पेन्शनचे टेन्शन कशाला?: पोस्टातून परतावा, निवृत्तीनंतर फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 08:17 AM2024-03-18T08:17:52+5:302024-03-18T08:20:22+5:30
काही रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: महागाई तसेच घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अनेकांना आपल्या पगारातून बचत करणे शक्य होत नाही. अशातच निवृत्तीनंतर काय? असा प्रश्न साहजिकच त्यांच्या मनात येतो. मात्र, आता पोस्ट खात्याच्या मासिक बचत योजनेमुळे नागरिकांचे पेन्शनचे टेन्शन मिटणार आहे. पोस्ट खात्यात ठरावीक रक्कम भरल्यास त्यांना त्या बदल्यात भरघोस परतावा मिळू शकतो. महत्त्वाचे म्हणजे पती व पत्नी एकत्र मिळून बचत रक्कम गुंतवणूक करू शकतात.
पोस्ट खात्याच्या मासिक उत्पन्न अर्थात बचत योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सर्वप्रथम पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडावे. खाते उघडण्यासाठी ओळखपत्र, घराच्या पत्त्याचा पुरावा आणि दोन फोटो आवश्यक आहेत.
व्याज किती मिळते?
मासिक बचत किंवा उत्पन्न योजनेअंतर्गत ७.४ टक्के दराने व्याज दिले जाते. मॅच्युरिटीचा काळ हा पाच वर्षांचा आहे. म्हणजेच पैसे पुन्हा पाच वर्षांसाठी गुंतवू शकता. मात्र, जर आवश्यक असल्यास मुदतीपूर्वीही पैसे काढू शकता. मात्र, काही रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल.
कितीपर्यंत गुंतवणूक?
पोस्ट खात्याच्या या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी किमान डिपॉझिट एक हजार रुपये आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला गुंतवणूक केली जाऊ शकते किवा एकरकमी गुंतवणूक करायची असल्यास खात्यात सर्वाधिक नऊ लाख रुपये, तर जॉईंट अकाऊंटमध्ये १५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. मासिक बचत किंवा उत्पन्न योजनेअंतर्गत ७.४ टक्के दराने व्याज दिले जाते.
निवृत्तीनंतर फायदा
या मासिक बचत योजनेमुळे ज्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, त्यांना फायदा होतो. या योजनेतून भरघोस परतावा मिळत असल्याने त्यातून मिळणारी रक्कम ही निवृ- त्तीनंतर नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतात. गोव्यात या योजनेअंतर्गत अनेकांनी खाती उघडली आहेत. मात्र, त्याचा नेमका आकडा नसला तरी तो दोन हजारांहून अधिक असल्याचे म्हटले जात आहे.