'प्रत्येकाला घर' योजना आणणार! मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 12:50 PM2024-06-21T12:50:35+5:302024-06-21T12:51:42+5:30

वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना फ्लॅटसाठीही अडीच लाख सबसिडी

will bring everyone home plan said cm pramod sawant visit lokmat goa | 'प्रत्येकाला घर' योजना आणणार! मुख्यमंत्री 

'प्रत्येकाला घर' योजना आणणार! मुख्यमंत्री 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नवनवे उद्योग राज्यात यावेत यासाठी विविध योजना आखल्या जात आहे. आता प्रत्येक गोमंतकीयाला त्याचे हक्काचे घर मिळावे अशी इच्छा आहे. त्यासाठी राज्य सरकार लवकरच नवी योजना आणणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी काल, गुरुवारी 'लोकमत' कार्यालयास भेट देऊन वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सरकारच्या कामगिरीसह विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेखाली लोक लाभ घेतात. परंतु अनेकांना हे ठाऊक नाही की वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास फ्लॅट खरेदी करण्यासाठीही २.५ लाख रुपये मिळतात. प्रत्येकाच्या डोक्यावर निवारा हवा. त्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन योजना आणणार आहे. 

गोव्यात नोकऱ्या नाहीत हा समज चुकीचा आहे. औषध कंपन्यांना १ हजार कर्मचारी हवे होते. भरतीसाठी जाहिरात दिली तेव्हा केवळ २०० जण मिळाले. प्रशिक्षित, कुशल मनुष्यबळाची गरज आहे. संधी भरपूर आहेत. गोव्यात कोणीही बेकार राहू शकत नाही. केवळ काम करण्याची इच्छा हवी, असेही ते म्हणाले.

पुढील महिन्यात मेगा भरती

एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, कर्मचारी निवड आयोगातर्फे भरती आता मार्गी लागली आहे. पुढील महिन्यात ५०० हून अधिक कनिष्ठ लिपीक व तसेच सुमारे ४०० हून अधिक शिपाई, सफाई कामगार आदी मल्टिंटास्कींग पदे भरण्यासाठी जाहिरात येईल. दिव्यांग खात्यासारखे नवे खाते निर्माण केलेले आहे तेथेही कर्मचारी लागतील.

१४ क्लब बंद पाडले

पर्यटकांना क्लबमध्ये नेऊन मुली पुरवण्याच्या आमिषाने मारहाण करुन लुटले जाते त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, एकूण २२ क्लब कार्यरत होते. गृहमंत्री म्हणून माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तब्बल १४ क्लब बंद करण्यात आले. तक्रार आली की शहानिशा करुन कारवाई केली जाते.'

लोकमतच्या वाटचालीस दिल्या शुभेच्छा...

'लोकमत'ने गोव्यात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. समाजातील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन त्याची योग्य प्रकारे मांडणी करण्याचे वेगळेपण 'लोकमत'ने जपले आहे. म्हणूनच गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'लोकमत' सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. 'लोकमतचा १५वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त मी लोकमत परिवाराचे अभिनंदन करतो तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

ड्रग्सच्याबाबतीत बदनामी

मुख्यमंत्री एका प्रश्नावर म्हणाले की, विरोधक आरोप करीत असले तरी कायदा सुव्यवस्थेची कोणतीही समस्या राज्यात नाही. गोव्याचे नाव नाहक बदनाम केले जात आहे. देशाच्या कुठल्याही भागात ड्रग्स पकडले तरी गोव्याशी संबंध जोडला जातो, हे चुकीचे आहे. माझ्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात सर्वाधिक ड्रग्स पकडण्यात आले. ३.५ कोटी रुपयांपर्यंत किमतीचे अंमली पदार्थांचे घबाडही एकदा पकडले.

आमदारांना मंत्रि‍पदे देण्याबाबत विचार करू

गोव्यातही मंत्रिमंडळ फेररचनेबाबत विचार करु, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. काही आमदारांचा मंत्रिपदासाठी रेटा असल्याचेही त्यांनी मान्य केले. काही आमदारांची मागणी आहे ही खरी गोष्ट. आमदार गणेश गावकर यांना मंत्रिपद द्या, अशी मागणी घेऊन काहीजण आले होते, असेही ते म्हणाले. 

कलाकारांइतकीच मलाही कला अकादमी महत्त्वाची

केवळ कलाकारांनाच कला अकादमीची काळजी आहे असे नाही. त्यांच्याइतकीच माझ्यासाठीही अकादमी महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. अकादमीची वास्तू ४० वर्षे जुनी होती. त्यामुळे त्याचे नूतनीकरण करणेही तेवढेच गरजेचे होते. मी अकादमीच्या कामाचा पूर्ण आढावा घेतला असून अकादमीला गतवैभव मिळवून देईन. 

वित्त खात्यात आणल्या सुधारणा

सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा मी ताबा घेतल्यानंतर मी वित्त खात्यात मोठ्या सुधारणा आणल्या. पूर्वी ७ ते ८ टक्के व्याजाने कर्जे घेतली जायची. मी प्रयत्न करुन नाबार्डसारख्या संस्थेकडून २.५ टक्के कमी दराने ५०० कोटी रुपये कर्ज मिळवले. वीज सुधारणा किंवा अन्य प्रकल्पासाठी सरकारला सिडबीकडून ३ टक्के व्याजाने कर्ज मिळते, हे कोणाला ठाऊकच नव्हते. मी प्रयत्न करुन हे कर्जही मिळवले.

शिक्षण क्षेत्रात कमालीचे बदल

सावंत म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातही आमुलाग्र बदल मी आणले, केवळ शाळा इमारती व तत्सम पायाभूत सुविधाच निर्माण केल्या नाहीत तर मनुष्यबळ विकासावरही भर दिला. 'विद्या समीक्षा केंद्रांव्दारे ग्रामीण विद्यालये कनेक्ट झाली. आज अनेक सरकारी माध्यमिक विद्यालयांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो. डिचोलीसारख्या ठिकाणी सरकारी शाळेत मागणी असल्याने दहावीपर्यंत वर्ग वाढवण्यात आले.

विरोधकांनी उठसूट टीका करणे हाच उद्योग सुरू केला आहे. त्यांना राज्यात सुरू असलेला विकास दिसत नाही, आमच्यावर टीका करणाऱ्यांचेही डबल इंजिन सरकार होते. मात्र, त्या काळात त्यांनी गोव्यात काय दिवे लावले सर्वांना माहिती आहे. परंतु, आमचे सरकार गोव्याच्या विकासासाठी गंभीर आहे. त्यामुळे नवनवीन उद्योग, प्रकल्पांची कामे सुरू आहेत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

 

Web Title: will bring everyone home plan said cm pramod sawant visit lokmat goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.