पक्षाचा आदेश असल्यास मंत्रिपदही स्वीकारेन: सभापती रमेश तवडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 07:01 AM2024-05-31T07:01:14+5:302024-05-31T07:02:13+5:30

सभापती रमेश तवडकर यांना देखील पुढील काही महिन्यांत मंत्रीपद मिळू शकते अशी चर्चा गोव्यात सुरू आहे.

will also accept ministership if the party orders said ramesh tawadkar | पक्षाचा आदेश असल्यास मंत्रिपदही स्वीकारेन: सभापती रमेश तवडकर

पक्षाचा आदेश असल्यास मंत्रिपदही स्वीकारेन: सभापती रमेश तवडकर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सभापती रमेश तवडकर यांना देखील पुढील काही महिन्यांत मंत्रीपद मिळू शकते अशी चर्चा गोव्यात सुरू आहे. याबाबत काल सभापती तवडकर यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, 'आतापर्यंत पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या आहेत. पक्षाला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांची पूर्ति करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आणि यापुढेही करेन.'

'आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर मुंगीही स्वस्थ बसत नाही. तिथे मी तर राजकीय व्यक्ती. माझ्या मतदारसंघातील संस्थांवर मला अंधारात ठेवून पैशांची खिरापत होते, तेव्हा मला माझ्या अस्तित्वासाठी धडपड ही करावीच लागली,' असे सभापती रमेश तवडकर यांनी त्यांच्या मंत्री गोविंद गावडे यांच्याशी असलेल्या वादासंबंधी विचारले असता सांगितले. न केलेल्या बेसबॉल मैदानाच्या मुद्द्यावर व कला अकादमीच्या बांधकामासंबंधी विचारले असता ते म्हणाले की आपल्याला कोणत्याही वादात पडायचे नाही. तुम्ही ती माहिती सबंधित खात्याकडून किंवा त्याच मंत्र्यांकडून घ्यावी.

गोविंद गावडे आणि त्यांच्यात मतभेद कसे निर्माण झाले असे विचारले असता तवडकर यांनी सांगितले की, 'एसटी आंदोलनात आम्ही दोघे खांद्याला खांदा लावून लढलो. परंतु कालची परिस्थिती आज असत नाही. कदाचित आजची परिस्थिती उद्या असणार नाही. माणसांचे विचार बदलतात', एवढेच ते म्हणाले.

आमदार नव्हतो तेव्हापासून गरजूंना घरांसाठी मदत : गावडे

श्रमधाम योजनेची आता राज्यात प्रसिद्ध होत आहे. मात्र, मी जेव्हा सामाजिक कार्य करत होतो आणि आपण आमदार होवू की नाही याचा स्वप्नातदेखील विचार केला नव्हता तेव्हापासून लोकांना घरे बांधून देण्यास मदत करत होतो. मात्र केव्हाच याचा बोलबाला केला नाही किंवा प्रसिद्धी करून घेतली नाही' असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले. 

प्रियोळ प्रगती मंचच्या माध्यमातून गरजूंना घरे बांधून देण्यासाठी खूप पूर्वीपासून काम केले आहे. यापूर्वी असे कुणीच केले नव्हते असे ते म्हणाले. मंत्री गावडे म्हणाले की, 'केवळ प्रियोळमध्येच नाही तर मडकई मतदारसंघातदेखील आम्ही अनेक घरे उभारली आहेत किंवा घर उभारणी, दुरुस्तीला लहान-मोठी मदत केली आहे. पण आता अशा कामांना प्रसिद्धी मिळत आहे किंवा अनेकजण प्रसिद्धी मिळवत आहेत असे म्हणता येईल,' असे गावडे यांनी सांगितले.

श्रमधाम ही खरोखरच चांगली योजना आहे. या योजनेंतर्गत ' एखाद्या गरजूला रहायला, संसार करायला घर मिळत असेल तर माझ्या प्रियोळ मतदारसंघात याचे स्वागतच आहे. पण उगाच प्रसिद्धीसाठी किंवा राजकारण करण्यासाठी लोकांचा उपयोग करून अशा गोष्टी कुणीही करू नये' असा टोला गावडे यांनी लगावला.

मंत्री गावडे यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे घर मोडकळीस आलेली, पावसात घर पडण्याची शक्यता असलेली व्यक्ती आली होती. या व्यक्तीला मी मदत करायचे ठरविले. आवश्यक साहित्यदेखील ऑर्डर केले. पण ४ ते ५ दिवसांत मला कळाले की, श्रमधामअंतर्गत त्या व्यक्तीचे घर उभारले जात आहे. मात्र नंतर श्रमधामअंतर्गत त्यांचे घर उभारले गेले नाही आणि मी जी मदत करणार होतो तेही झाले नाही. त्यामुळे या गोष्टी करताना स्थानिक नेत्यांमध्ये समतोल असणे आवश्यक आहे.'


 

Web Title: will also accept ministership if the party orders said ramesh tawadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.