धक्कादायक : बायकोचा व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार, पतीची आत्महत्या
By सूरज.नाईकपवार | Updated: April 26, 2024 13:45 IST2024-04-26T13:43:23+5:302024-04-26T13:45:53+5:30
बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याची एक घटना गोव्यातील सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

धक्कादायक : बायकोचा व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार, पतीची आत्महत्या
सूरज नाईकपवार, मडगाव : बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याची एक घटना गोव्यातील सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमर नागेंद्र शर्मा (३२) असे मयताचे नाव आहे. बाळ्ळी येथे एका भाडया घरात तो रहात होता. तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील मिरजापुर , गाझीपूर येथील आहे.
अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत. गुरुवारी सकाळी आत्महत्येची ही घटना उघडकीस आली.
अमर हा एका महिन्यापुर्वी गोव्यात आला होता. तो व्यवसायाने न्हावी होता. बाळ्ळी येथे त्याच्या मेव्हणाच्या सलूनमध्ये तो काम करीत होता. त्याला दोन मुलेही आहेत. बुधवारी मध्यरात्री त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल केला होता. मात्र तिने बोलण्यास नकार दिला. त्यामुळे अमर चिडला व त्याने घराच्या छताला कापडी टॉवेलना गळफास लावून घेउन आत्महत्या केली.
सकाळी तो घरचा दरवाजा उघड नसल्याने अग्निशामक दलाला बोलावून घेउन मुख्य दरवाजी कडी काढून आत बघितले असता अमरने आत्महत्या केल्याचे आढळून आले. मृतदेह शवचिकित्सेसाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.