत्रपतींचा पुतळा कळंगूटमध्ये उभा करतेवेळी काही महिन्यांपूर्वी स्थानिक पंचायत व सरपंचांनी आक्षेप घेतला होता. पुतळा हटवा अशी नोटीस पंचायतीने दिली होती. मग शिवभक्तांनी कळंगूटमध्ये जमून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर सरपंचांचा सूर थोडा बदलला होता. करासवाड़ा येथे छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर हिंदू धर्मीय एकत्र आले. शिवप्रेमींनी भक्तिभावाने तिथे छत्रपतींचा नवीन पुतळा बसवला. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळी भेट दिली. संबंधित गुन्हेगारांविरुद्ध कारवाई व्हायला हवी अशी भूमिका त्यांनीही घेतली. काँग्रेसचे हळदोणेचे आमदार कार्लस फरैरा यांनी योग्य भूमिका घेतली. फरैरा यांनी छत्रपतीविषयी आपल्याला असलेला आदर जाहीरपणे दाखवून दिला. शिवाजी महाराज हे राष्ट्रीय हिरो आहेत, ते अनेकांचे दैवत आहेत, हे फरैरा यांनी मान्य केले. शिवरायांच्या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी फरैरा यांनी चांगले सहकार्य केले.

भाजपचे एक मंत्री माविन गुदिन्हो अनेकदा मंदिरात जातात. आपण पूर्वाश्रमी हिंदूच होतो असे नमूद करतात. ते पूजाही करतात. अर्थात माविन किंवा कार्लस हे राजकीय नेते झाले. त्यांचे सोडा, पण सामान्य ख्रिस्ती धर्मीय माणूस शिवरायांचा टोकाचा तिरस्कार करत नाही. हिंदू धर्मीयांमधील काही अतिहुशार अलीकडे अधूनमधून दावा करतात की छत्रपतींचा गोव्याशी काही संबंध नाही वगैरे. त्यांनी इतिहास नीट वाचलेला नसतो किंवा वाचून मुद्दाम लोकांची दिशाभूल करण्याचा हेतू असतो. 

सचिन मदगे यांनी पुराव्यांसह छत्रपतींचा गोव्याशी असलेला संबंध अलीकडे नव्याने अधोरेखित केला. काहीजणांना भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती किंवा महाराष्ट्र म्हटल्यानंतर पोटात दुखते, तर काहीजण शिवाजी म्हटले की तोंड वाकडे करतात. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विविध शहरांमध्ये शिवजयंती साजरी करण्याची घोषणा नुकतीच केली. राजकीय नेत्यांचे पुतळे उभे करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा अधिकाधिक ठिकाणी उभ्या राहायला हव्यात. गोव्यात शिवभक्ती वाढायलाच हवी. राज्यात काही शक्ती धार्मिक सलोखा बिघडविण्यासाठी वावरत आहेत. करासवाडा येथील घटनेचा संबंध मणिपूरशी आहे का, हेदेखील तपासावे लागेल. काही संघटित विघातक शक्तीही सक्रिय असू शकतात. गोवा भारताचाच अविभाज्य भाग आहे, शिवाजी हे गोमंतकीयांचेही दैवत आहे, हे नव्याने ठासून सांगावे लागेल.
 

Web Title: why chhatrapati shivaji maharaj hate so much and goa incident and consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.