रवी नाईक का राजीनामा देतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 08:25 AM2024-01-26T08:25:55+5:302024-01-26T08:26:47+5:30

रवी नाईक आमदारकीचा राजीनामा देतील आणि मग फॉडा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती.

why will ravi naik resign | रवी नाईक का राजीनामा देतील?

रवी नाईक का राजीनामा देतील?

सावंत मंत्रिमंडळातील कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या राजीनाम्याविषयी काहीजणांनी अफवा पिकवल्या आहेत. रवी नाईक यांनी वयाची सत्तरी कधीच पार केली आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या कामाच्या कौशल्यावर आणि कार्यक्षमतेच्या प्रभावावर थोड्या मर्यादा आल्या आहेत. वयानुरूप हे घडतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची सत्तरी ओलांडली तरी ते तब्येतीने अगदी ठणठणीत आहेत. उलट वय वाढतेय, तशी पंतप्रधानांची कार्यक्षमता, प्रभावही वाढत चाललाय, गोव्यातील काही मंत्री तरुण असले तरी त्यांना तशी कार्यक्षमता दाखवता येत नाही हा वेगळा विषय. 

रवी नाईक आमदारकीचा राजीनामा देतील आणि मग फॉडा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. ही अफवा आहे की, खरेच रवींच्या मनात वेगळे काही आहे, असा प्रश्न फोंड्यातील काही लोकांना पडला होता, म.गो. पक्षाचे तर विशेष लक्ष होते. मात्र, रवी नाईक यांनी स्वतः बुधवारी जी प्रतिक्रिया दिली त्यावरून संशयाचे धुळे दूर झाले. रवींच्या काही राजकीय विरोधकांनाही त्यातून उत्तर मिळाले असेल. त्यांचाही संभ्रम दूर झाला असेल. 

रवी नाईक यांना एका वृत्तवाहिनीने विचारले, तुम्ही राजीनामा देणार व मग फोंड्यात पोटनिवडणूक होईल, तुमच्या मुलाला तुम्ही रिंगणात उतरवणार ही चर्चा खरी काय? रवी नाईक यांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे. आपण चर्चा ऐकलेली नाही. कुणाला तरी स्वप्न पडत असेल आपण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करीन, आपल्याला लोकांनी पाच वर्षांसाठी निवडले आहे. रवी नाईक यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर भाजपमधीलही काही असंतुष्टांना पुढची दिशा कळून आली असेल. फोंड्यातून भाजपच्या तिकिटावर डोळा ठेवून केवळ भाजपबाहेरील इच्छुकच थांबलेले नाहीत, तर भाजपमधील काही इच्छुकदेखील थांबलेले आहेत. रवी नाईक यांचा फोंड्यातील प्रभाव कमी करून तिथे आपला झेंडा रोवण्यासाठी भाजपमधीलच काहीजण इच्छुक आहेत. अर्थात राजकारण हे असेच चालते. जे वरवर दिसते तसे ते कधी असत नाही. रवी मुरब्बी, धूर्त, अत्यंत अनुभवी व कसलेले राजकारणी आहेत. त्यांना मंगो व भाजपमध्ये काय चाललेय याची पूर्ण कल्पना आहेच. रवी नाईक फोंड्यात पराभूत झाले, तेव्हा लवू मामलेदार जिंकले होते. २०१२ साली भाजपची लाट आली होती. मगो-भाजप युती होती. 

मनोहर पर्रीकर व सुदिन ढवळीकर यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे रवी पराभूत झाले होते, त्यावेळी खरे म्हणजे रवी नाईक गृहमंत्री होते. मात्र, पराभव वाट्याला आला तरी, त्यांनी काम सुरूच ठेवले. आज लवू मामलेदार यांचे राजकीय अस्तित्व राहिले नाही; पण रवींचा प्रभाव कायम आहे. रवींनंतर मुलगा रितेश फोंड्यातून निवडून येऊ शकेल का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. दिगंबर कामत यांनी राजीनामा दिला, तर त्यांचा मुलगा मडगावमध्ये पोटनिवडणुकीत जिंकू शकतो का, असादेखील प्रश्न विचारता येतो. रवी नाईक कायम सतर्क व दक्ष असतात. रितेश नगराध्यक्ष होऊ नये, म्हणूनही पूर्वी काहीजणांनी डाव खेळला होता; पण तो डाव रवींनीच यशस्वी होऊ दिला नाही. रामभक्तीच्या विषयावरून उत्तर भारतात भाजपला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. 

गोव्यातही अनुकूलता आहे. त्यामुळे रवींनी समजा आमदारकी सोडून मुलाला रिंगणात उतरवले तर काहीही घडू शकते. मात्र, आपण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीन, असे जाहीर केल्याने आता चर्चा करण्यात अर्थ नाही. मतदार आपला लोकप्रतिनिधी पाच वर्षासाठी निवडतात. काहीजण मध्येच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात. त्यावेळी मतदारांचा विश्वासघात होतो. रवी २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्याच तिकिटावर निवडून आले आहेत. फोंडा मतदारसंघात मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने आहेत. तरीही रवींमुळे भाजपला मते मिळाली. रवी तसे काठावर पास झाले. शेवटी जो जीता वही सिकंदर. रवींनी स्वतःची पाच वर्षाची टर्म पूर्ण करायलाच हवी. रवी दुसऱ्यांदा भाजपमध्ये गेले. आता ते भाजपमध्येच रिटायर होतील. २००० साली मनोहर पर्रीकर प्रथम सीएम झाले, त्यालाही रवी यांचेच पक्षांतर कारण होते. रवी व इतरांमुळे पर्रीकर प्रथम मुख्यमंत्री झाले होते.
 

Web Title: why will ravi naik resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.