गोवा के अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 12:52 PM2018-10-06T12:52:35+5:302018-10-06T12:52:59+5:30
माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?
- सुरेश गुदले
पणजी - माझ्या गोव्याच भूमीत...गड्या नारळ दुधाचे....असे गोव्याचे वर्णन बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर यांंनी केले. तो गोवा आता राहिलेला नाही, जसे की कृष्णेकाठी कुं डल आता पहिले उरले नाही... त्यामुळे गोवा सोडून जावेसे वाटते, कारण गोवा पूर्वीसारखा राहिला नाही... गोवा हरवला...अशा आशयाचे एक गाणे पॉपस्टार रेमो फर्नांडीस यांनी गायले. झाले, यावरून कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी रेमो निराशावादी आहेत, त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे असे बोधामृत पाजलेले आहे. कलावंत गातो आणि राजसत्ता कसे गायचे ते शिकवते...मागील पानावरून पुढे चालूच आहे.
कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी जगभर चिंतानजक स्थिती असल्याचे पुण्यात नुकत्याच झालेल्या पेनच्या अधिवेशनातही सामोरे आले. गोवा तर धर्मवाद्यांची गढी. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन केलेला आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण यांचे हित जपण्याची या पक्षाची टॅगलाईन होती. होती एवढ्याचसाठी की सध्या मायक्रोस्कोप घेऊन शोधले तरी या पक्षाच्या वाटचालीत ती सापडणार नाही. तांदूळ, मासे, पाव, नारळ यांसारखे गोवेकरांच्या दैनंदिन भोजनातील पदार्थ स्वस्त देण्याची घोषणा या पक्षाने निवडणुकीपूर्वी हवेत फेकून दिलेली होती. तीही मायक्रोस्कोपखाली सापडत नाही.
गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण जपण्याची भावुक साद या पक्षाने घातलेली होती आणि पॉपस्टार रेमोने त्याची गाण्यातून नेमकी खिल्ली उडवलेली आहे. रेमो निराशावादी भाटकार (जमिनदार) आहेत. त्यांना असे वागणे शोभत नाही, असे या मंत्र्यांचे म्हणणे. सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर एकवेळ समजता येते पण रेमोची स्थिती अशी नाही, असा वकिली युक्तीवाद ते मांडतात.
खरे तर कलावतांने तळागाळातल्याचा आवाज व्हायचे असते हेच मंत्रीमहोदय विसरताहेत आणि समष्टीऐवजी व्यक्तीवर येऊन थांबतात. यांचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नोकरभरतीची फाईल घेऊन दवाखान्यात बसलेले आहेत, असे यांच्याच सरकारमधील उपसभापती मायकल लोबो जाहीर म्हणतात. त्यामुळे तीन हजार सरकारी नोकरीभरती रखडलेली आहे असा लोबोंचा आरोप आहे. आणि मंत्री सरदेसाई म्हणतात, सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर समजता येते. समजता येते मंत्र्याची धन्य ती समज.
खाणींनी गोव्याची वाट लावली. गोव्यातील जल, जंगल आणि जमिनीची वाट लावली जात आहे. पर्यटनाच्या नावाखाली गोवा म्हणजे बीच, बेबीज आणि बॉटल्स असे समीकरण घट्ट केलेली सर्व काळ््या धंद्याची समांतर व्यवस्था व्यवस्था आकाराला आलेली आहे. त्यामुळे माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?