पेडणेत भंडारी, मराठा समाज एकत्रित प्रभाव दाखवतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2024 08:46 AM2024-04-03T08:46:59+5:302024-04-03T08:48:09+5:30

दोन्ही समाजाकडे ८५ टक्के मते : मतदारसंघात प्रभावी संख्या

will bhandari maratha samaj show combined influence in pedane for goa lok sabha election 2024 | पेडणेत भंडारी, मराठा समाज एकत्रित प्रभाव दाखवतील?

पेडणेत भंडारी, मराठा समाज एकत्रित प्रभाव दाखवतील?

प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : उत्तर गोव्यातील अत्यंत महत्त्वाचा तालुका म्हणजे पेडणे. मांद्रे आणि पेडणे हे दोन विधानसभा मतदारसंघ येथे आहेत. तालुक्यातील या दोन्ही मतदारसंघांतील एकूण मतदारांत सुमारे ८५ टक्के मतदार हे भंडारी आणि मराठा समाजातील आहेत. या दोन्ही समाजातील मतदारांची एकूण टक्केवारी लक्षात घेता तालुक्यातील निवडणुकीचा कल ओळखता येऊ शकतो.

पेडणे तालुक्यात विधानसभेत मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मगोचे आमदार जीत आरोलकर करत आहेत, तर राखीव असलेल्या पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रवीण आर्लेकर करत आहेत.

लोकसभेसाठी मांद्रे मतदारसंघात ३३,१३१ मतदारांची नोंद आहे. यातील १६,३९२ पुरुष, तर १६,७३९ महिला मतदार आहेत. यातील सरासरीवर १४ हजारांहून अधिक मतदार भंडारी समाजातील, तर ११,५०० मतदार मराठा समाजातील आहेत. दोन्ही समाजाची ही टक्केवारी एकूण मतदारांच्या ८० टक्क्यांच्या आसपास आहे. दुसऱ्या बाजूने पेडणे मतदारसंघात एकूण ३३,३४० मतदारांची नोंद झाली आहे. यातील १६,५८३ मतदार हे पुरुष मतदार, तर १६,७५७ मतदार महिला आहेत. एकूण मतदारातील ११,५०० मतदार हे भंडारी समाजातील आहेत, तर सुमारे १५ हजार मतदार हे मराठा समाजातील आहेत. साधारण ही टक्केवारी ८० ते ८५ टक्क्यापर्यंत आहे.

दोन्ही मतदारसंघात ख्रिश्चन, सारस्वत, मुस्लिम तसेच इतर समाजातील मतदारांची टक्केवारी ही साधारणतः १५ टक्के आहे. त्यामुळे भंडारी आणि मराठा समाजातील मतदारांचे पेडणे तालुक्यावरील वर्चस्वाची दिशा देणारे आहे.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत पेडणे तालुका भाजप उमेदवाराच्या पाठीशी राहिला होता. मात्र त्याला अपवाद २००९ची निवडणूक होती. त्यावेळीचे राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार स्थानिक असल्याने भाजला कडवा प्रतिकार करावा लागला होता.

तालुक्यातून मतांच्या दृष्टिकोनातून भंडारी तसेच मराठा समाज हा एकसंध राहिला नसल्याने त्यांच्या मतांची विभागणी झालेली आढळून येते. मागील दोन लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास पाहता इथले बहुतांश मतदार भाजपसोबत राहिले होते. मात्र यावेळी मतदारसंघातील विविध प्रश्नांबरोबरच स्थानिकांचे प्रश्न, मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ तसेच रिंगणात उतरविले जाणारे उमेदवार यावरून एकूण समीकरणे बदलली जाऊ शकतात. ही समीकरणे बदलण्यासाठी या दोन्ही समाजातील मतदार कोणती भूमिका घेतात यावरही बरेच काही निश्चित होणारे आहे.


 

Web Title: will bhandari maratha samaj show combined influence in pedane for goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.