अर्ध्या तासाच्या व्हिसेरा चाचणीसाठी दोन महिने का?; ओव्हरडोसचा छडा लावणाऱ्या मशीनबाबत प्रश्न उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2024 08:01 IST2024-12-31T08:01:47+5:302024-12-31T08:01:47+5:30
मग सनबर्न फेस्टिव्हलसाठी आलेल्या युवकाचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसने झाला होता की नाही याचा छडा या मशीनद्वारे का लावण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अर्ध्या तासाच्या व्हिसेरा चाचणीसाठी दोन महिने का?; ओव्हरडोसचा छडा लावणाऱ्या मशीनबाबत प्रश्न उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शरीरात अमली पदार्थ आहे की नाही, याचा १५ मिनिटांत छडा लावण्यासाठी गोवा वैद्ययकीय महाविद्यालयात आर्ट रेन्डॉक्स अॅनलायजर हे मशीन उपलब्ध आहे. मग सनबर्न फेस्टिव्हलसाठी आलेल्या युवकाचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसने झाला होता की नाही याचा छडा या मशीनद्वारे का लावण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार गोमेकॉत फॉरेन्सिक मेडिसिन विभागासाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२४ रोजी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देताना अत्याधुनिक 'स्टेट ऑफ द आर्टरेन्डॉक्स अॅनलायझर' मशीन आणले होते. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शरीरातील द्रव नमुन्यांचे जलद आणि अचूक विश्लेषण करून विविध प्रकारचे विष, अमली पदार्थ आणि अल्कोहोल शोधण्याचे काम करते. याचा विश्लेषण अहवाल ३० मिनिटांत डिजिटल स्वरूपात मिळतो. हे मशीन तपासणीतील मानवी त्रुटीही कमी करते, असाही दावा केला जातो.
दरम्यान, अशा प्रकारचे मशीन असलेले गोवा वैद्यकीय महाविद्यालय ही देशातील सहावी आरोग्य संस्था आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी याची माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होता आणि गोमेकॉच्या टीमचे अभिनंदनही केले होते. परंतु सनबर्नसाठी गोव्यात आलेल्या करण कश्यपचा संशयास्पद मृत्यू झाल्यावर या मशीनचा वापर करण्यात आला आहे का? वापर केला असल्यास त्याचा निश्कर्ष अहवाल तयार करण्यासाठी केला आहे काय? आणि अहवाल मिळाला असल्यास तो जाहीर का करण्यात आला नाही आणि या मशीनचा वापर केलेला नसल्यास का करण्यात आला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
यापूर्वी झालेल्या सनबर्न पार्टीतही ओव्हरडोसमुळे युवक आणि युवतींचा मृत्यू झाला होता. परंतु फॉरेन्सिक चाचणी अहवाल तब्बल ९ महिने ते दीड वर्ष उशीरा आले होता. त्यावेळी चंदीगढ आणि हैदराबाद या ठिकाणच्या फॉरेन्सिक चाचणी केंद्रात नमुने पाठवावे लागत होते. परंतु आता गोवा पोलिसांची वेर्णा येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळा आहे.
या प्रयोगशाळेत जास्तीत जास्त ८ दिवसांत व्हिसेरा चाचणी निश्कर्ष अहवाल तयार करता येतो. गोमेकॉत तर अवघ्या अर्ध्या तासात अहवाल मिळतो. परंतु मृत्यूच्या कारणांचा छडा लावायची इच्छा असेल तरच हे करणे शक्य होते.