शिक्षक क्रूर का बनतात? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2024 04:00 PM2024-09-05T16:00:10+5:302024-09-05T16:00:56+5:30

शाळा व्यवस्थापनाने त्यांना निलंबित केले आहे. 

why teachers become cruel | शिक्षक क्रूर का बनतात? 

शिक्षक क्रूर का बनतात? 

आज राज्यभरात शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र विद्यार्थी मारहाण प्रकरणाने गोवा सुन्न झाला आहे. बार्देशातील एका शाळेत सोमवारी घडलेली घटना भयानक, खूपच संतापजनक आहे. कोलवाळ पोलिसांत एफआयआर नोंद झाला आहे. चौथीत शिकणाऱ्या कोवळ्या मुलाला शिक्षिकेने खूप मारहाण केली. स्टीलच्या पट्टीने एवढे मारले की हाता- पायावर जखमा झाल्या, वळ उठले. हात-पाय काळेनिळे पडले. या प्रकरणी दोघा शिक्षिकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, शाळा व्यवस्थापनाने त्यांना निलंबित केले आहे. 

सोमवारच्या या घटनेबाबत मंगळवारी पोलिसांनी तक्रार नोंद करून चौकशी सुरू केली आहे. बुधवारी पत्रकारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारल्यानंतर त्यांनीही त्या शिक्षिकांच्या वर्तनाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. शिक्षण खाते व पोलिसही कारवाई करतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शिक्षिकांनी दुसऱ्या कुणावरचा राग कदाचित विद्यार्थ्यावर काढला असावा, आता शिक्षकांचेही समुपदेशन करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. लहान मुलांशी शिक्षक असे क्रूर वागू लागले तर मुले शाळेत जायला घाबरतील. शिक्षणाची प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनावी, असा काही चांगल्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा प्रयत्न असतो. मात्र काही शिक्षक किंवा शिक्षिकांची प्रवृत्तीच विचित्र असते. 

काही जण हिंस्रच असतात की काय अशी शंका येते. सत्तरी तालुक्यात एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेनेही एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची बातमी लोकमतमध्ये झळकली होती. त्याबाबत राज्यभर चर्चा सुरू असतानाच आता बार्देशातील प्रकरण उघड झाले. एका वहीची दोन पाने फाडल्याच्या कारणावरून मुलाला चक्क स्टीलच्या पट्टीने मारणे हे कोणत्याच नियमात बसत नाही. नैतिकतेतदेखील बसत नाही. काही वेळा मुले मस्ती करतात तेव्हा शिक्षकांनी रागावणे किंवा एखादा चिमटा काढणे असे पूर्वी चालायचे. आता कायदे खूप कडक झाले आहेत. तरीदेखील मुलांच्या अंगावर वळ येण्याएवढी किंवा त्यांना वेदना होण्याएवढी मारहाण शिक्षकांनी करावी, हे अत्यंत निषेधार्ह आहे. यापूर्वी सासष्टीतही अशी एक घटना घडली होती. 

२००० सालानंतर राज्यात काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. छोट्या विद्यार्थ्यांचाही विनयभंग शिक्षकांनी केल्याच्या घटना उत्तर व दक्षिण गोव्यातील काही तालुक्यांत घडल्या होत्या. तक्रार आल्यानंतर शिक्षकांची चौकशी व्हायची. निलंबनही व्हायचे. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) मनोहर पर्रीकर यांनी कडक भूमिका घेतली होती. माजी शिक्षण संचालक अशोक देसाई यांनीही काही प्रकरणी कडक भूमिका घेत कारवाई केली होती. त्यानंतर लैंगिक अत्याचारांचे, विनयभंगाचे आरोप तरी कमी झाले. मात्र काही शिक्षक किंवा शिक्षिका मुलांना अत्यंत अमानुष शिक्षा करतात, अशा घटना घडू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये अशा घटना दाबून टाकल्या जातात, पण आता अति झाल्याने लोकही संतापले आहेत. 

काही वेळा गरीब पालकांचे लक्ष शाळेत काय घडते याकडे नसते. काही पालक बिचारे कुटुंबाची दैनंदिन उपजीविका भागविण्यासाठीच खूप खपत असतात. त्यांना वेळ वेळ न नसतो. अशा वेळी त्यांचा सगळा विश्वास व सारी भिस्त शिक्षकांवरच असते. आपण मुलाला किंवा मुलीला शाळेत पाठविले म्हणजे आपले काम संपले, आता शिक्षकच काळजी घेतील, असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण गावांमध्ये काही पालक रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट, ट्रकचालक, बसचालक किंवा शेतमजूर असतात. शहरी पालकांची स्थिती जरा वेगळी असते. विद्यार्थी मारहाण घटना या प्रामुख्याने पंचायत क्षेत्रातील शाळांमध्येच घडत असतात. 

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे शिक्षण खाते आहे. त्यांनी एकदा राज्यभरातील सर्व शिक्षकांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. काही शिक्षकांना नीट धडे देण्याची गरज आहे. शिक्षकांना पालकांमध्ये असलेला मान कमी होऊ नये. त्यासाठी अमानुष वागणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षिकांना अगोदर रोखावे लागेल. बार्देशातील घटनेबाबत तर शिक्षिकांना अटक व्हायला हवी. एक-दोघांना अद्दल घडली की इतरांना धडा मिळेल. मुलाचे वळ आलेले फोटो सगळीकडे व्हायरल झाल्याने लोकांमध्ये शिक्षिकांबाबत संताप वाढला आहे. शिक्षण खात्याने हा विषय अधिक गंभीरपणे घ्यावा असे वाटते.
 

Web Title: why teachers become cruel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.