कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल करू: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 07:56 AM2024-01-16T07:56:18+5:302024-01-16T07:57:53+5:30

'कन्वर्ज २०२४- शिक्षा उद्योजक संगम'चे उद्घाटन.

will change the curriculum for skilled manpower said chief minister | कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल करू: मुख्यमंत्री 

कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल करू: मुख्यमंत्री 

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार व्हावे यासाठी लवकरच अभ्यासक्रमात बदल केले जातील, असे सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी येथे काल, सोमवारी 'कन्वर्ज २०२४- शिक्षा उद्योजक संगम' कार्यक्रमाच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेंकर, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर उपस्थित होते. यावेळी आयोजक तसेच आयबीएम स्किल बिल्डचे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. साखळी, केपे, पेडणे, बोर्डा-मडगाव, खांडोळा सरकारी कॉलेजचे तसेच होम सायन्सचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, औषध उद्योग गोव्यात जोमाने चालू आहे. इलेक्ट्रॉनिक क्लस्टरही येणार आहे. आयटी, पर्यटन, सेवा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करावे लागतील. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या मिळवण्यासाठी 'कन्वर्ज २०२४' सारखे उपक्रम फार उपयुक्त ठरतील.

राज्यात विद्यार्थी घेत असलेले शिक्षण आणि उद्योगांमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज यात कोणताही ताळमेळ नव्हता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणताही युवक किंवा युवती कारखान्यात नोकरीसाठी गेले तर त्यांना एक वर्ष अप्रेंटिस म्हणून काम करायला भाग पाडले जाते. यापुढे तसे होणार नाही. अभ्यासक्रमात बदल करून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ तयार केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आयबीएम व उद्योग यांच्याशी कनेक्ट होऊन उपक्रम राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 'विकसित भारत २०४७' चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गोव्याने कंबर कसली आहे व त्यादृष्टीने कुशल मनुष्यबळ तयार करणे याला प्राधान्य दिले जात आहे.'

संधी जाणून घ्या

मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर कोणकोणत्या संधी आहेत हे जाणून घ्यायला हवे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने या क्षेत्रात तसेच सेवा क्षेत्रात मोठा वाव आहे. फार्मा उद्योग व जहाज बांधणी (शिप बिल्डिंग) मध्येही मोठा वाव आहे. मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आले आहे. धारगळ येथे आयुष इस्पितळ आल्याने वेलनेस पर्यटनालाही वाव मिळाला आहे. राज्यात मरिन क्लस्टर येऊ घातला. सरकारने कृषी महाविद्यालय सुरू केले आहे.

'जीपीएससी'ची माहिती नाही

गोव्यात पदवीधरांनादेखील गोवा लोकसेवा आयोगाबद्दल कोणतीही माहिती नसते, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. अनेकदा पदवीधर युवक-युवती माझ्याकडे नोकऱ्या मागायला येतात तेव्हा मी त्यांना तुम्ही जीपीएससीच्या परीक्षा दिल्या आहात का?, असे विचारतो. परंतु त्यांना जीपीएससी म्हणजे काय हेच ठाऊक नसते. इतर राज्यांमध्ये असा प्रकार नाही. तेथे मुले इयत्ता आठवीत असतानाच त्यांना केंद्र ीयलोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांचे वेध लागतात व ते तयारीला लागतात. गोव्यात चित्र वेगळे आहे, ते बदलले पाहिजे.

 

Web Title: will change the curriculum for skilled manpower said chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.