चोडण पुलासाठी प्रयत्नशील राहणार
By Admin | Published: March 16, 2015 01:42 AM2015-03-16T01:42:02+5:302015-03-16T01:42:33+5:30
तिसवाडी : मये मतदारसंघातून निवडून आल्यास नियोजित चोडण पुलाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन
तिसवाडी : मये मतदारसंघातून निवडून आल्यास नियोजित चोडण पुलाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन अपक्ष उमेदवार सुभाष किनळकर व रूपेश ठाणेकर यांनी युनायटेड चोडण संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत दिले.
चोडण युनायटेड संघटनेने पुलासंबधी चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते़ काराभाट-चोडण येथील चर्च सभागृहात संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हळदणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर संघटनेचे सचिव टोनी नोरोन्हा व खजिनदार दिगंबर फडते उपस्थित होते.
या वेळी बैठकीला उपस्थित असलेले मये जिल्हा पंचायत उमेदवारांना चोडणच्या पुलासंबंधी उपस्थितांनी विचारले असता ते म्हणाले की, भाजप सरकारने मये मतदारसंघातील लोकांना चोडणचा पूल उभारण्याचे निवडणुकीत आश्वासन देऊनही गेल्या तीन वर्षांत पूर्ण केले नाही. पुढील दोन वर्षांतही ते शक्य नाही़ या पुलासाठी मये मतदारसंघातून संघर्ष केल्याशिवाय पुलाची मागणी पूर्ण होणार नाही.
या वेळी सचिव टोनी नोरोन्हा यांनी मागील सभेचा अहवाल वाचून दाखविला़ या वेळी पंच रामा कुबल, साल्वादोर कु्रझ, माजी सरपंच प्रसाद कुंडईकर, चर्चचे फादर परेरा, चोडण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश गोवेकर व इतर ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते. (प्रतिनिधी)