राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यात हसे का झाले?
By admin | Published: March 15, 2017 11:54 AM2017-03-15T11:54:18+5:302017-03-15T12:32:33+5:30
गोव्यात शिवसेनेपाठोपाठ दुस-या कोणत्या पक्षाचे हसे झाले असेल तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस. कसे वाचा सविस्तर बातमी
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 15 - गोव्यात शिवसेनेपाठोपाठ दुस-या कोणत्या पक्षाचे हसे झाले असेल तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसने दक्षिण गोव्यातील बाणावली मतदारसंघातून चर्चिल आलेमाव यांना उमेदवारी देणे धोक्याचे होते, हे आता स्पष्ट झाले.
भाजपाने गोव्यात सरकार स्थापनेचा दावा करताच त्यांच्याकडे धावत आले ते चर्चिल. पर्रीकरांनी बदनाम चर्चिलचा पाठिंबा घेतला नाही किंवा तशी ग्वाहीही त्यांना दिली नाही. परंतु चर्चिल फुलांचा भलामोठा गुच्छ घेऊन पर्रीकरांच्या शपथविधीला उपस्थित राहिले होते.
मुळात चर्चिलना पक्षात घेण्यास पक्षाचे नेते शरद पवार यांचा विरोध होता. चर्चिल बदनाम असल्यामुळे पक्षात त्यांना प्रवेश नाही, असे शरद पवार यांनी पुण्यात 'लोकमत'शी साधलेल्या संवादावेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर पक्ष नेते प्रफुल्ल पटेल यांची चर्चिल बरोबरशी फुटबॉल मैत्री कामी आली असावी. त्यांनी आपले वजन वापरून चर्चिलना पक्षात घेतले असावे. चर्चिलना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने मोठा धोका पत्करला कारण चर्चिल यापूर्वी ज्या-ज्या पक्षात गेले त्या पक्षास त्यांनी दगा दिल्याचा इतिहास आहे. याच चर्चिल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. चर्चिल राष्ट्रवादीत असल्यानेच 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
निवडून आल्यानंतर चर्चिल यांना सत्तेबाहेर कसे बसवणार? त्यामुळे पर्रीकर यांनी मगोप आणि गोवा फॉरवर्डशी मोट जमविताच चर्चिलनी त्यांना एकतर्फी पाठिंबा जाहीरही केला. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला पाठिंबा जाहीरही केलेला नाही, मात्र पाठिंब्याचे वैयक्तिक पत्र पर्रीकरांना देऊन चर्चिल मोकळेही झाले. राष्ट्रवादीची गोची अशी की चर्चिलना पक्षातून काढून टाकले तर ते असंल्गन होऊन स्वत: कोणताही निर्णय घेण्यास मोकळे होतात. शपथविधी समारंभावेळी चर्चिल यांना पत्रकारांनी विचारले की राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोठे आहे? तर,'मीच पक्ष आहे', असे उत्तर चर्चिल यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
निषेध आणि मौन
राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुडो फिलीप डिसोझा यांनी चर्चिल आलेमाव यांचा निषेध केला आहे. चर्चिल पक्षाच्या धोरणाविरूद्ध वागत असल्याचे ते म्हणाले. चर्चिलवर कारवाईबाबत मात्र त्यांनी मौन पाळले.
पणजी : राजभवनाच्या प्रांगणात मंगळवारी मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी समारंभानंतर त्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव. ( छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा )