विद्यार्थी मस्ती का करतात? शिक्षकांचा कनेक्टच तुटलेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:03 PM2023-08-19T12:03:51+5:302023-08-19T12:04:43+5:30
चक्क शांतादुर्गा हायर सेकंडरीत प्रकरण झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
राज्यातील अनेक विद्यालयांमध्ये समुपदेशक आहेत. मात्र विद्यार्थ्यांशी संवाद साधून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात काहीजण कमी पडतात. किशोरवयीन विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र गोव्यात अनेक हायरसेकंडरी व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्याशी कनेक्टच तुटलेला आहे. काही विद्यार्थी दहावी-बारावीत पोहोचले की जास्त मस्ती करू लागतात. ते वयच तसे असते. अशावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य वळण लावण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज असते. डिचोली येथील शांतादुर्गा हायरसेकंडरीत जी घटना घडली, त्यापासून सर्वच विद्यालयांनी बोध घ्यायला हवा. सहा विद्यार्थ्यांच्या गटाने वर्गात स्प्रेचा वापर केला. त्यामुळे बारा विद्यार्थिनी अत्यवस्थ झाल्या. त्यांना इस्पितळात न्यावे लागले. हा धक्कादायक प्रकार आहे. वरिष्ठ शिक्षण अधिकारी किंवा तालुका भागशिक्षणाधिकारी हायस्कूल, हायरसेकंडरींना फारसे भेटच देत नाहीत. डिचोलीसारख्या छोट्या सुसंस्कृत शहरातील हायरसेकंडरीत विद्यार्थी स्प्रेचा मुद्दाम वापर करतात, हे चिंताजनक आहे. विद्यार्थिनींना धडा शिकविण्याचा त्यांचा हेतू होता, अशी चर्चा आहे.
शिक्षक व समुपदेशक या दोन्ही घटकांची जबाबदारी आता वाढली आहे. शिवाय पालकांनीही बोध घेतला पाहिजे. 'आपला तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्ट' असा विचार अनेक पालक करतात. कॉलेजमध्ये जाणारा आपला मुलगा अजून लहानच आहे, असे वडिलांना वाटते. मुलगा विद्यालयाबाहेर कोणत्या उनाड मुलांच्या संगतीत असतो, याची पालकांना कल्पना नसते. आपल्याच दैनंदिन कामात, नोकरी-धंद्यात पालक एवढे व्यस्त असतात की, मुलगा सिगरेट ओढायला वा बियर प्यायला शिकला तरी त्यांना ठाऊक नसते. यातून मग काही विद्यार्थी गुन्हेगारीच्या मार्गाकडेही वळू लागतात.
पालक व शिक्षकांनी पूर्ण दुर्लक्ष केले तर एक टप्पा असा येतो की मुलगा आई-वडिलांना जुमानत नाही. शिव्याही देऊ लागतो. मग पश्चात्ताप करण्याची वेळ पालकांवर येते. किशोरवयीन मुले जर वाया गेली, शिक्षणाला अर्थ तो काय राहिला? सिनेमात तीन तासांसाठी जे जग दिसते, तेच खरे असे वाटण्याचे एक वय असते. मायावी व मोहमयी दुनिया म्हणजे वस्तुस्थिती नाही, याचे भान किशोरवयीन विद्यार्थ्यांना नसते. ते भान करून देणे व जीवन म्हणजे खडतर प्रवास आहे, ही जाणीव मुलांच्या मनावर बिंबवणे ही शिक्षक व पालकांची जबाबदारी आहे.
अनेक शिक्षक अकरावी-बारावीच्या मुलांकडे दुर्लक्ष करतात. वर्गात पुस्तकी शिक्षण दिले की, आपली जबाबदारी संपली असे त्यांना वाटते. अनेकदा काही कुटुंबांमध्ये वाद असतात. वडील व्यसनी असतात किंवा आई-बाबांचे पटत नसते. मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. असे विद्यार्थी वर्गात आले तरी त्यांचे शिक्षणाकडे लक्ष नसते. ते वाममार्गाला लागतात. अशावेळी समुपदेशकांनी अधिक योगदान दिले तर त्या मुलांचे व समाजाचेही कल्याण होईल.
काही विद्यार्थी चक्क शिक्षकांनादेखील धमक्या देतात. अधुनमधून पालक-शिक्षक संघ, विद्यार्थी, शिक्षण अधिकारी व पोलिस यांच्या संयुक्त बैठका व्हायला हव्यात. बाहेरचे कुणी तरुण आपल्या हायर सेकंडरीत येत नाहीत ना, विद्यार्थी बाहेरील मुलांच्या नादी लागून मस्ती करत नाहीत ना याची माहिती सातत्याने प्रिन्सीपल वगैरेंनी काढायला हवी. आवश्यक तिथे पोलिसांचीही मदत घ्यायला हवी. आपल्याकडे विद्यालयांमध्ये प्रिन्सीपल व विद्यार्थी यांच्यात जास्त संवाद नसतो. पूर्वी एखादा विद्यार्थी आजारी पडला, विद्यालयात आला नाही तर शिक्षक त्याच्या घरी जायचे. काय समस्या आहे हे जाणून घ्यायचे. शिक्षक सातत्याने पालकांच्याही संपर्कात असायचे. हे सगळे बहुतांश विद्यालयांबाबत बंद झाले आहे. फक्त प्राथमिक शाळेत मुलांची संख्या वाढायला हवी म्हणून काही शिक्षक पालकांच्या घरी जातात. वर्ग बंद पडण्याची किंवा आपली नोकरी जाण्याची भीती प्राथमिक शिक्षकांना असते.
डिचोलीतील शांतादुर्गा विद्यालयाला चांगले नाव व प्रतिष्ठा आहे. पणजी, मडगाव किंवा वास्कोतील एखाद्या विद्यालयात जर स्प्रे प्रकरण घडले असते तर एकवेळ समजून घेता आले असते. मात्र चक्क शांतादुर्गा हायर सेकंडरीत प्रकरण झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उपाययोजना करावीच लागेल.