एका आमदारकीनंतर निवृत्ती जाहीर करेन: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2025 14:43 IST2025-01-22T14:43:01+5:302025-01-22T14:43:40+5:30
'पद नको; फक्त कमबॅक करायचेय'

एका आमदारकीनंतर निवृत्ती जाहीर करेन: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : मांद्रे मतदारसंघातून २०१७च्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदी असताना माझा पराभव करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. तरीही २०२२ च्या निवडणुकीत सहा हजार मते घेऊन मी जनमत माझ्यासोबत असल्याचे दाखवून दिले. काहींनी मला 'विनेब्लिटी' नाही, असे सांगितले होते. ती चौकट मोडून दाखवली. आगामी २०२७ च्या निवडणुकीत पुन्हा आमदार बनण्याचे स्वप्न आहे. त्यानंतर राजकारणातून निवृत्त होईन, अशी भावना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली.
पार्सेकर यांनी सोमवारी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्यानंतर ते बोलत होते. दामोदर नाईक यांच्याशी आपली सदिच्छा भेट होती. आगामी काळात राज्यात भाजप पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्ष नाईक यांनी आपण, दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राज्यपाल तथा माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र आर्लेकर व माजी मुख्यमंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या कार्यकाळात दाखवलेल्या मार्गाने पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी आपली असल्याचे निवडीच्या घोषणेनंतरच्या भाषणात सांगितले होते.
प्रदेशाध्यक्षांची कसोटी
दरम्यान, आगामी निवडणुकीत लक्ष्मीकांत पार्सेकर यांची दावेदारी निश्चित आहे. मात्र, विद्यमान आमदार जीत आरोलकर यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपशी घनिष्ठ संबंध आहेत. माजी आमदार सोपटेही सतत कार्यरत आहेत. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीवेळी प्रदेशाध्यक्ष नाईक यांची कसोटी लागेल.
मी भाजप पक्ष सोडला; दामू नाईक यांना नाही!
पार्सेकर म्हणाले की, "भाजपचे नूतन अध्यक्ष नाईक हे मित्र आहेत. जरी मी भाजप सोडला तरी मी दामूंना सोडले नाही, हे विशेष. खरे म्हणजे नूतन अध्यक्षांनी पहिल्या भाषणात कार्यकर्त्यांना व जनतेला संदेश देताना केवळ तीन नेत्यांची नावे घेतली. भाजपची वाटचाल कुठल्या दिशेने असेल याची झलक दाखवली."
प्रलंबित कामांचा पाठपुरावा
पार्सेकर म्हणाले की, "पेडणे तालुक्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून राज्याला महसूल मिळण्यास सुरुवात झाली आहे. विमानतळ कंपनीने फायद्यातील ३६.९९ टक्के वाटा राज्य सरकारला देण्याचा करार माझ्या काळात झाला. साधारणतः ३५ वर्षांनंतर विमानतळ सरकारच्या मालकीचे होईल. याचबरोबर तुये इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे आहे. तुये इस्पितळ प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. जनआंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारने लक्ष देऊन १०० खाटांचे इस्पितळ सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा आहे."
सेवेला माझे प्राधान्य
पार्सेकर म्हणाले की, मी भाजपपासून फारकत घेत पक्षाचा राजीनामा दिला. मात्र, दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नाही व करणारही नाही. माझे प्राधान्य संस्थेच्या दोन व्यावसायिक कॉलेजांची घडी नीटनेटकी करणे यास आहे."
'आजही मी समाजकार्यापासून दूर नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर असताना पराभूत झालो याचे शल्य वाटते. त्यामुळे फक्त एकदाच आमदार बनण्याचे स्वप्न आहे. आणखी कसलेही पद नको व त्याची इच्छा नाही. जीवनात मला खूप काही मिळाले.