अटल सेतू बदनाम का? मनोहर पर्रीकर असते तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 04:05 PM2023-07-22T16:05:03+5:302023-07-22T16:05:26+5:30
विरोधी आमदार त्याचे भांडवल करणारच.
मंत्री गोविंद गावडे यांची गेले काही दिवस जोरदार कसरत सुरू आहे. त्यांना ती करावीच लागली, कारण विरोधकांनी व्यूहरचनाच अशी केलीय की मंत्री गावडे यांची स्थिती अभिमन्यूसारखी झाली आहे. गावडे यांना चक्रव्यूहात अडकवलेय ते आमदार विजय सरदेसाई यांनी. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळल्याने विरोधी आमदारांच्या हाती कोलीतच सापडले. विरोधी आमदार त्याचे भांडवल करणारच.
मनोहर पर्रीकर आज विरोधी पक्षनेतेपदी असते तर कला अकादमीच्या विषयावरून त्यांनी संबंधित मुख्यमंत्र्यांना सळो की पळो करून सोडले असते. भाजप कार्यकर्त्यांनी कला अकादमीसमोर निदर्शने केली असती. आता विरोधी आमदारांनी विधानसभेत एखादी भानगड उघड केली तरी त्या अनुषंगाने बाहेर रस्त्यावर आमदारांचे कार्यकर्ते कोणतीच आंदोलनात्मक कृती करत नाहीत. त्यामुळेच सावंत मंत्रिमंडळाचे फावले आहे. सध्या सरकारमधील अनेक राजकारण्यांना वाटतेय की आपण सत्तेचा अमरपट्टाच घेऊन आलो आहोत. छोटया छोटया सरकारी सोहळ्यांवर प्रचंड उधळपट्टी सुरू आहे. कोट्यवधी रुपये केवळ सल्लागार कंपन्या व इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपन्यांवर खर्च केले जात आहेत. सनबर्नसारखा सोहळा एक इडीएम कंपनी दरवर्षी आयोजित करते. तो आयोजित करण्यापूर्वी सरकारमधील बहुतेकांना खुश केले जाते. मग होर्डिंगची कोट्यवधींची बिलेदेखील सरकारी पातळीवरून सहज मंजूर होतात.
मंत्री गावडे यांना वाटतेय की, त्यांना सरदेसाई व्यक्तिगतरीत्या टार्गेट करत आहेत. मनोहर पर्रीकर जेव्हा मुख्यमंत्रिपदी होते तेव्हा २०१२ सालानंतर सरदेसाई वगैरे विरोधी आमदार पर्रीकर यांनादेखील शिंगावर घेण्याचा प्रयत्न करत होते. पर्रीकर यांना विविध मुद्दयांवरून सरदेसाई, रोहन खंवटे घेरत होते. सरकारी घोटाळ्यांच्या विषयावर पर्रीकरदेखील अडचणीत येत होते. किनारपट्टी स्वच्छतेचे कंत्राट याचे उत्तम उदाहरण आहे. खनिज खाणी नव्याने सुरू करण्यात पर्रीकरांना अपयश आले तेव्हाही विरोधी आमदारांच्या टीकेचे सर्वाधिक धनी तेच बनले होते. त्यामुळे आज कला अकादमीप्रश्नी आरोप झाले म्हणून गावडे यांनी आपल्यालाच टार्गेट केले जाते असे म्हणणे पटण्यासारखे नाही. बहुजन समाजाचा आपण आवाज असल्याने आपल्याला लक्ष्य केले जाते, असा दावा करणे हे तर हास्यास्पद वाटते. कोणताच राजकारणी हा कधी बहुजनांचा आवाज वगैरे नसतो. गरिबांवर मूक आणि बधिर होण्याची वेळ आलीय, अशा काळात आपण सगळेच वावरतोय.
आता मुद्दा राहिला अटल सेतूचा. पणजीतली वाहतूक कोंडी कमी करण्याच्या विचाराने पर्रीकर यांनी हा पूल बांधून घेतला. देशातील नामांकित कंत्राटदार कंपनीने तो उभा केला. या पुलावरील रस्त्यांवर सुरुवातीपासून प्रचंड खड्डे पडले. सातशे-आठशे कोटी रुपये खर्च करूनही पुलाला लगेच खड्डे पडतात हा प्रकार संताप आणणाराच ठरला. यामुळे अटल सेतूच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेससह अन्य काही विरोधी पक्षांनी सातत्याने केलाच, पर्रीकर आज हयात असते तर त्यांनी खड्डे पडण्यामागचे कारण शोधण्यास तज्ज्ञ मंडळींना भाग पाडले असते. सध्याच्या सरकारने लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष कष्ट घेतले नाहीत.
मंत्री गावडे यांनी कला अकादमीच्या कामाचे समर्थन करण्याच्या प्रयत्नात परवाच अटल सेतूचे उदाहरण मीडियाला दिले. अटल सेतूविषयी खूप काही झाले; पण त्यावर कुणी घोटाळ्याचा आरोप केला नाही, माझ्या कला अकादमीविषयी मात्र घोटाळ्यांचा आरोप केला जातो, असे गावडे बोलले. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आपले विधान थोडे बदलले व आपण अटल सेतूचा संबंध भ्रष्टाचाराशी लावला नव्हता असा दावा केला. अर्थात गोमंतकीयांना काय कळायचे ते कळलेच. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळले, अटल सेतू कोसळला नाही, हे गावडे यांना लक्षात घ्यावे लागेल. पन्नास कोटी रुपये कला अकादमीवर खर्च झाले. आता तरी ती संस्था सावरायला हवी. त्याऐवजी अटल सेतूकडे बोट दाखविण्यात काही अर्थ नाही.