मुलगा झाला नाही ते चांगलेच झाले असे तिचे वडील का म्हणाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:13 PM2017-08-18T13:13:44+5:302017-08-18T13:14:57+5:30
प्रसिद्ध तबलापटू रिंपा सिवा आपल्या संगीतमय आयुष्यातील काही पाने उलगडली.
सुरेश गुदले
पणजी, दि.18- मी वडिलांजवळ बसून असायचे. ते मुलांना तबला शिकवायचे, ते मी पाहायचे. तबल्यामध्ये मलाही इंटरेस्ट येऊ लागला. वडील प्रारंभी म्हणालेले, तू तर मुलगी आहेस, तु कशी तबला शिकणार? मुली तबला शिकत नाहीत. तेच वडील नंतर म्हणाले, शिक. आणि मी तीन-चार वर्षाची असेन, तबला शिकू लागले. मुलगा झाला नाही म्हणून वडील खरे तर प्रारंभी दु:खी झालेले. नंतर वडील म्हणाले, मुलगी झाली तेच चांगले झाले, मुलीने मला खूप काही दिले. मुलगा झाला नाही ते चांगलेच झाले. आणि या मनोगतावेळी ती दिलखुलास हसली. प्रसिद्ध तबलापटू रिंपा सिवा आपल्या संगीतमय आयुष्यातील काही पाने उलगडत होती. निमित्त होते लोकमतच्या पणजी-गोव्यातील कार्यालयास सदिच्छा भेटीचे.
माझी प्रेरणा घेऊन खूप मुली तबला शिकत आहेत याचा आनंद मोठा आहे. तबल्याविषयीची मुलींच्या मनातील भीती दूर झालेली आहे, त्यामुळे खूप चांगले वाटते. रिंपा सिवा सांगत होती. आता मुली मोठ्या संख्येने तबला वाजवत आहेत हा अनुभव सांगताना तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. आयुष्यात अजून खूप काही शिकायचे आहे, यांसारख्या वाक्या-वाक्यातून रिंपा यांची नम्रता जाणवत राहिली. तीन-चार वर्षाची असतानाचे आता जास्त आठवत नाही. मी वडिलांजवळ बसून असायचे, ते मुलांना तबला शिकवायचे. प्रारंभी मुलगी कशी तबला शिकणार म्हणणारे वडिलांचे मनोगत कालांतराने बदलले. मुलीने जे दिले ते मुलाने दिले नसते, अशी त्यांची भावना बनली. मुलीने जे दिले ते मुलाने दिले नसते असे ते बोलले, असे रिंपाने हसत-हसत सांगितले.