पत्नी, मुलाला नदीत ढकलले, नंतर स्वत: ही लावला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 10:58 AM2023-06-30T10:58:56+5:302023-06-30T11:00:35+5:30
कर्जबाजारी झाल्याने ठेकेदार इसमाचे कृत्य; सर्वत्र हळहळ
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : कंपनी सुरू करण्यासाठी बँक व खासगीतून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने पत्नी व मुलाला नदीत ढकलून नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना बुधवारी कारवार व पाडी- कुंकळी येथे घडली.
श्याम दुवा पाटील (५०), पत्नी ज्योती पाटील (३७) व मुलगा दक्ष पाटील (१२) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब मूळ कारवार येथील असून माटवे दाबोळी येथे वास्तव्यास होते. श्याम व ज्योती हे बुधवारी दुपारी 3 वाजल्यानंतर कारवारहून गोव्याच्या दिशेने येत असताना श्याम पाटील यांनी कारवारच्या पुलावर आपली गाडी उभी केली. पत्नी ज्योती व मुलगा दक्ष यांना पुलावरून नदीत ढकलून दिले.
नंतर स्वतः नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना तेथून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. लोक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून श्याम याने तिथून पोबारा केला. दुचाकीने गोव्याच्या दिशेने तो पळून आला. त्यानंतर त्याने पाडी- कुंकळी येथे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून जंगलात निर्जन स्थळी गळफास लावून आत्महत्या केली. पुतण्या विराज नाईक यांनी मृतदेहाची ओळख पटविली आहे. शवचिकित्सेनंतर मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठविल्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितले.
आई, मुलाचा मृतदेह सापडला
बुधवारी सकाळी ८:२० वाजता ते आपल्या पत्नी मुलासह गाडीने कारवारला गेले होते. नंतर कारवारला घरच्यांची भेट घेऊन पुन्हा दुपारी गोव्याच्या दिशेने येत असताना काळी नदीच्या पुलावर गाडी उभी करून पत्नी व मुलाला पुलावरून काळी नदीत ढकलून दिले. ज्योती पाटील व दक्ष पाटील यांचे मृतदेह देवबाग येथे पोलिसांना सापडले आहेत. चित्ताकूल- कारवार पोलिस तपास करीत आहेत
दोन कोटींवर कर्ज
श्याम पाटील हे पेशाने ठेकेदार होते. वेर्णाच्या औद्योगिक वसाहतीत त्यांचे कंत्राटाचे काम सुरु होते. नंतरच्या काळात त्यांनी स्वतःची कंपनी सुरु करण्यासाठी मित्रमंडळी, खासगी आस्थापनांसह व बँकांकडून कर्ज घेतले. त्या कर्जाचा आकडा २ कोटींवर गेला होता. लोक पैसे मागण्यासाठी घरी येत असल्याने श्याम नैराश्यात गेला होता.