काणकोणच्या दुःखावर फुंकर घालणार: विश्वजित राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 12:40 PM2024-08-02T12:40:32+5:302024-08-02T12:41:12+5:30
मूत्रपिंड विकार होण्याची कारणे शोधण्यासाठी एजन्सी नियुक्त करू
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मूत्रपिंड विकाराच्या दहशतीखाली जगणाऱ्या काणकोण तालुक्याच्या दुःखावर फुंकर घालण्याचा निर्णय काल, गुरुवारी विधानसभेत घेण्यात आला. काणकोणमध्ये मूत्रपिंड विकाराचे प्रमाण अधिक का आहे? आणि त्याची कारणे काय आहेत? याचा शोध घेण्याचे काम एक एजन्सी नियुक्त करून केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत दिली.
मूत्रपिंड विकाराची सर्वाधिक प्रकरणे काणकोण तालुक्यात आढळतात. त्यामुळे एका तज्ज्ञ एजन्सींकडून याची कारणे शोधण्याचे काम हाती का घेतले जात नाही, असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी केला. खरे म्हणजे हा अभ्यास यापूर्वीच व्हायला पाहिजे होता, असे ते म्हणाले. आमदाराने अशाच प्रकारे जपानमध्ये झालेल्या एका संशोधनाचा उल्लेखही केला. काणकोणचे आमदार असलेले सभापती रमेश तवडकर यांनीही याविषयी अभ्यास व्हायलाच पाहिजे, असे सांगितले. त्यावर तसा अभ्यास यापूर्वी करण्यात आला होता; परंतु त्यातून निष्कर्ष निघाला नसल्याची माहिती सभागृहात दिली. तरीही एखाद्या चांगल्या एजन्सीद्वारे नव्याने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
तज्ज्ञ डॉक्टर मिळणे सरकारपुढे मोठा प्रश्न
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अनुपलब्धतेचा मुद्दा उपस्थित केला. डिचोली सार्वजनिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले. या इस्पितळात आवश्यक मनुष्यबळ का दिले जात नाही? असा त्यांचा प्रश्न होता. यावर आरोग्यमंत्री म्हणाले की, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक हा सरकारपुढे नेहमीच मोठा प्रश्न राहिला आहे. गोव्यात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे ही समस्या उपस्थित होते. त्यामुळे इतर राज्यांतील डॉक्टर कंत्राटी तत्त्वावर घ्यावे लागतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.