सांस्कृतिक ग्रेस मार्क का नाहीत?
By admin | Published: May 27, 2016 02:48 AM2016-05-27T02:48:55+5:302016-05-27T02:54:59+5:30
पणजी : कला व सांस्कृतिक क्षेत्रात चमकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दहावी, बारावीच्या परीक्षेत ग्रेस मार्क दिले जावेत, अशी मागणी सर्व थरांतून होत आहे.
पणजी : कला व सांस्कृतिक क्षेत्रात चमकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दहावी, बारावीच्या परीक्षेत ग्रेस मार्क दिले जावेत, अशी मागणी सर्व थरांतून होत आहे. सरकारच्या सांस्कृतिक धोरणात तशी तरतूद असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. क्रीडा गुण दिले जातात, मग सांस्कृतिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच बाबतीत दुजाभाव का, असा सवाल केला जात आहे.
माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी याबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया देताना सरकारने जलद कृती करून धोरणातील ग्रेस मार्कांची ही तरतूद अमलात आणावी, अशी मागणी केली आहे. क्रीडा गुणांप्रमाणेच सांस्कृतिक गुणही विद्यार्थ्यांना मिळायला हवेत, असे त्यांचे मत आहे.
राज्य सांस्कृतिक सल्लागार समिती तसेच मनोरंजन संस्थेचे माजी सदस्य विशाल पै काकोडे म्हणाले की, कला व संस्कृती क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क न मिळणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. क्रीडा क्षेत्राप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही गोमंतकीय विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्य सांस्कृतिक धोरणातील या तरतुदीची अंमलबजावणी केल्यास बाल व युवा कलाकारांना त्यामुळे प्रेरणा मिळेल. कला क्षेत्रात नाव कमविण्यासाठी खूप मेहनत व कष्ट घ्यावे लागतात, तसेच वेळही द्यावा लागतो.
गोवा राज्य सांस्कृतिक विकास समितीचे माजी उपाध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर यांनीही सांस्कृतिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण मिळाले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. नाट्य, चित्रकला, नृत्य, संगीत असे कोणतेही सांस्कृतिक क्षेत्र असो; विद्यार्थ्यांची कदर झाली पाहिजे. आज केवळ क्रीडा क्षेत्रात गुण दिले जात असल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थीही खेळांचे गुण मिळविणेच पसंत करतात. त्यांचे पालकच त्यांना गुणांसाठी क्रीडा क्षेत्राकडे पाठवतात, असे ते म्हणाले.
माजी सभापती, सांस्कृतिक चळवळीतील नेते तथा निवृत्त मुख्याध्यापक तोमाझिन कार्दोझ यांनीही सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करताना निदान पुढील वर्षी तरी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक ग्रेस मार्क मिळावेत व त्यासाठी कला व संस्कृती खात्याने आतापासूनच पाठपुरावा करावा, असे म्हटले आहे.
(प्रतिनिधी)